लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात शिथिलतेमुळे रहदारी वाढली

0
158

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात जास्त शिथिलता देण्यात आल्याने रस्त्यावरील वाहनांची रहदारी, बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात कदंबच्या बसगाड्या वाहतूक करीत होत्या. तर, खासगी बसगाड्या मोजक्याच प्रमाणात वाहतूक करीत होत्या. या शिथिलतेच्या काळात मार्केटमध्ये नागरिकांच्या गर्दीच्या प्रमाणात वाढ होत असून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांकडे पालन कडक करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यातील केशकर्तनालये सुरू करण्यात आली असून केशकर्तनालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दुचाकी व चारचाकी वाहनातील प्रवाशांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

दरम्यान, पणजी महानगरपालिकेचे मुख्य मार्केट आगामी दोन दिवसांत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.

लॉकडाऊनच्या काळात पणजी महानगरपालिकेचे मार्केट बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून मार्केटमधील फळ, भाजी विक्रेत्यासाठी मार्केटच्या बाजूला पर्यायी व्यवस्था केली आहे. तर, मासळी मार्केट सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. आता, महानगरपालिकेचे मुख्य मार्केट सुरू करण्यासाठी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.