25.5 C
Panjim
Monday, September 21, 2020

वत्तीय नियोजनात होणार्‍या चुका

शशांक गुळगुळे
(अर्थवेध)

प्रत्येकाने मासिक व वार्षिक अशी दोन ‘बजेट’ तयार करायला हवीत. आपले उत्पन्न किती? संभाव्य खर्च किती व शिल्लक किती? या ‘बजेट’ला अनुसरून जर आर्थिक व्यवहार केले तर आर्थिक गाडा बर्‍याप्रकारे चालू शकेल. जर ‘बजेट’ केलेले नसेल तर बर्‍याच अनावश्यक गोष्टी खरेदी केल्या जातात. त्यामुळे आर्थिक गणित बिघडते.

कंपन्या असोत की व्यक्ती असो, वित्तीय नियोजन महत्त्वाचे. वित्तीय नियोजनाचा विचार करताना आपण आपली मराठी म्हण ‘अंथरुण बघून पाय पसरावे’ ही लक्षात घ्यावी. सध्याच्या सतत दबाव आणणार्‍या ‘मार्केटिंग’च्या जमान्यात आपल्याला सर्व माध्यमांवर पैसे उडविण्याच्या जाहिरातीच जास्त दिसतात, यांचाही परिणाम मानवी मनांवर होतो.

बजेट
प्रत्येकाने मासिक व वार्षिक अशी दोन ‘बजेट’ तयार करायला हवीत. आपले उत्पन्न किती? संभाव्य खर्च किती व शिल्लक किती? या ‘बजेट’ला अनुसरून जर आर्थिक व्यवहार केले तर आर्थिक गाडा बर्‍याप्रकारे चालू शकेल. जर ‘बजेट’ केलेले नसेल तर बर्‍याच अनावश्यक गोष्टी खरेदी केल्या जातात. ‘कोरोना’ने आपल्याला एक चांगला धडा दिला आहे तो म्हणजे योग्य खर्च व जरूरीपुरता खर्च. ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे जनतेच्या अनावश्यक खर्चाला बराच आळा बसला आहे. उद्या ‘कोरोना’ गेल्यावरही ही आर्थिक शिस्त पाळणे नक्कीच वाईट नाही.

विम्याचे नियोजन
भारतीयांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात अशी माहिती समजली आहे की, भारतीय लोकांचे जीवन विमा उतरविताना योग्य नियोजन नसते. सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवन विम्याचे संरक्षण हवे. पण प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसार विमा पॉलिसीची निवड करावयास हवी. ती केली जात नाही. जीवन विमा व्यवहारात ‘मिस सेलिंग’ (गरज नसलेली पॉलिसी विकत घेणे) फार मोठ्या प्रमाणावर होते. विमा एजंट व्यक्ती त्याना चढ्या दराने ‘कमिशन’ मिळेल अशाच पॉलिसी गिर्‍हाईकांना उतरवायला आग्रह करतात व त्यांच्या आग्रहाला बळी पडून बर्‍याच विमाधारकांकडे त्यांना गरज नसलेल्या नको त्या पॉलिसी असतात. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी की, गुंतवणूक म्हणून विमा पॉलिसीत गुंतवणूक करू नये. कुठल्याही विमा पॉलिसीत कधीही विमाधारकाला ६ टक्क्यांहून अधिक परतावा मिळत नाही. याहून अधिक परतावा मिळणारे व सुरक्षित असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. साधारणपणे उत्पन्नाच्या दहापट रकमेचा विमा उतरवावा. समजा एखाद्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असेल तर त्याने ५० लाख रुपयांचा विमा उतरवावा. आरोग्य विमा मात्र जितक्या जास्तीत जास्त रकमेचा उतरविता येईल तेवढा उतरवावा. कारण भविष्यात कोणाच्या शरीरात काय बदल घडू शकतील याचा कोणालाच अंदाज नसतो. आणि दुर्दैवाने भारतात आरोग्य क्षेत्राच्या नाड्या प्रामुख्याने खाजगी आस्थापनांच्या हातात असल्यामुळे व वैद्यकीय खर्चात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आरोग्य विमा जास्तीत जास्त रकमेचा घेणे चांगले. बहुतेक व्यक्ती युनिट संलग्न इन्शुरन्स योजनेखाली (जो ‘युलिप’ म्हणून ओळखला जातो) ‘एन्डॉवमेन्ट’ किंवा ‘कॅश बॅक’ योजनांत विनाकारण गुंतवणूक करतात. कारण या योजना एकतर खर्चिक असतात व दीर्घ मुदतीच्या असतात. या ऐवजी अन्य बरेच पर्याय उपलब्ध असूनही भारतात युलिपधारकांचे फार मोठे प्रस्थ आहे. जीवन विम्याचा करार हा दीर्घकालीन आणि म्हणून कोणतीही जीवन विमा पॉलिसी योजना घिसाडघाईने करू नये, पूर्ण विचारांतीच ती घ्यावी! तर कित्येक लोकांकडे जीवन विम्याचे संरक्षण पुरेसे नसते. जीवन विम्याचा पुरेशा व योग्य रकमेचा ‘टर्म प्लान’ विकत घ्यावा हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने योग्य निर्णय ठरू शकतो.

