Home बातम्या लंडन कॉलिंग…

लंडन कॉलिंग…

0

अवघ्या जगभरातील क्रीडापटूंची पंढरी बनलेल्या ऑलिंपिक्स क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज लंडनमध्ये होतो आहे. आपल्या देशात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेबाबत जेवढी उत्कंठा असते, तेवढी इतर खेळांबाबत क्वचितच दिसते, तरीही लंडन ऑलिंपिक्सबाबत बर्‍यापैकी वातावरणनिर्मिती झालेली आहे. आजवरचा आपला सर्वांत मोठा म्हणजे ८१ क्रीडापटूंचा संघ या स्पर्धेसाठी भारताच्या वतीने यावेळी पाठवण्यात आला आहे. तेरा क्रीडाप्रकारांच्या ५४ सामन्यांमधून ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे पदकांची अपेक्षाही वाढलेली आहे. मेरीकॉम, साइना नेहवाल, अभिनव बिंद्रा, सुशीलकुमार अशा आपल्या क्रीडापटूंकडून पदकांची अपेक्षा आहे. काही नवे चेहरेही विजयश्रीची माळ आपल्या आणि पर्यायाने भारताच्या गळ्यात घालतील अशी अपेक्षा आहे. आपल्या करदात्यांकडून गोळा झालेले अडीचशे कोटी रुपये आपल्या खेळाडूंवर आपण खर्च केलेले आहेत. त्यामुळे या देशाच्या शंभर करोड जनतेचा मान ठेवणारे यश प्राप्त करण्यासाठी हे क्रीडापटू जिवाचे रान करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. इतर अग्रगण्य देशांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंना उपलब्ध सुविधा आणि प्रशिक्षणाचा दर्जाही अत्यंत सामान्य असतो हे वास्तव मात्र आपल्याला नाकबूल करता येणार नाही. जे खेळाडू सध्या लंडनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यापैकी बहुतेकांची सांपत्तिक स्थिती सामान्य आहे.

खेड्यापाड्यांमध्ये ते वाढले आहेत. जेथे धड क्रीडासुविधा नाहीत, प्रशिक्षक नाहीत, प्रशिक्षणाची साधने नाहीत अशा प्रतिकूल वातावरणामध्ये घडलेले हे चेहरे आहेत. अशाच चेहर्‍यांमधून देशाची मान उंचावणारे चेहरे पुढे येतात तेव्हा त्या यशाचे मोल मोठे असते. यश प्राप्त करण्यासाठी संसाधने तर जरूरीची असतातच, पण त्याहून जरूरी असते ती जिंकण्याची ईर्षा आणि त्यासाठी आवश्यक असलेली ढोरमेहनत. या मेहनतीच्या, परिश्रमांच्या बळावर भारताच्या पदरात यंदा घसघशीत पदके या खेळाडूंनी मिळवून दिली तर तो सुवर्णयोगच ठरेल. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून भारताचा सहभाग या स्पर्धेमध्ये राहिला आहे. १९२० साली अँटवर्प येथील ऑलिंपिक्समध्ये पहिल्यांदा भारतीय संघ दाखल झाला तेव्हापासून आजवर जेमतेम २० पदके भारतीय क्रीडापटूंना प्राप्त झालेली असली तरीही भारतीय क्रीडापटूंना आपले क्रीडानैपुण्य दाखवण्याची आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे तपासण्याची ही संधी असल्याने पदकप्राप्तीपेक्षाही या अनुभवप्राप्तीसाठी भारतीय खेळाडूंसाठी ही पर्वणी ठरणार आहे. एकेकाळी हॉकीमध्ये भारतीय संघाचे मोठे प्रस्थ होते. स्व. ध्यानचंदांपासून चालत आलेली ती परंपरा खंडित झालेली आहे. हॉकीमधील भारताचा सुवर्णकाळ आज राहिलेला नाही. काही मोजक्याच क्रीडाप्रकारांमध्ये भारत सहभागी झालेला असल्याने त्या मोजक्याच स्पर्धांमध्ये पदकांची आशा आहे. पण असे असले तरीही या क्रीडास्पर्धेतील भारताच्या सहभागाकडे अवघा देश डोळे लावून बसलेला आहे. त्यामुळे या अपेक्षेला आपले क्रीडापटू पायदळी तुडवणार नाहीत आणि देशाच्या शंभर कोटी जनतेला निराश करणार नाहीत अशी आशा करूया. लंडन ऑलिंपिक्स सुरू होण्याआधीपासूनच छोट्या मोठ्या वादांच्या गर्तेत सापडलेले आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच जवळजवळ एकशे सात खेळाडू डोपिंगच्या आरोपावरून अपात्र ठरले आहेत. डोपिंग ही क्रीडा क्षेत्रातील केवढी मोठी समस्या ठरते आहे त्याची साक्ष ही आकडेवारी देते. यंदाच्या क्रीडास्पर्धेवर डोपिंगचे सावट राहू नये. दहशतवादाचेही मोठे सावट यंदाच्या या क्रीडा स्पर्धेवर आहे. काल परवाच एका अकरा वर्षाच्या मुलाने तिकीट नसताना, पासपोर्ट नसताना, बोर्डींग पास नसताना विमानातून इटली गाठल्याची एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे. त्यामुळे जगभरातून येणार्‍या खेळाडूंना लंडन कशी सुरक्षा पुरवील त्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. साधनसुविधांच्या बाबतीत तक्रारी येऊ लागल्या आहेत. शहराची वाहतूक व्यवस्था संपामुळे ढेपाळलेली आहे, पण या सर्व संकटांचा सामना करीत या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडाव्यात आणि भारताच्या पदरात काही घसघशीत पदके पडावीत अशी आस बाळगूया.