राज्यात कोविड-१९ची तिसरी लाट

0
18

>> ओमिक्रॉनचे आतापर्यंत पाच रुग्ण

>> आरोग्य संचालिका डॉ. आल्मेदा यांची पत्रकार परिषदेत कबुली

कोविडच्या तिसर्‍या लाटेने २८ डिसेंबर रोजी गोव्याला धडक दिली असल्याचे आरोग्य संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडेकर व कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांच्यासह काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. गेल्या २४ तासांत राज्यात ५९२ कोविड रुग्ण सापडले असून पॉझिटिव्हीटी दर हा तब्बल १३.८९ टक्के एवढा झालेला आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे डॉ. आल्मेदा यांनी स्पष्ट केले. गेल्या २८ डिसेंबरपासून राज्यात सातत्याने कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे २८ डिसेंबरपासून राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने धडक दिली आहे, असे म्हणता येणार असल्याचे डॉ. आल्मेदा म्हणाल्या.

गेल्या २४ तासांत राज्यात ४२५१ जणांची कोरोनासाठीची चाचणी करण्यात आली असता त्यापैकी ५९२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले असल्याचे त्या म्हणाल्या.
चाचण्यांची संख्या वाढवणार
राज्यात कोविडची तिसरी लाट आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार असून रोज किमान ३५०० ते ४००० जणांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. आल्मेदा यांनी दिली.

खाटांची सोय
गोमेकॉत कोविड रुग्णांसाठी ८३० खाटांची सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय उत्तर गोव्यात अन्यत्र आणखी १०० खाटांची सोय आहे. दक्षिण गोव्यात जुन्या हॉस्पिसियो इस्पितळात २०० खाटांची सोय असल्याचे त्या म्हणाल्या. उत्तर व दक्षिण जिल्हा इस्पितळांबरोबरच दोन्ही ठिकाणच्या उपजिल्हा इस्पितळातही कोविडसाठीच्या खाटांची सोय करण्यात आली असल्याची माहितीही डॉ. आल्मेदा यांनी दिली.

राज्यात ओमिक्रॉनचे पाच रुग्ण
आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे पाच रुग्ण सापडले आहेत. जो एका स्थानिक रुग्ण सापडला आहे तो कोल्हापूरला गेला होता. त्यामुळे तेथे गेला असता त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असावा, असा संशय असल्याचे त्या म्हणाल्या. तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या खाली आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गर्दी टाळा : डॉ. बोरकर
राज्यात आलेल्या कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे असे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, लोकांनी राजकीय पक्षांच्या सभांनाही जाणे टाळणे हितावह आहे.

तुम्ही लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा, सामाजिक अंतर ठेवा, कोविड एसओपींचे पालन करा असे आवाहन करता, पण राज्यात विविध पक्षांच्या सभा होत असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ह्या सभांना शेकडो लोक उक्षस्थिती लावत असतात. त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे, असे पत्रकारांनी विचारले असता डॉ. बोरकर म्हणाले की लोकांना आपणहून स्वत:वर निर्बंध घालून घेण्याची गरज आहे. लोकांनी राजकीय सभांनाही जाऊ नये, असे ते म्हणाले.

१५ हजार मुलांचे लसीकरण
१५ ते १८ या वयोगटातील सुमारे १५ हजार मुलांचे लसीकरण झाले असल्याचे राज्यातील कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती देताना स्पष्ट केले.ह्या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सुमारे ८ हजार मुलांचे तर मंगळवारी सुमारे ७ हजार मुलांचे लसीकरण करण्यात आल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत ह्या वयोगटातील २० टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. या वयोगटातील ७४,१९२ मुले राज्यात असून या सर्व मुलांचे आठवडाभरात लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ह्या मुलांसाठी लशीचे ७२ हजार डोस पुरवण्यात आलेले असून सप्टेंबर २०२२ पर्यंत ते वापरले जाऊ शकतात असे ते म्हणाले.

चोवीस तासांत ५९२ बाधित

>> राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

कोविडचा संसर्ग झालेले ५९२ नवे रुग्ण काल राज्यात सापडले. तर गेल्या २४ तासांत कोविडमुळे दोघाजणांचा मृत्यू झाला. काल राज्यभरात ४२६१ जणांची कोविडसाठी चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९२ जणांना कोविडचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.
काल ५८३ जणांनी गृह विलगीकरणात राहणे पसंत केले तर ९ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले. काल झालेल्या दोघा जणांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत राज्यात कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा हा ३५२५ एवढा झाला आहे.

गेल्या २४ तासांत कोविड मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ६७ एवढी आहे. तर इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३ एवढी आहे. या घडीला राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ही २७६३ एवढी आहे. काही प्रमुख शहरांत कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून सर्वांधिक रुग्ण हे मडगाव शहरात असून त्यांची संख्या ३४८ एवढी आहे. त्या पाठोपाठ पणजी शहरात ३४६ रुग्ण आहेत. कासावली २२३, पर्वरीत १८४, म्हापसा १६२, कुठ्ठाळी १३९, कांदोळी १२१, चिंबल ११६, शिवोली ११६ व फोंडा येथे १०९ एवढे रुग्ण आहेत.

कोर्डेलिया जहाज मुंबईला मार्गस्थ

>> बाधितांचा गोव्यात उपचारास नकार

कोर्डेलिया क्रूझ जहाजातील ६६ पैकी ६० प्रवासी ज्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यांनी उपचारास नकार दिल्याने सदर जहाज मुंबईला परत मार्गस्थ झाले. बाधित असलेल्या जहाजावरील ६ जणांनी उपचार घेण्यास निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना मागे ठेवून जहाज मुंबईला रवाना झाले.

मुंबईहून सुमारे २००० पर्यटकांना घेऊन आलेल्या कोर्डेलिया या जहाजातील एका प्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व प्रवाशांची चाचणी करण्याचा आदेश अधिकार्‍यांनी दिला होता. ज्या प्रवाशांना कोविडची बाधा झाली होती त्यांनी आपल्या कुटुंबीयांना जहाजावर ठेवून उपचारासाठी गोव्यात थांबण्यास नकार दिला. संक्रमित प्रवासी जहाजावरच राहतील, असे एका शिपिंग एजन्सीच्या अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे अखेर काल रात्री ११.३० वाजता ते जहाज मुंबईला परत पाठवण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या काही प्रवाशांनी गोव्यात उपचारांस नकार दिल्यानंतर जहाज परत मुंबईला मार्गस्थ झाले.