रूबी रेसिडन्सी दुर्घटनेचा अहवाल खुला करा : कॉंग्रेस

0
99

काणकोण येथील रूबी रेसिडेन्सी इमारत कोसळण्याच्या प्रकरणी सरकारने नियुक्त केलेल्या व्ही. के. झा आयोगाचा अहवाल जनतेसाठी खुला करण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
झा आयोगाच्या अहवालातील काही मुद्दे मान्य नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकतेच सांगितले होते. सरकारला वरील अहवालात हेराफेरी करण्याचा मुळीच अधिकार नाही. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी याच प्रकरणात निलंबित करून अटक केलेले तत्कालीन काणकोण पालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत शिरोडकर व प्रदीप नाईक यांची सरकारच्या महत्वाच्या पदांवर नियुक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अयोग्य आहे. वरील अधिकार्‍यांचा भाजपकडे संबंध असल्यामुळेच त्यांना बक्षिसी दिल्याचा आरोप कामत यांनी केला. त्याची त्वरित पदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे. रूबी रेसिडेन्सी अपघात प्रकरणी निलंबित केलेल्या अन्य अधिकार्‍यांना वेगळा न्याय का? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे.
दरम्यान, पणजी महापालिका क्षेत्रात कचर्‍याचे ढीग झाले आहेत. महापालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रिग्स गेल्या दि. २२ पासून गायब झाले आहेत. या पदासाठी पूर्णवेळ देणार्‍या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची माणगी कामत यांनी केली. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पणजी व आजू बाजूच्या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. आयुक्त नसल्याने या सर्व कामाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले.