विराट कोहली एफसी गोवाचा सहमालक

0
97
इंडियन सुपर लीग संघ एफसी गोवाचा नवा सहमालक विराट कोहलीसमवेत (डावीकडून) सिनेकलाकार वरूण धवन, ब्राझिलियन प्रशिक्षक झिको आणि माजी फ्रेंच खेळाडू रॉबर्ट पीरिस.

मुंबईतील सोहळ्यात घोषणा
प्रतिष्ठेच्या इंडियन सुपर लीगबाबतची उत्सुकता वाढलेली असून गोमंतकीय फ्रँचाइज एफसी गोवाने काल भारताचा भावी कर्णधार विराट कोहलीला सहमालक तथा अँबासडर घोषित केले.
येथील पल्लाडियम हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात एफसी गोवातर्फे विदेशी प्रशिक्षक झिको आणि खेळाडू रॉबर्ट पीरिस यांनाही सादर केले. संघाच्या आदिदास कीटचेही यावेळी अनावरण करण्यात आले. फुटबॉल स्पोर्टस फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, निता अंबानी, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सहमालक श्रीनिवास धेंपो, वेणुगोपाल एन. धूत, दत्तराज साळगावकर आणि सिनेस्टार वरूण धवन आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एफसी गोवाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली असून मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. माझ्याकडून मोठ्या अपेक्षा असतील याची जाणीव आहे. एफसी गोवाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करीन, असे तीन वेळा विश्‍व चषकात ब्राझिलचे प्रतिनिधीत्व केलेले अर्थुर अतुनेस कोईब्रा उर्फ़ झिको म्हणाले. इंडियन सुपर लीगच्या शुभारंभी पर्वात खेळण्याबाबत मी उत्सुक आहे, असे सांगून गोवा आणि भारतातील फुटबॉलच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचा प्रयत्न करीन, असे अर्सेनेल तथा फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू रॉबर्ट पिरिस म्हणाले.
भारतीय क्रिकेटचा उगवता सितारा विराट कोहलीची एफसी गोवा सहमालक म्हणून घोषणा करण्यात आली. एफसी गोवा फ्रँचाइजचा भाग बनल्याने मी उल्हसित बनलो असून आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलला नवे यश, परिमाण लाभेल, कोहली म्हणाला.
‘व्हाइट पेले’ म्हणून ओळखले जाणार्‍या झिको यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा, खासकरून भारतीय खेळाडूना होईल, असेही कोहलीने सांगितले. येत्या दि. १६ ऑक्टाबेर रोजी मडगावच्या नेहल स्टेडियमवर होणार्‍या चेन्नई एफसीविरुध्दच्या लढतीने गोवा एफसी आपली आयएसएल मोहीम सुरू करील.