अडचणीचा काळ
कोणाच्या आयुष्यात कधी अडचणीची वेळ येईल हे सांगता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच. अशा वेळी पैशांची गरज लागू शकते. बर्‍याच जणांची यासाठी तरतूद नसतेच, हे पूर्णतः चुकीचे आहे. अडचणीच्या वेळेसाठी आर्थिक नियोजन हे करायलाच हवे. ‘कोरोना’मुळे सध्या कित्येकांना पगार मिळत नाही.

कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. कित्येकांना अर्धा पगार मिळत आहे. अशावेळी ज्यांचे अडचणीच्या वेळेसाठी आर्थिक नियोजन नसेल त्यांचे हाल फारच होतात. आपल्या देशात सरकारनेच सर्व करावे अशी चुकीची संकल्पना घेऊन लोक वावरतात. सरकारची कर्तव्ये आहेत पण ती एका मर्यादेपर्यंत. प्रत्येकाला चमच्याने भरविणे हे सरकारचे काम नाही. प्रत्येकाकडे आणीबाणीच्या परिस्थितीत पुढील दोन महिन्यांचा खर्च करता येईल इतक्या रकमेची तरतूद हवी. जर अशी तरतूद नसेल तर त्याना चढ्या दराने कर्जे घ्यावी लागतात व त्यामुळे ती व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकली जाते किंवा गुंतवणुकीतून बाहेर पडावे लागते. त्यामुळे ज्या भविष्यातील उद्देशाने गुंतवणूक केलेली असेल ते उद्देश सफल होतीलच याची खात्री उरत नाही.

अगोदरच गुंतवणूक तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की, सहा महिन्यांचा खर्च चालू शकेल इतकी रक्कम सहज पैसे मिळणार्‍या गुंतवणूक पर्यायांत गुंतवावी. बँकांच्या मुदतठेवीच्या गुंतवणुकीतून सहज बाहेर पडता येते. गुंतवणूक रक्कम पूर्ण किंवा काही प्रमाणात पटकन हातात येऊ शकते. पण कोरोनामुळे आता गुंतवणूक तज्ज्ञ म्हणतात की, पुढील बारा महिन्यांच्या खर्चाची जी रक्कम असेल ती सहज पैसे मिळणार्‍या गुंतवणूक योजनांत गुंतवावी.

गुंतवणूक
भारतीयांना बचत करायला आवडते, पण बचत करणे व गुंतवणूक करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. आयुष्यात शक्य असेल तितक्या लवकर गुंतवणुकीस सुरुवात करावी. कित्येक व्यक्ती ४० वर्षांनंतर गुंतवणुकीचा विचार करतात. हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने चुकीचा निर्णय असतो. जेवढी तुमची गुंतवणूक जास्त तेवढे तुमचे म्हातारपण सुखकारक! निदान आर्थिकदृष्ट्या. शारीरिकदृष्ट्या हा वेगळा भाग. कोणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करताना तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करीत आहात त्या योजनेची संपूर्ण माहिती करून घ्या व ही गुंतवणूक करणे तुम्हाला गरजेचे आहे का? लाभदायक आहे का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला मिळाल्यानंतरच गुंतवणूक करा. तुमच्या कमी कालावधीच्या व दीर्घ कालावधीच्या गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करा.

