वाहनचालकांवर आजपासून सीसीटीव्हीची नजर

0
12

>> एआय आधारित सीसीटीव्हींद्वारे पणजी, पर्वरीत नियम मोडणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई; वाहतूकमंत्र्यांची माहिती

राज्य सरकारच्या वाहतूक खात्याकडून आज (गुरुवार दि. 1 जून) पासून आर्टिफिशअल इंटेलिजन्स ट्राफिक मॅनजेमेंट सिस्टम आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच, मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईला गती देण्यासाठी नवीन अल्कोमीटर खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली असून, महिनाभरात ते उपलब्ध केले जाणार आहेत. राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांत सुधारणेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

काल पोलिसांना 10 ‘स्पीड रडार गन्स’ देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वाहतूक सचिव सुभाष चंद्र, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर, उत्तर गोवा वाहतूक पोलीस अधीक्षक धर्मेश आंगले, उपअधीक्षक सुदेश नार्वेकर उपस्थित होते. रस्त्यावरून अतिवेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना या ‘स्पीड रडार गन्स’ देण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम उल्लंघन टिपण्यात आल्यानंतर स्वयंचलित पध्दतीने चलन तयार होणार असून, वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर दंडाचे चलन पाठविले जाणार आहे. वाहतूक खात्याकडून पणजी, पर्वरी, मेरशी व इतर भागात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांना किती दंड आकारला जाईल, याची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार वाहतूक सिग्नल तोडल्यास प्रथम उल्लंघनासाठी 500 रुपये दंड ठोठावला जाणार असून, पुढील उल्लंघनासाठी 1 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. वाहन चालविताना मोबाईल फोनवर संभाषण करीत असल्याचे कॅमेऱ्याने टिपल्यास पहिल्या उल्लंघनासाठी 1 हजार रुपये दंड, त्याच प्रकारच्या पुढील उल्लंघनासाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. सीट बेल्ट न वापरणाऱ्याला 1 हजार रुपये, हेल्मेट परिधान न करणाऱ्याला 1 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. भरधाव वाहन चालविल्यास कारला 1 हजार रुपये, अवजड वाहनाला 2 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचा बंब यांना रस्ता मोकळा न केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. नो पार्किंगच्या जागी वाहन पार्क केल्यास 500 रुपये, दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त जणांना बसविल्यास 1 हजार रुपये, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट आणि धोकादायक ओव्हरटेकिंगसाठी 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे, असे जाहीर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार रेड लाइट जंपिंग, ओव्हर स्पिडींग, वाहन चालविताना मोबाईल वापर, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे, मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्यासाठी दंडाबरोबरच 3 महिने वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो, असे वाहतूक खात्याने म्हटले आहे.

स्पीड रडार गन्स अत्याधुनिक

यावेळी स्पीड रडार गन्सच्या वैशिष्ट्यांबद्दल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी माहिती दिली. या स्पीड रडार गन्समध्ये हाय डेफिनिशन कॅमेरा आहे, जो उच्च सुरक्षा क्रमांक प्लेटवर इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा 200 मीटरपर्यंत आणि रात्रीच्या वेळी 100 मीटरपर्यंत ओव्हर स्पीड वाहनांची स्वयंचलित नंबर प्लेट ओळख करून स्पष्ट व्हिडिओ आणि प्रतिमा स्वयंचलितपणे कैद करणार आहे. नवीन 70 अल्कोमीटर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

15 वर्षे जुनी वाहने ठेवण्यासाठी जागा घेणार

केंद्र सरकारच्या धोरणानुसार 15 वर्षे वापरलेली जुनी वाहने आता भंगारात टाकून द्यावी लागणार असून, ही वाहने ठेवण्यासाठी गोवा सरकार जमीन संपादित करणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 वर्षांची जुनी सरकारी वाहने ताब्यात घेण्यात येणार असून, तद्नंतर खासगी वाहनेही भंगारात काढण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली. दरम्यान, 15 वर्षे जुनी असलेली 1.92 लाख एवढी वाहने यावर्षी भंगारात काढण्यात येणार आहेत, तर पुढील पाच वर्षांत आणखी 3.5 लाख एवढी 15 वर्षे जुनी वाहनेही भंगारात काढण्यात येतील, अशी माहिती गुदिन्हो यांनी यावेळी दिली.

2022 मध्ये तीन हजार अपघात

राज्यात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. वर्ष 2022 मध्ये 3007 रस्ते अपघातांची नोंद झाली असून, एकूण 251 लोकांचा मृत्यू झाला. बेशिस्तपणे वाहन चालविणे आणि अतिवेगाने वाहन चालविणे हे या अपघातांचे प्रमुख कारण आहे. नवीन मोटार वाहन कायद्यात दंडात वाढ झाली असली, तरीही लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत नाहीत, अशी खंत मावीन गुदिन्हो यांनी व्यक्त केली.