28 C
Panjim
Monday, March 1, 2021

युगान्त!

तुम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो ऽ
तुम्हें उनकी कसम, इस दिलकी वीरानी मुझे दे दो ऽऽ
तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि त्याचे शब्द, स्वर आणि सूर जेव्हा तुमची पाठ सोडत नाहीत, दिवसभर पिच्छा पुरवतात.. छळत राहतात, मनातल्या मनात तुम्ही ते गीत गुणगुणतच राहता, तेव्हा त्या गीतामागील अलौकिक प्रतिभेचीच ती साक्ष असते! खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली अशी अनेक गीते आपल्या मनात आहेत, काळाच्या ललाटावर अजरामर झालेली आहेत. वर उल्लेखलेले गीत आहे १९६४ साली संगीतबद्ध झालेले. पण साहिरचे शब्द आणि खय्याम यांची पत्नी जगजीत कौरचा आवाज आजही आपले काळीज चिरत जातात. अर्थपूर्ण संगीत हे खय्याम यांच्या एकूण संगीत रचनांचे ठळक वैशिष्ट्य. ‘कभी कभी’ असो अथवा ‘उमराव जान’, त्या गीतांची अवीट गोडी आजही कायम आहे. खरे तर खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले बरेच चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरले, परंतु गीते मात्र अजरामर ठरली! गहिरा अर्थ घेऊन आलेले नेमके शब्द आणि ते गहिरेपण अधिक गडद करणारे संगीत यांनी ही मैफल अशी काही सजवली आहे की वर्षामागून वर्षे जात असली, तरीही ती जुनी होत नाही, विसरली जात नाहीत! राजेश खन्ना, दिलीपकुमार, अमिताभ, रेखा असे पडद्यावरचे चेहरे बदलले, साहिरपासून गुलजारपर्यंतचे गीतकार बदलले, लता, आशा, मुकेश, तलत, किशोर असे गाणारे आवाजही बदलले, परंतु खय्याम यांच्या संगीताचा गोडवा काही बदलला नाही. ‘उमराव जान’ हा तर त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा कळसाध्याय! कमाल अमरोहीच्या ‘पाकिजा’ मधली गुलाम महंमदांनी केलेली गाणी अफाट गाजल्यानंतर त्याच धर्तीच्या एका चित्रपटाला संगीतबद्ध करणे हे खरे तर मोठे आव्हानच, परंतु शहरयारच्या शब्दांना खय्याम यांनी असे काही दैवी संगीत दिले की ती गीते आणि त्यातली अदाकारी करणारी पडद्यावरची रेखा अजरामर होऊन गेली! ‘उमराव जान’मधली गाणी ध्वनिमुद्रित केली जात होती, तेव्हा आशा भोसलेंना खय्यामनी त्यांच्या नेहमीच्या पट्टीपेक्षा दीड सूर खाली गायला सांगितले. आशाबाई अर्थातच तयार नव्हत्या. शेवटी दोघांनी एकमेकांना शपथ घातली की आपल्या म्हणण्याप्रमाणे गायलेले गाणे चांगले झाले नाही तर दुसर्‍याचे म्हणणे स्वीकारायचे! पण खय्याम यांनी सांगितल्याप्रमाणे गाणे गाऊन आशाबाई जेव्हा तंद्रीतून बाहेर आल्या, तेव्हा हे मीच गात होते का? हा माझाच आवाज होता का? असे प्रश्न त्यांना पडले, एवढे ते अप्रतिम झाले होते. ध्वनिमुद्रणात तेच कायम ठेवले गेले! ‘उमराव जान’ मधले एकेक गीत म्हणजे एकेक चोख दागिना आहे – ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए’ ‘इन आँखोंकी मस्तीके मस्ताने हजारों है’, ‘ए क्या जगह है दोस्तों ये कौनसा दयार है! ‘उमराव जान’ च्या गीतांचा एक बाज, तर ‘कभी कभी’ चा वेगळाच. ‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आऽता है’, ‘मै पल दो पल का शायर हूँ’, ‘मेरे घर आयी है इक नन्ही परी’.. निव्वळ अप्रतिम आणि अविस्मरणीय! खय्यामना खरे तर के. एल. सैगलप्रमाणे अभिनेता व्हायचे होते, पण संधी लाभली संगीतक्षेत्रामध्ये. अर्थात, त्यासाठी दीर्घ तपस्याही करावी लागली. हुस्नलाल भगतराम, त्यांचे बंधू पं. अमरनाथ, लाहोरचे बाबा चिश्ती अशा समर्पित संगीतकारांच्या तालमीत घडलेल्या खय्यामनी मिळालेल्या संधीचे नुसते सोने नाही केले. दागिने घडवले! आजही मोहात पाडतील असे चोख बावनकशी दागिने! नानाविध भावभावना व्यक्त करणारी ही गीते – ‘तेरे चेहरेसे नजर नही हटती’, ‘आजा रे ओ मेरे दिलबर आ जा’, ‘फूटपाथ’ मधले ‘श्याम ए गम की कसम, आज गमगीन है हम, आ भी जा, आऽ भी जा..आज मेरे सनम’ हा ‘फूटपाथ’ चित्रपट कधीचा? १९५३ मधला!! ‘फिर सुबह होगी’ मधले ‘वो सुबह कभी तो आएगी!’ चित्रपट कधीचा? १९५८! किंवा १९६६ साली आलेल्या राजेश खन्नाची पहिली भूमिका असलेल्या ‘आखरी खत’ मधले कैफी आझमींचे ‘बहारों, मेरा जीऽवन भी संवारो, कोई आए कहींसेे’. ८३ साली आलेला ‘रजिया सुल्तान’ कधीच विस्मरणात गेला, पण ‘ऐ दिल ए नाऽदाऽऽन…’ मात्र आपल्या ह्रदयात घुमत राहते. नसिरुद्दिन आणि स्मितावरचे ‘बाजार’ मधले ‘फिर छिडी रात, बात फूऽलोंकी!’ अहाहा.. शब्द थिटे पडावेत, जान ओवाळून टाकावी अशी गीते! फैज अहमद फैज, शहरयार, कैफी आझमी, साहिर लुधियानवी अशा दिग्गज शायरांच्या शब्दांना अर्थपूर्ण संगीत साज चढवणारे संगीतकारही तितकेच महान होते आणि त्याच मांदियाळीतले एक होते महंमद जहूर खय्याम हाशमी! ज्यांच्या मृत्यूमुळे ‘युगान्त’ झाला असे लताबाईंना वाटावे असे खय्याम. जाता जाता बारा कोटींची संपत्ती नवोदितांसाठी विश्वस्त निधी स्थापून सत्कारणी लावणारे खय्याम. हा महान संगीतकार आता आपल्यात नसेल. परंतु कोट्यवधी संगीतरसिक त्यांचेच सूर आठवत असतील, दिल परेशान है, रात वीरान है, देख जा किस तरह आज तनहा है हम!… श्याम ए गम की कसम, आज गमगीन है हम!…

