राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर

0
25

गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन होणार असून, 22 ते 24 ऑगस्टपर्यंत त्यांचे राज्यात वास्तव्य असेल. या दरम्यान त्या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे या नात्याने हजर राहण्याबरोबरच गोवा विधानसभेतही त्यांचे भाषण होणार आहे. त्याशिवाय त्या राज्यातील अनुसूचित जमातींतील लोकांची भेट घेणार असून, आग्वाद किल्ला, बासिलिका ऑफ बॉम जिझस तसेच शांतादुर्गा मंदिराला भेट देणार आहे.गोव्यात आगमन झाल्यानंतर दि. 22 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पणजीतील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील. याच दिवशी त्यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्याला त्या हजर राहतील. दि. 23 रोजी राष्ट्रपती गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे या नात्याने हजर राहणार आहेत. हा सोहळा राजभवन येथील दरबार हॉलमध्ये संपन्न होणार आहे. या दिवशी त्या अनुसूचित जमातीतील लोकांशी संवाद साधतील. तद्नंतर संध्याकाळी त्यांचे गोवा विधानसभेत भाषण होईल. दि. 24 रोजी त्या आग्वाद किल्ला, जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्च व शांतादुर्गा मंदिराला भेट देतील. नंतर त्यांचे दिल्लीकडे प्रयाण होईल.