Home बातम्या ‘रोमी’ वाल्यांची चाल ओळखा

‘रोमी’ वाल्यांची चाल ओळखा

0

– शि. कृ. रिवणकर, बांदिवडे बंदर

रोमी कोकणी हा एक अपघात आहे. हजारो वर्षांपासून गोव्यात मराठी होती. सहाव्या वा सातव्या शतकात कर्नाटकातील बदामीचे चालुक्य आणि त्यानंतरही अनेक वंशांच्या मराठीयेतर राजघराण्यांनी गोव्यावर राज्य केले. गोव्याचे वाचन, लेखन, सांस्कृतिक, धार्मिक आदी कार्यक्रम मराठीतूनच होत असत, ह्याचे अनेक पुरावे आहेत. परंतु विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यातील गोवा परत मिळवण्यासाठी तिमोजीने आल्बुकर्क या पोर्तुगीज सरदाराला गोव्यात आणले. मात्र तो गोव्यात येताना तलवार आणि क्रॉस घेऊन आला. हिंदूंची मंदिरे पाडून, हिंदूंचे ग्रंथ जाळून, हिंदूंची संस्कृती नष्ट करू लागला. हिंदू हे पाखंडी असून त्यांचा धर्म अंधश्रद्धेवर आधारलेला आहे, असे सांगू लागला. हिंदूंना सुधारण्यासाठी त्याने मंदिरांच्या जागी चर्चेस बांधल्या. हिंदू धर्माचरण करणार्‍यांना सुधारण्यासाठी ते त्यांना जिवंत जाळत असत. त्यांचे हात – पाय तोडत असत. आई वडील नसलेल्या मुलींना जबरदस्तीने ताब्यात घेऊन ख्रिस्ती केले जायचे. गोव्यातील हिंदूंना त्यांच्या मराठी संस्कृतीपासून तोडण्यासाठी, पोर्तुगीज भाषेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी येथील प्राचीन मराठीमध्ये पोर्तुगीज शब्द घुसडले आणि रोमी कोकणी जन्माला आली.

पोर्तुगिजांच्या आगमनापूर्वी गोव्यात कोकणी होती की नाही हे शणै गोंयबाबसुद्धा सांगू शकत नाहीत. तात्पर्य, रोमी कोकणीचा जन्मच मुळी मराठीला मारण्यासाठी झालेला आहे. हिंदूंना पोर्तुगीज प्रदेशातून अनेकदा हाकलून लावण्यात येई. गोव्यातील तिसवाडी, बार्देश, मुरगावसहित सासष्टीत धर्मांतरित ख्रिस्तींचे साम्राज्य होते. इथेच रोमी कोंकणीचा विकास झाला. मराठीचा संबंध पोर्तुगीज ह्या दुबळ्या भाषेशी आल्याने रोमी कोकणीचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला नाही. परदेशात जाण्याकरिता लोक इंग्रजीही शिकत होते. पोर्तुगीज भाषेत वैद्यकीय ज्ञानाची पुरेशी पुस्तके नव्हती. फ्रेंच भाषेतून त्यांना वैद्यकशास्त्र शिकावे लागायचे. अजूनही गोव्यात फ्रेंच शिकवले जाते, त्याचे मुख्य कारण हेच आहे. पोर्तुगीज भाषेच्या दुबळेपणामुळे गोवेकरांना इंग्रजी, फ्रेंच आदी भाषा शिकाव्या लागायच्या.

१९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर गोव्यातील पोर्तुगीज दैनिकही इंग्रजीत रूपांतरित करण्यात आले आणि आज त्याच दैनिकाने येथील मराठीच्या सांस्कृतिक परंपरेची दखल घेऊन आपली मराठी आवृत्ती सुरू केलेली आहे. हा मराठीचा विजय आहे. रोमी कोकणीमध्ये काय आहे? कोणते साहित्य आहे? ख्रिस्ती गोवेकरांकरिताच मर्यादित असलेले धार्मिक आणि तियात्र आदी त्यात होते. व त्याची संख्या दिवसेंदिवस घटत होती. आता दाल्गाद अकादमी आणि तियात्र अकादमी स्थापन झाल्याने नवीन पुस्तकांची भर पडत असली तरी कपाटांची शोभा वाढवण्यापुरतेच त्यांचे मर्यादित कार्य आहे. कर्नाटकातील ख्रिस्ती समाजाचे साहित्य कानडी लिपीत, तर कोचीनमधील ‘राखणो’ पत्रक आणि इतर कोकणी साहित्याकरता मल्याळी लिपी वापरली जाते. रोमी लिपीतील कोकणी आणि पोर्तुगीज, लॅटिन उच्चारानुसार आणि आता इंग्रजी उच्चारांनुसार लिहिण्याचा घोळ असल्याने तसेच विविधांगी, प्रगल्भ साहित्याचा अभाव असल्याने ख्रिस्ती समुदायाने इंग्रजीला जवळ केले आहे. त्यांना कोकणी हवी आहे ती केवळ मराठीला विरोध करण्यासाठी!

गोवा मुक्तीनंतर गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा त्याला विरोध करायला कोकणीचा आश्रय घेण्यात आला. देवनागरी कोकणीमध्ये काही साहित्यच नव्हते. शणै गोंयबाब आणि त्यांच्या काही समविचारी व्यक्तींनी लिहिलेली दहा एक पुस्तके देवनागरी कोकणीत होती. मग कोकणीला साहित्य अकादमीची मान्यता मिळवण्यासाठी रोमी कोकणीमधील तेराशे पुस्तके दाखविली गेली. त्याच्या आधारे मान्यता मिळवली गेली. कोकणीने गोव्यात मराठी विरोधी कार्याचा पाया घातला. ख्रिश्‍चन समुदायाला दुबळी रोमी कोकणी मुळीच नको आहे. त्यांना इंग्रजी हवी आहे. गोव्यातील इंग्रजीचे अढळपद निश्‍चित असल्याने ते सुखी समाधानी आहेत. मराठी विरोधाचे राजकारण काही हिंदूंनीच सुरू केल्याने रोमीवाल्यांनी त्यांना सहाय्य करून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मराठीचा पराभव केला, नंतर भाषावादामध्ये पराभव केला आणि आसुरी आनंदाने सुखाचा सुस्कारा सोडला.

१९८५ साली असंतुष्ट ख्रिस्ती राजकारण्यांनी केवळ आपले राजकारण खेळण्यासाठी कोकणी राजभाषा करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मराठी राजभाषा प्रस्थापन समितीने तेव्हा मराठी राजभाषेसाठी लढा आरंभला, तेव्हा ‘तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, मराठीचा गजर सोडू नये’ म्हणणारे कै. नारायण आठवले व रमाकांत खलप यांनी कोकणीही राजभाषा करावी असे ठासून सांगितले. सहिष्णू, मवाळ मराठीवाद्यांनी ते मान्य केले आणि फसले. दोन्ही भाषांना राजभाषा करण्याऐवजी कोकणीला राजभाषा आणि मराठीचा वापर राजकारभारात करण्याची मोकळीक देण्यात आली. या पलीकडे काहीच अधिकार दिले नाहीत. दोन्हींना समान दर्जा व मराठीला मानाचे स्थान असल्याची थाप मारून शांत केले आणि फसवले. ऐनवेळी व्हीपचा बडगा उगारून कोकणी राजभाषा केली गेली आणि नंतर मराठीला चिरडण्यासाठी एकेक पाऊल टाकायला सुरूवात झाली. पण अजूनही मराठी ताठ मानेने उभी आहे आणि कोकणीचीच दमछाक होताना दिसत आहे. मागे टपाल खात्याच्या नोकरभरतीच्या वेळी मराठीवर अन्याय केला गेला. मराठीवाद्यांनी आवाज उठवल्यानंतर सरकार ताळ्यावर आले आणि तो अन्याय दूर केला गेला. मराठी राजभाषा ही कोकणीची मृत्युघंटा ठरेल याची नेत्यांना जाणीव आहे, म्हणून कोकणी राजभाषेला जगवण्यासाठीच मराठीचे हक्क डावलले जातात.

सरकारी नोकरांना एक महिन्याचे कोकणी प्रशिक्षण कोकणी अकादमी देते. नोकरीमध्ये कायम होण्यासाठीच तो अभ्यासक्रम केला जातो. पोर्तुगीज काळात पोर्तुगीज शिकणे अनिवार्य होते. एखाद्याला पोर्तुगीजमध्ये सही करता आली तरी तो सुशिक्षित समजला जाई. त्याप्रमाणे आज गोव्याबाहेरच्या लोकांनी एका महिन्याच्या कोकणी अभ्यासक्रमाला हजेरी लावली तरी तो कोकणीभाषक ठरतो. मग तो सदा सर्वकाळ हिंदीमध्ये का बोलेना! गोवा आज बहुभाषिक बनत चालला आहे. भजन, कीर्तन, सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारामध्ये मराठीचा वापर प्रकर्षाने दिसून येतो. कोकणी राजभाषा होऊन पंचवीस वर्षे लोटली तरीही तिची प्रगती झालेली नाही. कोकणीचे कैवारी उदय भेंब्रेच सांगतात की कोकणी प्रमाणित व्हायला आणखी पन्नास वर्षे लागतील, ह्यावरून कोकणीचा दुबळेपणा सिद्ध होतो. गोव्यातील मराठीचे अढळ स्थानही सिद्ध होते. आता मराठी राजभाषेचा लढा नव्याने सुरू झाल्यामुळे मराठीच्या कार्यात विघ्न आणण्यासाठीच रोमी कोकणीवाले मराठीचा आधार घेत आहेत. त्यांना रोमी राजभाषा हवी होती तर त्यांनी पुढाकार करून चळवळ का उभारली नाही? मराठी अस्मितावाल्यांनी रोमीच्या कार्यक्रमांमागे का जावे? रोमीवाल्यांना चिथावून ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा मिळेल काय? ख्रिस्ती समाजाला आज इंग्रजी हवी आहे. ते त्यांच्या शाळांतून मराठी शिकवतील? मराठीसाठीच्या उपोषणात एकही रोमीवादी का नव्हता? फादर प्रताप नाईक सकाळी येऊन गेले. पाच वाजेपर्यंत ते उपोषणाला नाही बसले! रोमीवाल्यांना लढायचे नाही. रोमीवाल्यांपासून आपण सावध राहायला हवे. मराठीची चळवळ मराठीवाद्यांनीच चालवावी. मराठीचा विजय निश्‍चित आहे!