लोबो, कामतांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर 26 जूनला सुनावणी

0
8

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर आमदार दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर येत्या दि. 26 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.

कॉंग्रेसच्या काही आमदारांनी पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यानंतर, काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो अनुपस्थित राहिल्याचा दावा अमित पाटकर यांचा आहे.

गोवा विधानसभेच्या सभापतीसमोर वर्ष 2022 मध्ये अमित पाटकर यांनी कामत आणि लोबो यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली. अमित पाटकर हे आमदार नसल्याने अपात्रता याचिका दाखल करू शकत नाही, असा दावा कामत आणि लोबो यांनी एका अर्जाद्वारे करून पाटकर यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळण्याची विनंती सभापतींकडे केली होती.

सभापती रमेश तवडकर यांनी दोन्ही आमदारांच्या अर्जावर सुनावणी घेऊन मागील आठवड्यात त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आमदारांच्याविरोधात कुणीही अपात्रता याचिका दाखल करू शकतो, असा निवाडा सभापतींनी दिला. अमित पाटकर यांनी दोघा आमदारांच्याविरोधात केलेला दावा सिद्ध झाल्यास दोघेही आमदार अपात्रतेच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी शक्यता आहे.