रंगनिर्मिती कारखान्याला भीषण आग

0
15

>> पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना; २ कोटींचे नुकसान, जीवितहानी टळली; आग विझवण्यासाठी जवानांकडून प्रयत्नांची शर्थ

पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर पेंट या रंग तयार करणार्‍या एका कारखान्याला मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास भीषण आग लागली, त्यात हा संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. या आगीत २ कोटी रुपयांचे नुकसान झाले; मात्र या कारखान्यातील सर्व कर्मचार्‍यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. ही आग विझवण्यासाठी राज्यभरातील अनेक ठिकाणच्या अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी पाण्याचे ४० बंब वापरून आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. दरम्यान, काल रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन एकंदर परिस्थिती जाणून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिळर्ण औद्योगिक वसाहतीत एका टेकडीच्या माथ्यावर हा कारखाना आहे. काल दुपारी तीनच्या सुमारास या कारखान्याला अचानक आग लागली. त्यावेळी या कारखान्यात सुमारे १०० कर्मचारी काम करीत होते. आग लागल्याचे समजताच अलार्मच्या सहाय्याने सर्व कर्मचार्‍यांना सावध करण्यात आल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
ही आग विझवण्यासाठी सुरुवातीला पाच अग्निशमन बंब पाठवण्यात आले होते; पण त्यानंतर आणखी पाच अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. त्यात पिळर्ण, म्हापसा, पर्वरी, पणजी, कुंडई, फोंडा, कुडचडे, मडगाव आणि वेर्णा येथील अग्निशामक दलांचा समावेश होता. सायंकाळपर्यंत अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र आग अधिकच भडकली असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. दुपारी तीनला लागलेली आग सायंकाळी ७ नंतरही धुमसत होती.

या घटनेची माहिती मिळताच गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आमदार आलेक्स रेजिनाल्ड, साळगावचे आमदार केदार नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एकंदर परिस्थिती जाणून घेतली.उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. म्हापसा जिल्हा इस्पितळ आणि अन्य रुग्णालयांना ऑक्सिजनची सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या ठिकाणचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी आरोग्य खाते व अन्य यंत्रणांकडून अहवाल मागवला आहे, असे मामू हागे यांनी सांगितले.
दरम्यान, कारखान्यातील सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपड करणार्‍या अग्निशामक दलाच्या जवानांप्रती बर्जर बेकर पेंट कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मेहरोत्रा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आगीचे नेमके कारण अस्पष्ट
या कारखान्यात रंग तयार करण्यासाठी विविध केमिकल्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही केमिकल्स अतिज्वालाग्रही असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागली असावी. या घटनेत कारखान्यातील माल भरलेला एक ट्रक भस्मसात झाला. तसेच काही कर्मचार्‍यांच्या गाड्याही जळाल्याचे वृत्त आहे.

आग पिळर्णमध्ये; धुराचे लोट राजधानी पणजीत
पिळर्ण येथे बर्जर बेकर पेंट कारखान्याला लागलेल्या आगीचे धूर सर्वदूर आकाशात पसरले होते. पणजीतून देखील घटनास्थळाच्या ठिकाणाहून वर आकाशात पसरणारे धुराचे लोट पाहायला मिळत होते. तसेच पणजी शहरात आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत होते. या आगीच्या घटनेमुळे धुराचे मोठे ढग तयार होऊन विषारी वायू हवेत पसरला होता.