जीएसटी कपातीद्वारे गोवा टॅक्सी ऍपचे भाडे कमी करणार

0
8

>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती; केंद्र व राज्याच्या जीएसटीमुळेच भाडे अधिक

गोवा टॅक्सी ऍपचे भाडेदर कमी व्हावेत, यासाठी वाहतूक खात्याने गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) ला टॅक्सी सेवेवरील केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जीएसटी दर कमी करण्याची सूचना केली आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल स्पष्ट केले. जीएसटी कमी केला की टॅक्सी भाड्यापोटीचे दर आपोआप कमी होणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

टॅक्सी भाड्यावरील सेवा शुल्क हे जास्त असल्यानेच केंद्र व राज्य सरकारचे त्यावरील जीएसटी दरही जास्त असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. गोवा टॅक्सी ऍपचे भाडेदर कमी रहावे यासाठी जीएसटीचे दर कमी करण्याची सूचना गोवा इलेक्ट्रॉनिक्सला करण्यात आली असल्याचे गुदिन्हो म्हणाले. गोवा सरकारचे महामंडळ असलेल्या जीईएलनेच गोवा टॅक्सी ऍप तयार केले असून, ते चालवण्याचे कामही जीईएल करीत आहे.

चार दिवसांपूर्वी मोप विमानतळावरून बाणावली या ६५ किलोमीटरच्या अंतरासाठी गोवा टॅक्सी ऍप सेवेद्वारे भाडेकरूकडून जे ४००० रुपयांचे भाडे आकारण्यात आले होते, ही बाब खरी असून, ते भाडेही निश्‍चित करण्यात आलेल्या दरानुसार होते, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

दुसर्‍या बाजूला पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी देखील या विषयावर भाष्य केले. गोवा माईल्स टॅक्सीचे भाडे दर हे गोवा टॅक्सी ऍप सेवेपेक्षा कमी आहेत. गोवा माईल्सचे भाडेदर हे स्पर्धात्मक तत्त्वावर असल्याने ते कमी आहेत, तर गोवा टॅक्सीचे दर हे वाहतूक संचालनालयाने अधिसूचित केलेले आहेत, असा खुलासा काल रोहन खंवटे यांनी केला.

एकदा गोवा टॅक्सी ऍप सुरू झाला की या गोष्टी बदलतील, असे खंवटे यांनी नमूद केले. गोवा टॅक्सी हा स्पर्धात्मक व्यवसाय नाही. मोप विमानतळावरील सर्व सेवांमध्ये सुसूत्रता येईपर्यंत गोवा सरकार तेथील सेवा व कारभार याचा दर महिन्याला आढावा घेणार असल्याचेही खंवटे यांनी सांगितले.

गोवा सरकारने अजून गोवा टॅक्सी कॅब ऍप सुरू केले नसल्याची माहिती देखील खंवटे यांनी दिली. त्यामुळे ते डाऊनलोड करून त्याचा लाभ घेता येत नाही. सध्या या सेवेसाठी रांगेत उभे रहावे लागत असून, सदर ऍप लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रोहन खंवटे यांनी दिली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या टॅक्सी भाड्याच्या पावतीवरील महत्त्वाची माहिती लपवून ठेवता यावी, यासाठी वरच्या बाजूने व खालच्या बाजूने फाडून टाकण्यात आली होती, असे खंवटे म्हणाले. भाड्याने नेलेली ती टॅक्सी लक्झरी होती की साधी, पार्किंगसाठी कुठली लेन वापरण्यात आली होती आदी माहिती पावतीचा भाग कापून टाकण्यात आला होता, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.