भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी केली जाणार आहे.
राज्यसभेच्या या 37 जागा येत्या एप्रिल महिन्यात रिक्त होणार आहेत. महाराष्ट्र (7), ओडिशा (4), तमिळनाडू (6), पश्चिम बंगाल (5), आसाम (3), बिहार (5), छत्तीसगड (2), हरियाणा (2), हिमाचल प्रदेश (1) आणि तेलंगणा (2) अशी या जागांची संख्या आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपणार असलेल्या नेत्यांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी, तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले, आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा समावेश आहे.
या जागांसाठी 2020 मध्ये द्विवार्षिक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी आसाम, बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठे यश मिळवले होते. महाराष्ट्रात या जागा भाजप, दोन्ही गट एकत्र असलेली शिवसेना, दोन्ही गट एकत्र असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात विभागलेल्या होत्या. तमिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेतृ्त्वाखालील युतीने बहुतांश जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आणि ओडिशामध्ये बिजू जनता दल (बीजेडी) यांचा दबदबा दिसून आला होता.
कसे असेल वेळापत्रक?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केले जाईल, तर अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही 5 मार्च असणार आहे. अर्जांची छाननी आणि ही 6 मार्च रोजी केली जाईल आणि अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख 9 मार्च असणार आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणुकीची प्रक्रिया ही 20 मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल. दररम्यान, मार्च महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल हा संबंधित राज्य विधानसभांमधील राजकीय पक्षांच्या विद्यमान संख्याबळावर अवलंबून असणार आहे. या निवडणुकीच्या निकालांमुळे राज्यसभेच्या रचनेत किरकोळ बदल होऊ शकतात.
मतदानाच्या प्रक्रियेबद्दल महत्त्वाचे निर्देश जारी
निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेबद्दल देखील निर्देश जारी केले आहेत, ज्यानुसार बॅलेट पेपरवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी फक्त रिटर्निंग ऑफिसरने पुरवलेला इंटिग्रेटेड व्हायलेट स्केच पेनचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.