– डॉ. सीताकांत घाणेकर
आज सबंध जगात योगशास्त्राचा प्रचार व प्रसार झपाट्याने प्रत्येक देशात होतो आहे. पण अनेकांना योग म्हणजे फक्त आसने, प्राणायाम व ध्यान हेच तीन पैलू माहिती असतात. त्यामुळे अशा व्यक्ती म्हणतात की ‘सत्य’ हा विषय योगमार्गात कसा आला? राजयोग व सत्य ह्यांचा काय संबंध? ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या शास्त्राबद्दल त्यांचे अल्प ज्ञान किंवा अज्ञान.
प्रत्येक व्यक्ती योग वेगवेगळ्या हेतूने करतो. आरोग्य चांगले राहावे, चित्त एकाग्रता वाढावी, वजन कमी व्हावे, ताण तणावावर नियंत्रण राहावे… इत्यादी. अगदी थोड्यांना माहीत असते की योगाची साधना अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे मानवाचा सर्वांगीण विकास होतो. तसेच मानव जन्माचा प्रथम व अत्युच्च हेतू – आत्मा व परमात्मा ह्यांचे मीलन, म्हणजेच मुक्ती साध्य होतो. ह्यासाठी राजयोगातील यम व नियम ह्यांचे पालन अत्यंत आवश्यक आहे. ह्या यमामधील दुसरा पैलू म्हणजे ‘सत्य’. ही गोष्ट समजणे ही योगसाधनेची पहिली पायरी आहे.
इतिहास किंवा रामायण–महाभारत ह्यासारख्या महाकाव्यांवर नजर टाकली तर लक्षात येते की अनेक महापुरुषांना कठोर सत्याला सामोरे जावे लागले. प्रत्येकाने आपले ज्ञान, स्वभाव, मान्यता, परिस्थिती, गरज, हेतू… ह्याप्रमाणे त्या सत्याचा सामना केला. अनेक वेळा त्यांच्या वागण्याचे दुष्परिणाम त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना व समाजाला भोगावे लागले. म्हणूनच ‘सत्य’ हे महान तत्त्व समजून घ्यायला हवे. त्याचा सामना करताना सद्बुद्धीचा वापर करायला हवा. थोडी देखील बुद्धी व विचार भ्रष्ट झाले की मानव नियतीच्या हातचे बाहुले होऊन भयानक परिस्थिती उद्भवते मग शास्त्रकार म्हणतात–
‘विनाश काले विपरीत बुद्धी’
आणि हीच गोष्ट धर्मात्मा, सत्यव्रती युधिष्ठिराच्या जीवनात घडली? म्हणूनच त्याने विनाशकाली द्यूताला आपली संमती दिली का?
शकुनी, दुर्योधन व धृतराष्ट्र ह्यांनी कपटवृत्तीने विदुराला राजदूत म्हणून युधिष्ठिराला द्यूताचे आमंत्रण घेऊन पाठवले होते. सुरुवातीला विदुर व युधिष्ठिर दोन्ही विद्वानांनी द्यूताच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा केली. पण शेवटी सम्राट युधिष्ठिर आपल्या परिवारासह सेनेबरोबर विदुराला घेऊन हस्तिनापूरला जाण्यासाठी निघालेच.
प्राचार्य दसनुरकर या घटनेचे सुंदर वर्णन करतात. ते वाचले की बुद्धी स्तब्ध होते– ‘‘सुवर्ण – गौर कांतीने युक्त व राजलक्ष्मीच्या तेजाने सुशोभित युधिष्ठिर अत्यंत आकर्षक दिसत होता. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे राजा युधिष्ठिराची शोभा दिसत होती. मार्गावर हर्षोल्हासाने भारलेले अगणित नागरिक त्याचा जयजयकार करून शुभाशीर्वाद देत होते. महाराज युधिष्ठिर त्या आशीर्वादांचा नम्रपणे स्वीकार करत होते. युधिष्ठिराच्या पुढे भीमसेनाचा श्रुंगारलेला प्रचंड हत्ती चालला होता. मसेनाच्या दोन्ही बाजूला सजविलेल्या सुंदर अश्वावर नकुल व सहदेव आरूढ झाले होते. युधिष्ठिराच्या हत्तीच्या मागे श्वेतवाहन अर्जुन अग्नीने दिलेल्या दिव्य रथात गांडीव धनुष्य धारण करून बसला होता. पांडव परिवाराच्या सुशोभित केलेल्या सुवर्णाच्या अनेक शिबिका महाराजांच्या गजराजाच्या पुढे चालल्या होत्या.
