राज्यात मोसमी पाऊस ७ टक्के कमी

0
8

>> राज्यात पाण्याच्या तुटीची शक्यता नाही

>> हवामान विभागाची माहिती, धरणे भरली

राज्यात आत्तापर्यंत मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य असले तरी ७ टक्के कमी नोंद झाले आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण ५० टक्के कमी नोंद झाले आहे. सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत काही प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील सत्तरी, पेडणे या भागात पावसाचे प्रमाण जास्त नोंद झाले आहे. तर, मुरगाव आदी किनारी भागात पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले आहे, अशी माहिती येथील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम. राहुल यांनी दिली.

पावसाचे प्रमाण सामान्य असले तरी राज्यात पाण्याचा पुरवठा करणारी धरणे भरलेली आहेत. गोव्यात पावसाळ्यानंतरसुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याच्या तुटीची शक्यता कमीच आहे, असेही राहुल यांनी सांगितले. मागील दोन तीन वर्षात राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात पावसाची नोंद होत होती. तथापि, या वर्षी ऑगस्टमध्ये पावसाची ५० टक्के कमी नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यास सप्टेंबरच्या अखेरीस जास्त पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी नोंद होऊ शकते, असेही राहुल यांनी सांगितले. राज्यात वर्ष २०२१ मध्ये १०६ टक्के पावसाची नोंद झाली. वर्ष २०२० मध्ये १४२ टक्के आणि वर्ष २०१९ मध्ये १३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये १९ टक्के कमी नोंद झाली आहे. या वर्षी आत्तापर्यंत वाळपई, पेडणे, सांगे, केपे, काणकोण या भागात जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर, मुरगाव, दाबोळी या किनारी भागात पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले आहे.