Home बातम्या राज्यात पेट्रोलची कृत्रिम टंचाई दुसर्‍या दिवशीही सुरूच

राज्यात पेट्रोलची कृत्रिम टंचाई दुसर्‍या दिवशीही सुरूच

0

दोन एप्रिलपासून पेट्रोल स्वस्त झाल्याने वाहनचालकांनी सोमवारी पेट्रोल पंपांवर जशी प्रचंड गर्दी केली होती, तशीच कालही केल्याचे दिसून आले. पेट्रोल संपेल या भीतीने अतिरिक्त पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न वाहनचालक करीत होतेच, शिवाय शेजारील राज्यांतील बरीच वाहनेही टाक्यांत पेट्रोल भरून घेण्यासाठी गोव्यातील पंपांवर धाव घेत असल्याचे दिसून येत होते. विशेषतः सीमाभागांमध्ये हे दृश्य सर्रास दिसत होते. कर्नाटकात पेट्रोल ७४ रूपये लिटर असल्याने त्या राज्याच्या गोव्याच्या जवळच्या भागातील वाहनचालक पोळे व काणकोण येथे येऊन पेट्रोल भरून घेत आहेत, तर बांदा, दोडामार्ग भागातील वाहनचालकांनी गोव्यात येऊन टाक्या भरून घेणे पसंत केले आहे.

कॅनमध्ये पेट्रोल विक्रीस मनाई असताना पणजीत पावलो ट्रॅव्हल्स कार्यालयाजवळ काल दुपारी महाराष्ट्राच्या क्रमांकपट्टीच्या कारमध्ये कॅनमधून राजरोस पेट्रोल भरले जात होते. अनेक पंपांवर सर्रास कॅनमध्ये पेट्रोल देण्यात येत असून पेट्रोल स्वस्त करणार्‍या सरकारचे त्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्यावर मात्र अजिबात नजर नसल्याचे दिसून येत होते. तेल कंपन्यांनी राज्यात मागणीत अपेक्षित असलेली वाढ लक्षात घेऊन अतिरिक्त पुरवठ्याची व्यवस्था करायला हवी होती, परंतु अनेक पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल मागवण्यापेक्षा स्पीड व तत्सम महागडे पेट्रोल विकून वरकमाई करण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून येत होते. वाहनचालकांना पेट्रोल नसल्याचे सांगून ‘स्पीड’ पेट्रोल भरायला लावण्याचा प्रकार कालही पणजीत सर्रास सुरू होता.

राज्यातील ही पेट्रोल टंचाई कृत्रिम असून सरकारच्या नावे जनतेने बोटे मोडावीत यासाठी काही शक्ती प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया जनतेमध्ये व्यक्त होत होती.

पेट्रोलचालकांचे म्हणणे वाहनचालकच जबाबदार

राज्यात पेट्रोल टंचाई निर्माण होण्यास वाहनचालकच जबाबदार असल्याचा आरोप काल पणजीतील पेट्रोल पंपचालकांनी केला. या संबंधी बोलताना पणजीतील पेट्रोल पंपचालक अनंत काणे म्हणाले की, सोमवारी संध्याकाळी ५ वा. १२ हजार लीटर पेट्रोल आणले होते, मात्र मंगळवारी सकाळी ते संपले. लोक पेट्रोलसाठी प्रचंड गर्दी करत असून आणलेले पेट्रोल संपत असल्यामुळे टंचाई निर्माण होत आहे. केंद्र सरकार पेट्रोलचे दर वाढवणार असल्याची शक्यता असल्याने वाहनचालक भीतीपोटीच आपणाकडे जेवढी वाहने आहेत त्यांच्या टाक्या पूर्ण भरत असल्याचे श्री. काणे म्हणाले. आपल्या पंपावर रोज ६ हजार लीटर एवढ्या पेट्रोलची विक्री होत असते. मात्र पर्रीकर सरकारने पेट्रोलचे दर कमी केल्यापासून सकाळपासून दुपारपर्यंत ८ हजार लीटर पेट्रोल लीटर एवढ्या पेट्रोलची विक्री झाली. त्यामुळेही पेट्रोल संपत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे येथील मांगिरीश सर्व्हिसेस या पेट्रोलपंपचे मालक गौरीश दळवी म्हणाले की, सोमवारी १२ हजार लीटर एवढे पेट्रोल आणले होते. मात्र ते मंगळवारी सकाळपर्यंत संपले. मागणी व पुरवठा सुरळीत होईपर्यंत पुढील दोन दिवस पेट्रोल टंचाई राहू शकेल असे ते म्हणाले. मात्र साठेबाजीचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. आमच्या टाक्यांत किती पेट्रोल आहे हे कुणालाही पाहता येते असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकांनी पेट्रोलसाठी प्रचंड गर्दी केल्यानेच काल दुसर्‍या दिवशी गोवाभर पेट्रोलची टंचाई होती.

संधीचा फायदा उपटण्यास काळाबाजारही सक्रिय

राज्यात पेट्रोल लिटरमागे तब्बल अकरा रुपयांनी स्वस्त झाल्याने पेट्रोलचा काळाबाजार करून शेजारील राज्यांत विकण्यासाठी काळाबाजारी सज्ज झाले असून गोव्यातील पंपांवर मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरून घ्यायचे आणि आपल्या राज्यात विकायचे असे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. कॅनमध्ये पेट्रोल विक्री करण्यास मनाई असताना सर्रास कॅनमध्ये पेट्रोल विकले जाताना दिसत आहे. राज्यातील पेट्रोल माफिया सक्रिय झाले असून पंपांवरून पेट्रोल मिळवून थोड्या अधिक दराने गरजूंना विकले जाऊ लागले आहे. खुद्द पणजीतही असे प्रकार दिसत होते. गोव्यात काही शहरांमध्ये चोरट्या पेट्रोल विक्रीचे अड्डे नागरी पुरवठा खात्याच्या कृपाशीर्वादाने अनेक वर्षे चालत आलेले असून त्यांना ही स्वस्ताई म्हणजे पर्वणीच वाटू लागली आहे. एका लिटरमागे पाच रुपये सहज उकळता येत असल्याने त्यांना या व्यवहारात प्रचंड नफा दिसू लागला आहे. वाहनांना खास मोठ्या टाक्या बसवून घेऊन त्यात पेट्रोलची साठेबाजी करण्याच्या क्लृप्त्याही नजीकच्या काळात लढवल्या जातील अशी चिन्हे दिसत आहेत.

दोडामार्गवरही पेट्रोलसाठी झुंबड

गोव्यात पेट्रोल ११ रुपयांनी स्वस्त झाल्याने पेट्रोलसाठी गोव्याप्रमाणेच दोडामार्ग येथील दोन्ही पेट्रोलपंपवर झुंबड उडाली होती. सायंकाळी उशिरापर्यत वाहनचालकांची रांग लागलेली होती. अनेकजण आपल्या वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत असल्याचे निदर्शनास आले. पेट्रोलचे दर कमी केल्यानंतर सोमवारी काही तासांतच पेट्रोल संपले होते. मंगळवारी सकाळी पेट्रोल आल्यानंतर भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या.