पाच पांडवांनंतर प्रोफेसर त्रैलोक्यसुंदरी द्रौपदीचे वर्णन करतात. ते तर अत्यंत विलोभनीय आहे.
‘‘द्रौपदी पांडवांच्या राजलक्ष्मीचे प्रतीक होती. तिच्या श्रुंगारलेल्या शिबिकेचे सौंदर्य अपूर्व होते. ती पांडवांची भाग्यलक्ष्मी होती. राजलक्ष्मी होती. तिच्या प्राप्तीबरोबर पांडवांचा उत्कर्ष सुरू झाला होता. तिच्या प्रेरणेमुळे पांडवांच्या कर्तृत्वाला तेज चढले होते. तिच्या उत्तेजनाने पांडवांचे शौर्य, शक्ती व संपत्ती वाढत होती. ती पांडवांचे सर्वस्व होती. द्रौपदीच्या मुखचंद्राच्या दर्शनाने पांडवांच्या कीर्तीसागराला पौर्णिमेची भरती प्राप्त झाली होती’’.
पांडव हस्तिनापुरात पोचले याची बातमी धृतराष्ट्रापर्यंत पोचवली गेली. दुसर्याच दिवशी धर्मराजाला ‘‘द्यूत’’ ह्या विनाशकारी सत्याचा सामना करावयाचा होता. अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून पांडवांचे हितचिंतक महात्मा विदुरांनी दुर्योधन व शकुनीचा कपट कारस्थानाची कल्पना युधिष्ठिराला परत एकदा करून दिली. तसेच अत्यंत सावधगिरी ठेवण्याची सूचनादेखील केली.
दुसर्या दिवशी युधिष्ठिर राजभवनात गेले. तिथे त्यांचे अपूर्व स्वागत झाले. पितामह भीष्म, गुरु द्रोण, कुलगुरू कृपाचार्य यांना वंदन करून युधिष्ठिराने त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच दुर्योधन, दुःशासन, कर्ण, अश्वत्त्थामा, जयद्रथ, शकुनी…इत्यादींची भेट घेऊन युधिष्ठिर राजा धृतराष्ट्राला भेटायला गेले. आधी त्यांनी महान पतिव्रता गांधारीला प्रणाम करून तिचा आशीर्वाद घेतला.
राजा धृतराष्ट्राने कुरुकुलाला आनंदित करणारा म्हणून धर्मराजाला गाढ आलिंगन दिले. जणू काय पांडवांबद्दल प्रेमभावना अनावर झाली होती. नंतर इतर पांडवांना आलिंगन देऊन आपल्या पुत्रवात्सल्याचे(!) प्रदर्शन केले.
द्रौपदीच्या आगमनाने तर धृतराष्ट्राच्या पुत्रवधु व दुर्योधनाची भामिनी दुःशीला यांची दृष्टी दिपून गेली. तिच्या सौंदर्याचा व वैभवाचा तिला हेवा वाटला.
हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या महाभारतातील ह्या दुर्दैवी घटनेचे वर्णन करण्याचा हेतू हाच की आजही द्यूताची परंपरा चालू आहे. हा खेळ असाच लहान–मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी चालूच आहे व वाढत आहे. आता त्याला ‘‘द्यूत’’ हे नाव नसेल. इतर गोंडस नावे असतील. पण शेवटी तो तोच विनाशकारी खेळ आहे. सर्वनाश करणारा जुगार आहे. सुज्ञ माणसाची बुद्धी भ्रष्ट करणारा आहे.
