गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी वळविण्याची कर्नाटकची योजना हाणून पाडण्यासाठी उत्तर गोव्यातील सर्वपक्षीय नेते, सर्व पंचायत मंडळे व विविध संस्था संघटितपणे विरोध करणार असून गोव्याचे पाणी वळवण्यास प्रखर विरोध करण्याचा निर्धार साखळी येथे काल घेण्यात आलेल्या लोकप्रितिनिधी व संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.
साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने ही महत्वपूर्ण बैठक साखळीतील बोरकर सभागृहात झाली.
यावेळी म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर, भाजपा नेते विश्वजीत कृष्णराव राणे, केरी सरपंच जिवबा राणे, होंडा सरपंच उर्मीला म्हामईकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर, म्हाउसचे सरपंच विठोबा सावंत, विवेकानंद पर्यावरण फौजेचे चंद्रकांत शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोवा सरकारच्या मागणीला हरताळ फासून तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचा आदेश धुडकावून कर्नाटक तिरावरी निगमने पाणी वळवण्याचे करस्थान पुर्णत्वाकडे नेल्याबद्दल बैठकीत विरोध नोंदवला गेला.
गोव्याच्या भविष्य आणि भवितव्यासाठी म्हादईचे रक्षण करणे ही काळाची गरज असून सर्व पंचायत मंडळे, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थानी एकत्र येऊन म्हादई रक्षणाबाबत ठराव घेण्याचे आवाहन आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राजेंद्र केरकर यांनी कर्नाटकाने कशाप्रकारे म्हादईच्या विरोधात कारस्थान आखलेले आहे याबाबत सविस्तर माहिती देताना भविष्यात तब्बल १२ धरणे बांधण्याचा कर्नाटकाचा डाव असून आताच विरोध दर्शवला नाही तर भविष्यात याचे भीषण परिणाम गोव्याला भोगावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली.
राजेश गावकर, गणपत गावकर, प्रशांत देसाई, विश्वजीत राणे, अमृतसिंग, चंद्रकांत शिंदे, राजन फाळकर, विठोबा सावंत, जिवबा राणे, उर्मीला म्हामईकर आदिनी आपले विचार व्यक्त केले. धरणाच्या पाण्याबरोबरच राज्यात जो पाऊस पडतो त्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी मीनी बंधारे बाधण्याचा प्रस्तावही यावेळी व्यक्त करण्यात आला. म्हादईचे पाणी वळवण्याचा कर्नाटकी डाव हाणून पाडण्यासाठी संघटित लढा देण्याचे आवाहन सर्व व्यक्त्यांनी केले.
पंचायती ठराव घेणार
म्हादईचे पाणी वळवण्यास सक्त विरोध दर्शवणारे ठराव प्रत्येक पंचायत व ग्रामसभेत घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच विविध सामाजिक संस्थातर्फेही ठराव घेण्यात यावेत यासाठी जागृती करण्याचे आवाहन निमंत्रक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
लवादासमोर भूमिका मांडणार
१२ ते २४ डिसेंबर दरम्यान लवादाचे त्रिसदस्यीय शिष्टमंडळ गोव्यात येत असून त्यांच्यासमोर गोव्याची बाजू मांडण्यात येणार असल्याने यावेळी सांगण्यात आले.
पंतप्रधान व राष्ट्रपतींना भेटणार
सर्व पंचायतीचे ठराव घेऊन पंतप्रधान, राष्ट्रपतीना व केंद्रीय जलससांधन खात्याकडे निवेदन देऊन गोव्याची भूमिका मांडण्याचेही निश्चित करण्यात आले. याप्रकरणी खासदार श्रीपाद नाईक यांनीही पुढाकार घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीनंतर आगामी काळात उत्तर गोव्यातील सर्व पंचायतीना संघटित करून ठराव घेण्याचे ठरले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशांत वझे यांनी केले.