म्हापसा येथील कामाक्षी ज्वेलर्स या सराफी दुकानात गेल्या रविवार दि. १६ सप्टेंबर रोजी घातलेल्या दरोड्यात सुमारे दीड कोटीचे दागिने लंपास करून दुकानमालक रत्नकांत (रत्ना) अनंत रायकर यांचा गळा चिरून खून केलेल्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी दिली. या रेखा चित्रातील व्यक्तीची माहिती देणार्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
खुनाच्या घटने दिवशी त्या सराफी दुकानातून रक्तबंबाळ झालेले हात असलेली व्यक्ती बाहेर येत असताना तेथील रस्त्यावरून जाणार्या बस मधील एका प्रवाशाने त्या व्यक्तीला पाहिले व त्याची माहिती पोलीस तपासावेळी त्या प्रवाशांनी पोलिसांना दिली. त्या आधारे त्या व्यक्तीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून त्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या खाली काळा तीळ असल्याचेही या प्रवाशाने सांगितले. संशयित व्यक्ती सापडल्यास ७८७५७५६०२६ किंवा २२६२२३१ या क्रमांकावरून द्यावी, असे कळविण्यात आले आहे.