म्युच्युअल फंड
लोकांची हल्ली म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे पावले वळू लागली आहेत. विशेषतः ‘सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान्स’मध्ये (एसआयपी) गुंतवणूक वाढत चालली आहे. याबाबतही म्युच्युअल फंड कंपन्या तुमचा पैसा कोणत्या कंपन्यांच्या ‘शेअर’मध्ये गुंतविणार आहेत त्याची माहिती करून घ्या. गरज पडलीच तर या विषयातील तज्ज्ञांचे मत विचारा.
गुंतवणूक करताना ‘नॉमिनेशन’चा तक्ता नक्की भरावा. फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असल्यास मृत्युपत्र/इच्छापत्रही करावे, नाहीतर गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते.

योग्य गुंतवणूक करा. गरज आहे त्या पर्यायांतच गुंतवणूक करा. गुंतवणुकीचे कायद्याने ठरविलेले सर्व सोपस्कार पूर्ण करा. यशस्वी गुंतवणूकदार व्हा! मनस्ताप झालेले गुंतवणूकदार होऊ नका. मनस्ताप व्हावा म्हणून मुद्दाम कोणी चुकीची गुंतवणूक करीत नाही, पण गुंतवणूक करतेवेळी योग्य काळजी न घेण्याने मनस्ताप होऊ शकतो! कधीकधी प्रारब्धाचाही भाग असतो. उदाहरण द्यायचे तर पीएमसी बँकेचे ग्राहक, सिटी को-ऑप. बँकेचे ग्राहक व अन्य काही बँकांचे ग्राहक. बँक सुस्थित असताना त्यांनी गुंतवणूक केली असणार, पण त्यांना कोठे माहीत असते की या बँकेचे संचालक ‘फ्रॉड माईंडेड’ आहेत. याला गुंतवणूकदारांनी आपले प्रारब्ध समजायचे; पण प्रारब्ध म्हणून सोडूनही द्यायचे नाही. योग्य काळजी घ्यायची. दक्षता बाळगावी.

STAY CONNECTED

846FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

बेलगाम कोरोना….

डॉ. राजेंद्र साखरदांडे लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा,...

मला भावलेले अनिल बाब

कामिनी कुंडईकर विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना....

‘अधिकस्य अधिकं फलम्’

नारायण बर्वे, वाळपई यावर्षी अधिकमास १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. आपणही अधिकमासाची,...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

ALSO IN THIS SECTION

आयपीएल फ्रेंचायझींचे चुकलेले आडाखे

धीरज गंगाराम म्हांबरे टी-ट्वेंटी हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या गैरहजेरीत आपला खेळ खेळाडूंना दाखवावा लागणार आहे....

अरण्य ः निसर्गसंपत्तीचे आगर

डॉ. सोमनाथ कोमरपंत जंगलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती आपल्या चिरस्थायी स्वरूपाच्या सौख्यासाठी आहे. या जाणिवेच्या अभावामुळे नव्या...

आर्थिक स्थैर्यासाठी सहा सूत्रे

शशांक मो. गुळगुळे कोविड-१९ चे कधी निर्मूलन होणार हे आजतरी खात्रीने सांगू शकणारी एकही व्यक्ती जगात नाही. जगात...

दगाबाज

दत्ताराम प्रभू-साळगावकर आपण ज्यांच्यावर विश्‍वास किंवा अतिविश्‍वास ठेवतो ते लोकच आपल्याला दगाफटका देतात. दणका देतात. एवढा की जन्मभर...

मी आई… म्हादई…

पौर्णिमा केरकर अलीकडे मला भीती वाटायला लागलीय… मला भास होताहेत… स्वप्ने पडत आहेत की माझा अंत जवळ आला...