Home बातम्या मोहनदास ते राष्ट्रपिता महात्मा गांधी

मोहनदास ते राष्ट्रपिता महात्मा गांधी

0

शंभू भाऊ बांदेकर

बॅ.मोहनदास करमचंद गांधी ९ जानेवारी १९१५ रोजी परदेशातून मुंबई येथे आले. यावेळी त्यावेळच्या प्रसिद्ध ‘बॉम्बे क्रॉनिकल’च्या प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गांधी म्हणाले, ‘‘सुमारे पाव शतक मी भारताबाहेर आहे; त्यातही तेरा वर्षे मी अखंड बाहेर आहे. त्यामुळे आता आपल्या प्रिय व प्राचीन भारतभूमीचे दर्शन घेताना मला व माझ्या पत्नीला अत्यंत आनंद होत आहे. जनतेने आमचे प्रेमभराने, अंतःकरणपूर्वक स्वागत केले त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. या स्वागताला आम्ही पात्र आहोत, असे आम्ही आमच्या भावी वर्तनाने सिद्ध करू अशी मला आशा आहे.’’

यावेळी आपणास राजकीय गुरूसमान असलेल्या गोखले यांचा उपदेश गांधीजींनी शिरसावंद्य मानला. तो उपदेश म्हणजे- ‘कोणत्याही घाईच्या कार्यक्रमात तुम्ही उडी घेऊ नका, आणि कोणत्याही सार्वजनिक प्रश्‍नावर आपले मत प्रदर्शित करण्यापूर्वी एक वर्षभर हिंदी परिस्थितीचा अभ्यास करा आणि हिंदी राजकारणाचे निरीक्षण करा.’

एक वर्षाच्या या ‘मौनाच्या करारा’मुळे आपण वचनबद्ध झालेले आहोत, अशी ठाम समजूत करून घेऊन गांधींनी १९१५ चे संपूर्ण वर्ष देशात दौरे काढण्यामध्ये, देशातील विविध पुढार्‍यांना भेटण्यामध्ये आणि त्यांच्याशी देशाचे स्वातंत्र्य, देशाची आर्थिक परिस्थिती, देशातील अस्पृश्यता, देशाचा विकास आणि देशाची अधोगती इत्यादी विषयांवर विचारविनिमय करण्यामध्ये व एकूण आपला भारत देश सर्वांगांनी समजून घेण्यामध्ये घालविले.

ब्रिटिशांच्या मुत्सद्देगिरीवर गांधीजींचा विश्‍वास कायम राहिला. ब्रिटिश मुत्सद्यांना कृतिशील करण्यासाठी जर कशाची गरज असेल तर फक्त लोकमताच्या पुरेशा दडपणाची असे त्यांना वाटे.

यानंतर गांधीजींनी लोकमान्य टिळक, श्रीमती ऍनी बेझंट, लाला लजपतराय, पं. मदनमोहन मालवीय आणि पुण्याच्या सर्व्हन्टस् ऑफ सोसायटीचे सभासद अशा सार्वजनिक व्यक्तींशी आपले संबंध वाढविले आणि विनोबा भावे, महादेव देसाई, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी, काका कालेलकर, जमनालाल बजाज, सी. एफ. अँड्र्यूज वगैरे सहकारी आपल्याभोवती गोळा केले व देशाचा विकास, देशातील अस्पृश्यता, देशाचे पारतंत्र्य अशा अनेक गोष्टींवर त्यांना लक्ष केंद्रित करायला लावले.

त्यांच्या दौर्‍यात त्यांचे सहकारीही अनेकदा सामील होत व त्यांच्या सहवासाचा, भाषणांचा आनंद लुटत. असाच एक त्यांचा दौरा पुण्याच्या ‘सर्व्हन्टस् ऑफ इंडिया सोसायटी’मध्ये होता. या वेळेच्या सुखसंवादाच्या मेळाव्यातील गांधीजींचे भाषण अत्यंत आनंददायक व सद्बोधक अशा प्रकारचे होते. पुढे त्यांनी आपल्या कार्याची दिशा विस्तारित करताना आपले राजकीय गुरू गोखले यांनी स्थापन केलेल्या ‘फिनिक्स’ या संस्थेस आपले सहकारी, अनुयायी यांच्यासह वाहून घेतले. यासंबंधी त्यांनी ‘मद्रास मेल’ वृत्तपत्रास मुलाखत देऊन या संस्थेचे कार्य स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘मातृभूमीची चिरकाल सेवा करण्यासाठी तरुण पुरुषांना, स्त्रियांना व मुलांनाही शिक्षण देण्याचा हा प्रयोग आहे. प्रत्येकाने काही ना काही शरीरश्रमाचे काम करावे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आपल्या कृषिप्रधान देशात शेतीवरील काम हा शरीरश्रमाचा उत्तम प्रकार. म्हणून दिवसातील काही वेळ तरी प्रत्येकाने शेतीवर काम करावे अशी अपेक्षा आहे. हातमाग सुरू करून काम करायला हवे. संस्थेतील प्रत्येकाने देशातील प्रमुख भाषा अभ्यासल्या पाहिजेत, म्हणजे भारताच्या विविध भागांतील जनतेशी त्यांचा सहजगत्या संबंध येईल. परस्परांच्या व्यवहारासाठी फक्त देशी भाषाच वापरल्या गेल्या पाहिजेत. इंग्रजीचा उपयोग शक्यतो ब्रिटिश लोकांपुरताच केला गेला पाहिजे किंवा ज्यांना भारतीय एकही प्रमुख भाषा येत नाही त्यांच्यापुरता केला गेला पाहिजे. ब्रह्मचारी व दारिद्य्र ही व्रते संस्थेत कडकपणे पाळली जातील. हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याला पुष्कळ तरुणांनी साथ दिली तर आपल्याला गोंधळात टाकणारे किंवा काळजी करावयास लावणारे अनेक महत्त्वाचे प्रश्‍न आपोआप सुटतील.’’

या विचारांनी प्रेरित झालेले हजारो-लाखो अनुयायी गांधीजींना लाभले. मग देशभर दौरे करून सत्य, अहिंसेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. स्वातंत्र्य, स्वराज्य, समता आदींसाठी ते अहर्निशपणे वावरले. आपली साधी राहणी, कमीत कमी आहार घेऊन जास्तीत जास्त वेळ कामात मग्न राहायचे व्रत त्यांनी आचरणात आणले. हिंदू संस्था, ख्रिश्‍चन संस्था, मुस्लीम लीग इत्यादी सर्व जातिधर्माच्या संस्थांत वावरून सगळ्यांना स्वातंत्र्यासाठी एक होण्याचे आवाहन ते करीत राहिले. तसेच आपल्या वाणीने व लेखणीने ‘दुर्बल व सबल या उभयतांसाठी सविनय प्रतिकार ही एक मोठी नैतिक शक्ती आहे; तिच्यावर आत्मबल अवलंबून असते’ हा विचार सर्वत्र रुजविला. तसेच ध्येयाने ज्ञान होणे निराळे आणि त्याचे आचरण होणे निराळे. आचरणाने अधिक शिस्त लागते व त्यामुळे अधिक सेवा करता येते हे स्वानुभवाचे बोल त्यांनी इतरांना पटवून दिले. कनक, कांता व जमीन ही पापाची तीन उगमस्थाने आहेत. पापाचा प्रतिकार केला पाहिजे. माझ्या चैनी भागविण्यासाठी मी जमीन, स्त्री किंवा पैसा बाळगता कामा नये. दुसरी माणसे निष्ठाशून्य आहेत म्हणून मी तसे असावे, या विचाराला मनात धारा देता कामा नये. आपल्या ध्येयाचे आचरण आपण केले म्हणजे खोडसाळ कृत्यांना कमी वाव मिळेल व आपल्या सार्वजनिक जीवनाला आकार देता येईल. अशा सर्वसामान्य विचारांनी त्यांनी जनमानसात जागृती केली. परदेशातून बॅरिस्टर होऊन, तेथील लोकांत समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी वावरून आलेले मोहनदास करमचंद गांधी आपल्या कर्तृत्वाने या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी बनले. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!