विस्मय

0
30
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

विस्मय ही एक चमत्कारिक नदी आहे. तिचा उगम विस्मयामध्ये, प्रवाह विस्मयामध्ये आणि शेवटचा संगमदेखील विस्मयामध्येच घडतो. विस्मयातूनच विस्मयाला पुनर्जीवन मिळत जाते. म्हणूनच विस्मय आजदेखील चिरंजीव आहे.

विस्मय म्हणजे आश्‍चर्य. यात आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळेच घडलेले आपल्याला दिसते. असे का घडले याचे कारण समजत नाही. प्रत्यक्ष घडलेले वास्तव आपल्याला दिसते. डोळ्यांसमोर दिसणारी घटना आपण नाकारू शकत नाही. विस्मय देणारी नवले नेहमीच अधूनमधून चमकलेली आपण अनुभवलेली असतात.

राजकारणामध्ये अशा विस्मयकारक गाठीभेटी नित्याच्याच असतात. कालपर्यंत एकमेकांचे शत्रू असलेले आज अचानक गळ्यात गळा घालून मिठी मारतात हे चित्र आपल्याला थक्क करून सोडते. स्वार्थाला कोठलेच परिमाण नसते. अमक्याकडे मैत्री केल्यावर आपला कार्यभाग साधेल ही स्वार्थी कल्पना मनाशी बाळगून जेव्हा आपण पाऊल उचलतो तेव्हा आपल्याकडे पाहणार्‍यांच्या विस्मयाने भुवया उंचावतात. राजकारण्याला काही अंशी निर्लज्जपणे आपला अपमान सोसावा लागतो. अगदीच तत्त्वनिष्ठ असलेला राजकारणी माणूस लज्जास्पद तडजोडी करूच शकत नाही, म्हणूनच चालू राजकारणात तो कधीकधी अपयशी ठरतो.

आपले आयुष्य वेडीवाकडी वळणे घेताना पाहून आपल्याला विस्मय वाटतच असतो. दिवसाला दोन वेळा आपण पोट भरतो. हवी तेवढी झोप घेतो. नेहमीची आवश्यक नित्यकर्मे करताना अनपेक्षित आव्हाने आपल्यासमोर उभी राहून आपल्याला खुणावतात. आपली तयारी त्या आव्हानांना सामोरे जाण्याची नसते. तरीदेखील त्यांना प्रतिसाद दिल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. ‘हो’ म्हटले तरी संकट आणि ‘नाही’ म्हटले तरी आपली सुटका नाही.

मग कुठेतरी एका कोपर्‍यात बसून आपल्याच जीवनावर आपण विचार करतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर चढताना आपण कसा विचार करत होतो आणि आज आपण इतक्या वर्षांनी कोठे पोहोचलो याचा शोध घेताना विस्मयाची लक्ष्मणरेषा आपण धुंडाळतो. आपल्यावरच आपण मोठमोठ्याने हसावे की आतल्या आत कुढत बसावे हाही निर्णय घेणे आपल्याला कठीण जाते. इतरांना आपल्या जीवनाविषयी वाटणारा विस्मय आपण समजून घेऊ शकतो; पण आपल्याच वर्तनाचा आपल्याला वाटणारा विस्मय आपण कसा बरे समजून घेऊ?
कालपर्यंत आपण आजच्या संधीचा विचार केलाच नव्हता. अचानक संधी येऊन दारात उभी राहते. आपण त्या संधीचा स्वीकार करून पुढे-पुढे जातो. तिच्या परिणामांचीदेखील आपल्याला कल्पना नसते. सकारात्मक वृत्तीने आपण चालत असतो; पण नकारात्मक मुखवटे हळूच वरती येत राहतात. विस्मय आपल्याला येथे अंतर्मुख करतो. विचारांचे जाळे विणताना धाडसाची जोखीमरूपी किनार आपल्याला विसरता येत नाही. परिणाम कोणता घडेल हे घडल्यावरच कळत असते. सगळेच अंदाज एकेकदा चुकतात. निश्‍चित उत्तर कोणच देत नाही. कारण कोणालाच खात्री नसते. विस्मयाचा अंश प्रत्येकाच्या अंतर्मनात दडलेला असतो.

मी पंतप्रधान होणार अशी मला कधी कल्पनाच नव्हती. मी पंतप्रधान कसा झालो याचा मलाच विस्मय वाटतो. माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता एके दिवशी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान होईल हे मी स्वप्नातदेखील कधी मनात आणले नाही. अशी वाक्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्याकडून आपण कित्येकदा ऐकलेली आहेत. यशाच्या मार्गावरचे आपले डावपेच अखंडपणे चाललेले असतात.

नियतीचा खेळ अगदी वेगळ्याच मार्गाने रंगात येत असतो. नियती कधी कोणाला विजयाची माळ घालेल याचा पत्ता आपल्याला नसतो. जेथे विजयाची माळ घातली जाते तेथेच गुलाल उधळला जातो. जयजयकार केला जातो. विस्मयाच्या धुंदीतच विजेत्याला खांद्यावर घेऊन नाचवले जाते. ‘जो जिता वही सिकंदर!’ तो दिवसच त्याच्यासाठी रचलेला असतो. ‘अपना टाइम आयेगा’चा तो साक्षात्कार असतो.

विस्मयाच्या कपड्याला जसे यशाचे धागे असतात, तसेच अपयशाचे धागेदेखील ठळकपणे जोडलेले असतात. यश आणि अपयश यांच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी हे वस्त्र विणलेले असते. एकाचा विजय म्हणजेच अनेकांचा पराजय हे सूत्र अगदीच ठरलेले असते. विजयाचे श्रेय घेणारे सगळेच असतात; पण पराजयाचे श्रेय घेणारा कोणीच नसतो.

थोडे प्रश्‍न असे असतात की त्यांची उत्तरे कधीच मिळत नाहीत.
संत सोहिरोबानाथ आंबियेंच्या झाडाच्या पानावर लिहिलेल्या कविता त्यांच्या बहिणीने अज्ञानाने जाळूनदेखील ते थोर संतकवी म्हणून कसे अजरामर झाले? संत तुकारामाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवूनदेखील कशा वरती आल्या? संत ज्ञानेश्‍वराने निर्जीव भिंतीला चालवून वाघावर आरूढ होऊन आलेल्या चांगदेवाला कसे खजील केले? संत गोरा कुंभाराच्या मडकी भाजण्यासाठी पेटवलेल्या अग्नीतून मांजरीची कोवळी पिल्ले सुखरूप कशी बाहेर आली? पोटासाठी लूटमार करणार्‍या वाल्या कोळ्याचा रामायणकर्ता महान वाल्मिकी ऋषी कसा झाला? सुग्रीवाच्या वानरसेनेने श्रीरामाला श्रीलंकेत जाण्यासाठी समुद्रावर महासेतू कसा उभारला? हातात शस्त्र न धरता फक्त युक्तीच्या गोष्टी सांगून महाभारताच्या महायुद्धात श्रीकृष्णाने पांडवांना कसा विजय मिळवून दिला?
विस्मयाने बुद्धीला हेलकावे देणारी ही शाश्‍वत उदाहरणे आहेत. विस्मय ही एक चमत्कारिक नदी आहे. तिचा उगम विस्मयामध्ये, प्रवाह विस्मयामध्ये आणि शेवटचा संगमदेखील विस्मयामध्येच घडतो. विस्मयातूनच विस्मयाला पुनर्जीवन मिळत जाते. म्हणूनच विस्मय आजदेखील चिरंजीव आहे.