राज्यातील पंचायतींवर सत्ताधार्‍यांचे वर्चस्व

0
20

>> ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर
>> नवोदितांना जनतेचा कौल; प्रस्थापित ‘घरी’
>> १५० हून अधिक पंचायतींत सत्ता : मुख्यमंत्री
>> मायकल लोबोंची कळंगुटवरील पकड झाली सैल
>> बहुतांश आमदारांकडून मतदारसंघातील पंचायती ताब्यात
>> लोबोंचे पुत्र; तानावडेंचे बंधू; तवडकरांच्या पत्नी विजयी

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. मतदारांनी पंचायतीत बदल घडवण्यासाठी मतदान केल्याचे निकालातून दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली. बहुतांश पंचायतींमध्ये नवीन चेहर्‍यांना संधी मिळाली, तर अनेक प्रस्थापितांना जोरदार दणका बसला. राज्यातील बहुतांश आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील पंचायतींवर वर्चस्व मिळवण्यात यश प्राप्त केले. दुसरीकडे, १५० पेक्षा अधिक पंचायतींमध्ये भाजप समर्थक गटातील उमेदवार विजयी होत त्यांनी पंचायतींवर सत्ता काबीज केल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केला, तर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ९०० हून अधिक भाजप समर्थक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या १५२८ प्रभागांपैंकी ६४ प्रभागांतील उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे १४६४ प्रभागांत बुधवारी मतदान झाले होते. त्यानंतर काल तालुका पातळीवर मतमोजणी पार पडली. यावेळी सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निकाल जाणून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जसजसा निकाल जाहीर होत होता, तसतसे विजयी उमेदवारांकडून जल्लोष केला जात होता, तर पराभूत उमेदवारांच्या गटात शुकशुकाट दिसून येत होता. मतमोजणी केंद्रांबाहेर उमेदवार आणि समर्थकांची गर्दी, तसेच पोलीस बंदोबस्त यामुळे सदर ठिकाणांना जत्रेचे स्वरूप आले होते.

या पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर नवीन चेहर्‍यांना संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची पत्नी सविता तवडकर या पैंगीण पंचायतीच्या प्रभाग ९ मधून विजयी झाल्या. आमदार मायकल लोबो आणि आमदार डिलायला लोबो यांचे पुत्र डॅनियल लोबो हे पर्रा पंचायतीच्या प्रभाग २ मधून विजयी झाले, तर दवर्ली पंचायत क्षेत्रात भाजपचे प्रवक्ते ऊर्फान मुल्ला यांना पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसचे केपेचे आमदार ऍल्टन डिकॉस्टा यांचे बंधू सांजील डिकॉस्टा यांनाही फातर्पा पंचायतीतून पराभवाचा सामना करावा लागला.
कळंगुटचे कॉंग्रेस आमदार मायकल लोबो यांना कळंगुट पंचायत क्षेत्रात मोठा दणका बसला. कळंगुट पंचायत क्षेत्रात लोबो समर्थक गटाचे केवळ ३ उमेदवारच निवडून आले असून, विरोधी जोसेफ सिक्वेरा यांच्या गटाचे ६ उमेदवार निवडून आले. इतरांचे २ उमेदवार निवडून आले. मायकल लोबो यांचे कळंगुट पंचायतीवर वर्चस्व होते; मात्र त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कळंगुट पंचायतीमधील त्यांचे वर्चस्व आता कमी झाले आहे. जोसेफ सिक्वेरा यांनी स्थानिक राजकारणावर पुन्हा एकदा पकड बसविली आहे. मायकल लोबो यांनी कांदोळी, हडफडे-नागवा आणि पर्रा पंचायतींवर मात्र वर्चस्व राखले आहे.
हणजूण-कायसूव पंचायतीचे माजी सरपंच सावियो आल्मेदा यांना पराभव पत्करावा लागला. कासावली पंचायतीचे चार वेळा सरपंचपद भूषविलेल्या माजी सरपंच मार्था साल्ढाणा यांचाही पराभव झाला. साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर हेही पराभूत झाले.
सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आजोशी-मंडूर पंचायतीवर वर्चस्व मिळविण्यास यश प्राप्त केले. या पंचायतीमधील सातपैकी चार जागा बोरकर यांच्या समर्थकांना मिळाल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे बंधू संदीप शेट तानावडे हे पीर्ण पंचायत क्षेत्रात निवडून आले. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे बंधू हनुमंत हळर्णकर हेही कोलवाळ पंचायतीतून विजयी झाले. माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी कन्या शेरॉन डिकॉस्टा या वार्का पंचायत क्षेत्रातून विजयी झाल्या. माजी आमदार मिकी पाशेको यांची पत्नी व्हियोला पाशेको बेतालभाटी पंचायतीतून विजयी झाली. नुवेचे माजी आमदार विल्फेड डिसा यांच्या पत्नी फ्रेडा डिसा विजयी झाल्या. माजी आमदार क्लाफासियो डायस यांचा गटाने पारोडा पंचायतीमध्ये सत्ता काबीज केली. मुरगावातील सांकवाळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग-३ मधून भाजपचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक विजयी झाले.

राज्यातील ग्रापंचायत निवडणुकीत ९०० हून अधिक भाजप समर्थक उमेदवार पंच सदस्य म्हणून निवडून आले आहेत. केपे मतदारसंघातील कॉँग्रेस आमदाराच्या बंधूचा या निवडणुकीतील पराभव हा भाजपचा मोठा विजय आहे.

  • सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

राज्यातील १८६ पंचायतींपैकी १५० पेक्षा अधिक पंचायतींमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उर्वरित पंचायतींतील जवळपास ५० टक्के पंच भाजपचे आहेत. ग्राम पातळीवर भाजपची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

१५० पंचायतींवर भाजपचे सरपंच : मुख्यमंत्री
राज्यातील १५० पंचायतींवर भाजपचे सरपंच विराजमान होणार आहेत. या विजयातून भाजपची पाळेमुळे ग्रामीण भागात घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. स्वयंपूर्ण गोवा २.० मोहीम राबवताना कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आल्तिनो-पणजी येथील शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राज्यातील पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप समर्थक पंच सदस्यांनी काल भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विजयी पंच सदस्यांचा सन्मान केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.

दीर-भावजय विजयी
मोरजीत पंचायत क्षेत्रातून दीर आणि भावजय अशा नात्यातील दोघा उमेदवारांनी विजय मिळवला. माजी सरपंच मंदार पोके आणि माजी पंच सुप्रिया पोके यांनी पुन्हा निवडून येण्याची किमया साधली.

महिलांनी ‘नाणेफेक जिंकली’
कुडका-बांबोळी-तळावली या पंचायतीच्या प्रभाग २ मध्ये मारिया डिकुन्हा आणि आनंद वेर्णेकर यांना समान मते मिळाली. त्यानंतर नाणेफेकीवर मारिया डिकुन्हा विजयी झाल्या. पर्ये पंचायतीच्या प्रभाग ९ मध्ये दोन्ही उमेदवारांना मते समान मिळाल्याने शेवटी नाणेफेकीवर रती गावकर या विजयी झाल्या.

८२ वर्षीय आजोबा अन्

७२ वर्षीय आजी विजयी
डिचोली तालुक्यातील वन-मावळिंगे-कुडचिरे पंचायत क्षेत्रातील प्रभाग सहामधून ८२ वर्षीय उमेदवार भागो भैरू वरक हे विजयी झाले, तर धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल-दाभाळ पंचायतीतून ७२ वर्षीय रुक्मिणी गावकर या भरघोस मतांनी निवडून आल्या.

मांद्रेकर, कोनाडकर यांना ‘लॉटरी’
पेडणे तालुक्यातील मांद्रे पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मधील किशोर शेट मांद्रेकर आणि राजेश मांद्रेकर यांना समान मते मिळाली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे जाहीर निकालात राजेश मांद्रेकर यांनी बाजी मारली. बार्देश तालुक्यातील साळगाव पंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये रामदास कोनाडकर चिठ्ठीद्वारे काढलेल्या निकालात विजयी झाले. कोनाडकर आणि एकनाथ ओरसकर यांना समान १६३ मते मिळाली होती.

कारापूरमध्ये मातेसह पुत्राचा विजय
डिचोली तालुक्यातील कारापूर पंचायत क्षेत्रातून मधून ४५ वर्षीय दत्तप्रसाद कारखांडे आणि ६५ वर्षीय सुकांती कारखांडे या आई-मुलाच्या जोडीने विजय संपादन केला.

पती-पत्नी विजयी
मुरगाव तालुक्यातील चिखली पंचायतीत माजी उपसरपंच कमला प्रसाद यादव व त्यांची पत्नी सुनीता यादव या पती-पत्नी जोडीने विजयश्री खेचून आणली.

सासरे पराभूत; सून विजयी
लाटंबार्से पंचायत क्षेत्रातून माजी सरपंच बबनराव राणे यांना पराभव पत्करावा लागला; मात्र त्यांची सून त्रिशा राणे विजयी झाल्या.

दोन जावांच्या लढतीत सुरेखा शेटगावकर विजयी
मोरजी पंचायत क्षेत्रातील प्रभाग २ मध्ये चक्क दोन जाऊबाई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. त्यात माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांच्या पत्नी सुरेखा अमित शेटगावकर या विजयी झाल्या, तर त्यांची जाऊ वंदना रामनाथ शेटगावकर यांचा पराभव झाला.

राजकारण्यांचे सगेसोयरे विजयी
सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर विजयी.
आमदार मायकल व डिलायला लोबो यांचे पुत्र डॅनियल लोबो विजयी.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे बंधू संदीप तानावडे विजयी.
मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे बंधू हनुमंत हळर्णकर विजयी.
माजी आमदार चर्चिल आलेमाव यांच्या कन्या शेरॉन डिकॉस्टा विजयी.
माजी आमदार मिकी पाशेको यांच्या पत्नी व्हियोला पाशेको विजयी.
नुवेचे माजी आमदार विल्फेड डिसा यांच्या पत्नी फ्रेडा डिसा विजयी.

फेरमतमोजणीत साल्वादोरचे
जगन्नाथ चोडणकर विजयी

साल्वादोर द मुंद पंचायतीच्या प्रभाग ५ मध्ये जगन्नाथ चोडणकर आणि दीपराज नाईक यांना समान मते मिळाली. फेरमतमोजणीच्या वेळी जगन्नाथ चोडणकर यांना दोन मते जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.