राज्यात गुजरात भवन बांधण्यासाठी हरकत नाही. गोवा सरकार गुजरात भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करू शकत नाही. त्यांनी गुजरात भवनासाठी जमीन खरेदी करावी आणि बांधावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपने आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअर्तंगत आयोजित गुजरात स्थापना दिन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल केले.
एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत विविध राज्यातील नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठी आयोजन केले जात आहे. राज्यात गुजराती नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुजराती समाजाचे गोव्याच्या विकासात योगदान देत आहेत. या समाजाकडून मडगाव येथे दिव्यांग मुलांसाठी विद्यालय चालविण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गुजराती लोकांचे गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. 90 टक्के गुजराती लोक मुख्यमंत्री किंवा आमदारांकडे नोकऱ्या मागण्यासाठी जात नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.
या कार्यक्रमात गुजराती बांधवांकडून राज्यात गुजरात भवन बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.