Home बातम्या लोक जनशक्ती पार्टीचा गोव्यात प्रवेश

लोक जनशक्ती पार्टीचा गोव्यात प्रवेश

0

विधानसभा निवडणुका लढवणार

तृणमूल कॉंग्रेसच्या पाठोपाठ लोक जनशक्ती पार्टीनेही गोव्यात प्रवेश केला असून ३ मार्च रोजी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत किमान २५ मतदारसंघात निवडणूक लढविण्याची माहिती पक्षाचे गोवा निरीक्षक मुकेश गुज्जर व लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्रनाथ उसगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राम विलास पासवान यांनी पाचही राज्यात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून गोव्यातील कार्यकारिणी दि. २२ रोजी बैठक घेऊन जाहीर करणार असल्याचे गुज्जर यांनी सांगितले. मागास जाती-जमाती व इतर मागास वर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी गोमंत बहुजन समाज परिषदेचे कार्यकर्ते गोव्यात गेली २५ वर्षे काम करीत आहे. या परिषदेचे आता वरील पक्षात विलिनीकरण करून गोव्यात राजकीय शक्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजनसमाज परिषदेचे हजारो कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले आहेत. मागास जमातीच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पाया उभारण्याचे काम परिषदेने केले आहे. त्यामुळे हा समाज या निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर राहणार हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल, असे गुज्जर व उसगावकर यांनी सांगितले. कॉंग्रेस असो किंवा भाजपा, या दोन्ही पक्षांनी मागास जमातीच्या प्रश्‍नांचे निवडणुकीसाठी भांडवल म्हणूनच उपयोग केल्याचा आरोप उसगावकर यांनी केला. पत्रकार परिषदेस के. एच. भोसले उपस्थित होते.