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम

दत्ता भि. नाईक आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा...

‘एलआयसी’ अंतर्बाह्य कशी आहे?

शशांक मो. गुळगुळे आतापर्यंत खाजगी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीपेक्षा सरकारी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि या...

खांडेकर-कुसुमाग्रज-बोरकर अनोखा त्रिवेणी संगम

राम देशपांडे भाऊंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रावर अधिराज्य केले. स्वतःचा असा एक वेगळा ठसा मराठी मनावर...

अस्त

अंजली आमोणकर देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’...

फुटीच्या दिशेने?

कॉंग्रेस पक्षामधील असंतोष पुन्हा खदखदू लागला आहे. शनिवारी जम्मूमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित ‘शांती संमेलना’तील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते...

ALSO IN THIS SECTION

फुटीच्या दिशेने?

कॉंग्रेस पक्षामधील असंतोष पुन्हा खदखदू लागला आहे. शनिवारी जम्मूमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित ‘शांती संमेलना’तील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते...

नवे निर्बंध

सोशल मीडिया, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि ऑनलाइन बातम्या देणारी संकेतस्थळे यांच्या उधळलेल्या घोड्याला लगाम घालण्यासाठी भारत सरकार एक नवी...

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

दुसर्‍या लाटेच्या दिशेने

देशामध्ये पुन्हा एकवार कोरोनाची लाट येऊ घातली आहे की काय असे वाटायला लावणारी आकडेवारी सातत्याने समोर येऊ लागली आहे. गोव्यामध्ये जरी सरकारी...

पालिकांचे पडघम

राज्यातील अकरा नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका यांच्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. खरे तर ह्या निवडणुका गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये...