सीबीआय पथकाकडून कर्लिस शॅकचा तपास

0
9

>> अभिनेत्री सोनाली फोगट मृत्युप्रकरण

भाजप नेत्या, अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयच्या खास पथकाने हणजूण येथील कर्लिस शॅकला काल भेट देऊन तपास केला.

गेल्या २३ ऑगस्ट २०२२ रोजी सोनाली फोगट यांचा हणजूण – वागातोर येथे मृत्यू झाला होता. सोनाली फोगट आपल्या दोन सहकार्‍यांसमवेत वास्तव्यास असलेल्या ग्रॅण्ड लियोन हॉटेलला सीबीआयच्या पथकाने शनिवारी भेट देऊन नऊ ते दहा तास तपास केला होता.

सोनाली ह्या हणजूण येथील कर्लिस शॅकमधील पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या ठिकाणी सोनाली यांना पेयातून अमलीपदार्थ पाजण्यात आला.

पोलिसांनी कर्लिस शॅकच्या स्वच्छतागृहातून अमलीपदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी एकूण पाचजणांना अटक केली आहे. कर्लिस शॅकचे बेकायदा बांधकाम मोडण्यात आले आहे. तर, कर्लिस शॅकचा कायदेशीर भाग अद्यापपर्यंत कायम आहे.
कर्लिसमधील पार्टीत सोनाली यांना अमलीपदार्थ पाजण्यात आल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना कर्लिस क्लब शॅकच्या स्वच्छतागृहात डांबून ठेवण्यात आले होते.
सीबीआयच्या पथकाने त्या स्वच्छतागृहाची पाहणी करून तपासकाम करून काही पुरावे गोळा केले आहेत. या कर्लिस क्लबच्या एडवीन नुनीस याला सोनाली फोगट मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात अटक केली. न्यायालयाने एडवीन नुनीस याला जामीन मंजूर केला आहे.

सीबीआयकडून अमलीपदार्थ प्रकरणाच्या चौकशीसाठी एडवीन याला ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, सीबीआयकडून या प्रकरणात गोवा पोलिसांनी अटक केलेले सोनाली फोगट यांचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.