वाहतूक नियम मोडताय, तर आत्ताच व्हा सावधान

0
6

वाहतूक नियमांचे उल्लंघन टिपणारी आधुनिक प्रणाली पणजी, पर्वरीसह 13 ठिकाणी 22 मेपासून कार्यरत

राजधानी पणजी, पर्वरी आणि आसपासच्या 13 ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन टिपणाऱ्या आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीची (इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम) कार्यवाही येत्या 22 मेच्या मध्यरात्रीपासून केली जाणार आहे, असे वाहतूक खात्याने एका सूचनेद्वारे काल जाहीर केले. या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांचे क्रमांक स्वयंचलित पद्धतीने टिपले जाणार असून, संबंधित वाहनमालकाला चलन थेट मोबाईलवर पाठवले जाणार आहे.

इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) अशी ही प्रणाली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीचे स्वयंचलित पद्धतीने निरीक्षण केले जाणार आहे. सीसीटीव्हींच्या आधारे वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या चालकांना ई-चलन जारी केले जाणार आहे. या प्रणालीद्वारे जनरेट केलेले ई-चलन वाहतूक, पोलीस विभागाकडून वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवले जाणार आहे.
पणजी, मेरशी, ताळगाव, दोनापावल, पर्वरी या भागात 13 ठिकाणी वाहतूक नियम उल्लंघन टिपणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टमला जोडण्यात आले आहेत. मोटर वाहन कायदा 1988 च्या 136- अंतर्गत याची अंमलबजावणी राज्यात लागू केली जाईल. येत्या ठराविक कालावधीत अशाच प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी यंत्रणा राज्यभर सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे वाहतूक खात्याने म्हटले आहे.

राजधानी पणजी आणि आसपासच्या 13 जागांमध्ये दिवजा सर्कल, पणजी, कस्टम हाउस जंक्शन, पणजी, फेरी बोट जंक्शन, पणजी, कला अकादमी जंक्शन, पणजी-मालीम जंक्शन, पेन्हा दा फ्रान्स पर्वरी, हिरो होंडा जंक्शन-पर्वरी, एसीडीआयएल स्कूल जंक्शन (डेल्फिनो जंक्शन) (पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर), टीन बिल्डिंगजवळ पर्वरी, ओ-कोकेरो जंक्शन पर्वरी, विज्ञान केंद्र मिरामार, सेंट मायकल स्कूल ते मिरामार-ताळगाव, विज्ञान केंद्र मिरामार ताळगाव रोड ते सेंट मायकल स्कूल तिसवाडी, गोवा विद्यापीठ-दोनापावल रोड, दोनापावल रोड-गोवा विद्यापीठ रोड आणि मेरशी जंक्शन यांचा समावेश आहे.