पांडव, त्यांच्या पत्नी जसे नटून थटून व वैभवाचे प्रदर्शन करीत हस्तिनापूरात आले होते, अगदी तसेच आजच्या काळातील लक्ष्मीपती सुंदर कपडे घालून मोठमोठ्या अत्यंत महागड्या गाड्यांतून सुंदर अशा वैभवसंपन्न पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा शांत नदीवर तरंगणार्या मोठमोठ्या सुंदर सुशोभित बोटीत असणार्या कॅसिनोमध्ये अगदी आनंदाने व प्रौढीने प्रवेश करतात. अनेक वेळा त्यांच्या सुविद्य पत्नी नटून थटून अत्यंत महाग दागिने घालून आपल्या मुलांसह पतीराजांबरोबर येतात. सगळीकडे त्यांचे स्वागत केले जाते. त्यासाठी सुंदर मध्यमवर्गीय मुली निवडल्या जातात. तिथे आत नक्की काय घडते ह्याची कल्पना न केलेलीच बरी. शेवटी द्यूत तो द्यूतच. तो कोणत्याही काळातला असू दे. सत्य हेच की हा खेळ नाही, हा विनाशकारी राक्षस आहे.
ह्या सर्व गोष्टी बघून मन व बुद्धी सुन्न होतात. तदनंतर जास्त दुःख हे होते की जसा महाभारतात खेळला गेलेला द्यूत धूर्त, स्वार्थी धृतराष्ट्र व इतर कपटी द्यूतविशारदांनी मांडला होता तसेच आजही ‘‘आम आदमी’’च्या हिताच्या गोष्टी करणारे मायबाप सरकार व राजकारणी आजच्या द्यूताला प्रोत्साहन देतात आणि तेही कौरवांसारखाच तत्त्ववेत्त्याचा आव आणून. त्याला राजाश्रय देतात. आजचे राजे सांगतात की राज्याला अधिक उत्पन्न मिळावे म्हणून अशा कॅसिनोंची गरज आहे. सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरला जातो. त्याला ते ‘‘टुरीझम’’ हे गोंडस नाव देऊन आपल्या परीने समर्थन करतात.
तसेच समाजातील संस्कारी व प्रतिष्ठित मानले गेलेले काही कुटुंब ह्यातील काही कॅसिनो चालवतात. आम आदमीला गरजेशिवाय सतावणारे आयकर विभागातले अधिकारी साधी चौकशीसुद्धा करीत नाहीत, की शेवटी हा पैसा आला कुठून?
ह्या सर्व अनैतिक गोष्टींमुळे संस्कार नष्ट होतात व समाज रसातळाला जातो. ह्याची चिंता सूज्ञजनांनाही असेल असे दिसत नाही. तेही विदुर व भीष्मांसारखे असहाय्य होऊन बघ्याचीच भूमिका करतात आहेत.
आणि ह्या देशातील नारीशक्ती? गांधारी बनून डोळ्यांवर पट्टी बांधून अंध धृतराट्राला पतीदेव मानून त्यांच्या अनैतिक वागण्याला साथ देतात. महिलांच्या उद्धारासाठी कार्य करणार्या एवढ्या संस्था काय करतात? हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो.
शेवटी असेच म्हणायचे का – ‘‘विनाशकाले विपरीत बुद्धी’’. आपण सर्व सज्जन सत्य जाणून घेऊन सत्कर्म करण्याचे, संस्कार देण्याचे कार्य चालूच ठेवू या. आणि जगाच्या हितासाठी आपला खारीचा वाटा उचलू या. पांडवांचे जसे श्रीकृष्णाने रक्षण
केले तसे तो आपले करील हेच सत्य जाणून
घेऊ या. अधिक उत्साहाने
कर्मयोग साधूया.