वाहतूक नियमभंगांची 3 हजार प्रकरणे नोंद

0
13

>> अटल सेतूवर स्पीड कॅमेरे तैनात

गोवा पोलिसांनी राज्यभरात वाहतूक नियमभंग प्रकरणी जोरदार कारवाई सुरूच ठेवली असून मांडवी नदीवरील अटल सेतू या तिसऱ्या पुलावर प्रायोगिक तत्त्वावर स्पीड रडार तैनात करण्यात आले आहे. या स्पीड रडारमध्ये सुमारे 3 हजार वाहतूक नियमभंग प्रकरणांची नोंद झाली आहे.
अटल सेतू पुलावर चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे पुलावरील वारंवार अपघातांच्या घटनांची नोंद होत आहे. अटल सेतूवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड कॅमेरे बसविण्याची घोषणा करण्यात आलेली होती. तथापि, कायमस्वरूपी स्पीड कॅमेरे बसविण्यात आले नव्हते. वाहतूक पोलिसांनी एक इंटरसेप्टर तैनात केली आहे. त्या इंटरसेप्टरच्या माध्यमातून वाहतूक नियमभंगाची आपोआप नोंद होत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

राज्यात भरधाव व बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी दिला आहे.
राज्य सरकारकडून वाहन अपघातांच्या वाढत्या संख्येची नोंद घेऊन राज्यभरात प्रमुख ठिकाणी पोलीस तैनात करून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईच्या मोहिमेमुळे सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात शुल्क जमा होण्यास मदत झाली आहे.