खाण अवलंबितांसाठीची कर्जमुक्ती योजना अडली

0
89

५ वा ई-लिलावही लांबणीवर
ट्रक, बार्जेस व मशिनरी मालक या खाण अवलंबितांना कर्जमुक्त करण्यासाठी खाण खात्याने जी योजना तयार केलेली आहे त्या योजनेची गेल्या दोन चार दिवसांपासून अडून पडलेली अधिसूचना आता आज किंवा उद्या येण्याची शक्यता खाण खात्यानी सूत्रांनी व्यक्त केली. या योजनेसाठीचे सगळे सोपस्कार यापूर्वीच पूर्ण झालेले असून काही तांत्रिक अडचणीमुळे योजनेची अधिसूचना गेल्या दोन चार दिवसांपासून अडून पडलेली आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले.
ट्रक, मशिन तसेच बार्जमालकांसाठीची ही योजना खरे म्हणजे १ सप्टेंबर रोजीच अधिसूचित होणार होती. ट्रकमालकांना दोन ट्रकांवरील कर्जासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बार्जमालकांच्या कर्जाच्या मुद्दल रकमेवरील ३५ टक्के भार सरकार उचलणार आहे. सरकारला जास्तीत जास्त ४०० कोटी रु.ची तरतूद करावी लागणार आहे. दरम्यान, ही योजना मार्गी लागल्यानंतर ट्रकांवरील चालक तसेच इतर कामगारांसाठीही योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.
ई-लिलाव लांबणीवर
दरम्यान, गोव्यातील विविध जेटींवर असलेल्या खनिज मालाचा पाचव्या टप्प्यातील ई-लिलावही लांबणीवर पडलेला असून आता तो पुढील आठवड्यात होण्याची शक्यता खाण खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली. काही तांत्रिक कारणामुळे हा ई- लिलाव पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या पाचव्या टप्प्यात १९ लाख दशलक्ष टन खनिजाचा लिलाव होणार असून त्याद्वारे अंदाजे २८७ कोटी रु. एवढा महसूल प्राप्त होणार आहे.