Home बातम्या राजकारण कसले करता?

राजकारण कसले करता?

0

खाण खात्याचे निलंबित कर्मचारी दत्तात्रेय भावे यांच्या आत्महत्येने केवळ त्यांच्या कुटुंबियांनाच नव्हे तर समस्त गोमंतकीय जनतेला ऐन चतुर्थीत चटका लावला. त्यांच्या आत्महत्येमागे केवळ त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई हेच एकमेव कारण होते की काही कौटुंबिक ताणतणावांची पार्श्वभूमी होती हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी स्वतःच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली गेल्याने व तो अपमान जिव्हारी लागल्यानेच भावे यांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरला असे प्रथमदर्शनी तरी दिसते. निलंबनानंतर ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते आणि आपण प्रामाणिकपणे सेवा बजावीत असताना आपल्यावर नाहक ठपका ठेवला गेला हा धक्का ते पचवू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा आततायी निर्णय घेतला असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. आत्महत्येचा पलायनवादी मार्ग अनुसरण्याऐवजी त्यांनी लढायला हवे होते, चौकशीला सामोरे जाऊन स्वतःचे निरपराधित्व सिद्ध करायला हवे होते असे आता सगळे म्हणत असले तरी संवेदनशील व्यक्तीला शारीरिक यातनांपेक्षा अशा प्रकारच्या मानसिक यातना अधिक असह्य ठरत असतात. भावे यांनाही त्या असह्य झाल्या आणि स्वतःच्या जीवनाचा शेवट केल्यानेच आपले निरपराधित्व सिद्ध होऊ शकेल असा ग्रह त्यांनी करून घेतला असणे शक्य आहे.

त्यांच्या चौकशीच्या निमित्ताने मडगावला बोलावून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती का, सूडबुद्धीने निष्कारण बसवून ठेवले जात होते का, याची चौकशी आता व्हायला हवी. मुळात ही निलंबनाची कारवाई कोणत्या आधारावर झाली होती, अशी कोणती अनियमितता भावे यांच्या हातून घडली होती, खरोखरच त्यांचा त्यात दोष होता की केवळ वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रक्रिया पूर्ण केल्याने या प्रकरणात ते अडकले याचाही शोध घेणे गरजेचे आहे. खाण खात्यामध्ये गैरकारभाराचा कळस गाठला गेला होता हे वास्तव आहे. त्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. या खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांची आधी हकालपट्टी झाली. त्यानंतर भूगर्भतज्ज्ञ आणि कारकुनांवरही निलंबनाची कारवाई झाली. बडे राजकारणी मात्र आजही नामानिराळे राहिले आहेत. कारवाईच्या कात्रीत अडकले आहेत ते मात्र सरकारी कर्मचारी. या कर्मचार्‍यांवरील निलंबनाची कारवाई ही चौकशीत त्यांनी अडथळा आणू नये म्हणून होत असते. निरपराधित्व सिद्ध झाले तर अशांना पुन्हा सेवेत घेतले जाते, परंतु निलंबनाची कारवाई हीच निर्णायक कारवाई अशी समाजाची धारणा बनून गेलेली आहे. त्यामुळे समाज अशा व्यक्तींकडे गुन्हेगार याच भावनेने पाहात असतो. भावे हे याच वास्तवाचे बळी ठरले आहेत. हाती सत्ता आहे म्हणून सपासपा तलवार चालवावी तसे कारवायांचे जे सत्र चालले आहे, त्या राजकीय सूडनाट्यामध्ये निरपराधांचा नाहक बळी जाऊ नये यासाठी काळजीपूर्वक पावले उचलण्याचे भान सरकारने यापुढे तरी राखावे. खाणींचा विषय हा गंभीर विषय आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा व्यवसाय आहे आणि राज्यातील लाखो कुटुंबे त्यावर प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. बड्या धेंडांना मोकळीक देऊन केवळ सर्वसामान्यांना कारवाईच्या धबडग्याखाली भरडून काढले जाऊ नये. तसे घडले तर खाणी एकाएकी बंद झाल्याने कर्जबाजारी झालेल्यांच्या आत्महत्यांचे उद्या राज्यात पेव फुटेल. केंद्र आणि राज्य सरकार, विद्यमान सरकार आणि मागील सरकार यांच्यातील संघर्षाचा फटका निरपराधांना बसू नये. भावे यांच्या आत्महत्येनंतर त्या दुर्दैवी घटनेचे कॉंग्रेस आणि भाजपने जे राजकारण चालवले आहे ते संतापजनक आहे. त्यांच्या आत्महत्येचे खापर एक – दुसर्‍यांवर फोडण्याची दोन्ही राजकीय पक्षांत अहमहमिका लागली आहे. तेथे भावे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्यांचा आधार हरवला आहे, दोन उच्चशिक्षित मुले आपल्या पित्याला गमावून बसली आहेत आणि येथे तुम्ही टाळूवरचे लोणी खायला हपापावे तसे आपले राजकारण कसले पुढे रेटता आहात? हा सारा तमाशा तात्काळ थांबला पाहिजे. भावे कुटुंबाचा कर्ता पुरूष तुम्ही हिरावून घेतलात. निदान त्यांना आता आणखी यातना तरी देऊ नका. एक दत्तात्रेय भावे राजकीय संघर्षाचे बळी ठरले. ही पाळी आणखी कोणावरही येऊ नये.