– प्रा. रमेश सप्रे
आपल्या मुलांचं शिक्षण हा त्यांचा सर्वांगीण विकास असतो. यासाठी त्यांच्यावर संस्कार घडवावे लागतात. म्हणजेच शिक्षणाचं उद्दिष्ट मुलांचा पूर्ण विकास तर शिक्षणाचं माध्यम संस्कार असतात. असं शिक्षण अर्थातच शाळेपुरतं मर्यादित राहत नाही. जीवनाच्या सर्व अवस्थात – अगदी व्यापक अर्थानं अखेरच्या श्वासापर्यंत – शिक्षण चालूच असतं. अनेकजण शिकणं बंद करतात एवढंच. अंतीम श्वासापर्यंत म्हणजे क्षणापर्यंत ज्याचा विकास चालू असतो तो महात्मा. बाकी सर्व ‘मृतात्मे’!
जीवनाचा विद्यार्थी असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. अर्थात यासाठी सतत अभ्यास करत राहणं व जीवनाची परीक्षा देत राहणं आवश्यक आहे. सर्व अवस्थात तान्ह्या बाळापासून ते वृद्धावस्थेपर्यंत अनौपचारिक (इनफॉर्मल्) शिक्षण चालू असतं. बीजात भावी वृक्षाचा विस्तार दडलेला असतो. मुळात फळ अव्यक्त असतं. तर फळात पुढच्या विकासाची बीजं असतात. याला ‘बीज-फल’ किंवा ‘मूल-फल न्याय’ म्हणतात. गंमत म्हणजे तसं पाहिलं तर मुळात फळ दिसत नाही अन् फळात मूळही दिसत नाही. पण ते असतंच असतं. सूक्ष्म रूपात!
झाडाचं जीवन जे पाणी ते मुळातच घालायचं असतं. अगदी चांगल्या वाढीसाठी घालावयाचं खतही या मुळातूनच आत शिरतं नि झाडाचा विकास घडवतं. मूळ-अंकुर-पानं-फांद्या-फुलं-फळं ही वाढही आहे अन् त्यांची रचना व कार्य लक्षात घेतलं तर विकासही आहे. अगदी लहान कीटक – माशी, डास, रेशमाचा किडा हे अंडी, अळी (कॅटरपिलर), कोश(ककूज), प्रौढावस्था(पूर्ण कीटक) अशा अवस्थांतून जातात. बेडकाच्याही अशा अवस्था असतात. एका अर्थी हा विकासच असतो. पण हा बदल बाहेरून घडलेला असतो. सर्वांचा तो सारखाच असतो. याला जीवनविकास असं न म्हणता जीवन-इतिहास (लाइफ-हिस्टरी) किंवा बाहेरून बदललेला आकार वा अवस्था (मेटॅमॉर्फोसिस) असं म्हणतात. यात मन बुद्धी म्हणजेच विचार, भावना, कल्पना यांचा विकास घडत नाही. व्यक्तिमत्व विकास फक्त मानवाच्या मुलाचा घडतो. म्हणूनच माणसाचं शिक्षण (एज्युकेशन) असतं तर इतर प्राण्यांचं-पक्ष्यांचं (सर्कस, प्राणिसंग्रहालय इ. ठिकाणच्या) प्रशिक्षण (ट्रेनिंग) असतं. फक्त माणूसच सुसंस्कृत (कल्चर्ड) बनू शकतो. इतर पशुपक्षी केवळ संस्कारित (ट्रेन्ड) बनतात. हा फार मोठा फरक आहे. असं शिक्षण झालं नाही तर माणूस म्हणजे दोन पायांचा प्राणी ः ‘साक्षात् पशुः पुच्छविषाण हीनः’ – शेपुटशिंगं नसलेलं जनावर!
मूल असतानाच सुरू झालेलं किंवा सुरू केलेलं शिक्षण जीवनाच्या सर्व अवस्थात चालू राहतं. पहिलं शिक्षण हे शाळा-महाविद्यालयातून दिलेलं सुरचित(स्ट्रक्चर्ड) शिक्षण असतं. नंतरचं स्वतः मिळवायचं असतं. अशा अनौपचारिक (नॉन-फॉर्मल) शिक्षणाच्या असंख्य संधी सध्या उपलब्ध आहेत. आपण त्याचा लाभ मात्र घेतला पाहिजे. नाही तर आपण करंटेच! असो.
चीनचा भाग्यविधाता माओ याच्या लहानपणची एक गोष्ट आहे. त्याचा अधिकाधिक वेळ तो आपल्या आजीबरोबर बागेत घालवायचा. ती बाग त्याच्या आजीचा जीव की प्राण होती. असंख्य प्रश्न विचारणार्या छोट्या माओचं तिला भारी कौतुक. तीही शांतपणे त्याच्या प्रश्नांना उत्तर देई. पुढे माओ कविमनाचा झाला. चीनमध्ये सामाजिक क्रांती, सांस्कृतिक क्रांती घडवण्यासाठी त्यानं घोषणा केली, ‘हजारों फुलं फुलू द्यात (लेट थाउजंंड्स ऑफ फ्लॉवर्स ब्लूम)’. त्याचं मूळ या आजीनं घडवलेल्या संस्कारात होतं. एकदा काही दिवसांसाठी आजीला बाहेर जावं लागलं. तिनं माओला बागेची नीट काळजी घ्यायला सांगितलं. परत येऊन पाहते तो अनेक झाडं कोमेजलेली. माओला विचारल्यावर तो म्हणाला, ‘आजी, मला सुद्धा कळत नाही की असं का झालं? मी तर झाडांची खूप काळजी घेतली होती. रोपाचं प्रत्येक पान पुसून मी त्याच्यावर थोडं थोडं पाणी घालत होतो.’ यावर हसून आजी उद्गारली, ‘अरे वेड्या, पाणी झाडांच्या पानांवर घालायचं नसतं तर मुळात घालायचं असतं.’ तेव्हा कुठे छोट्या माओच्या डोक्यात प्रकाश पडला.
मुळातूनच झाडं आपलं पोषण(न्युट्रिशन) मिळवतात व वाढत राहतात. ‘मूल-फल न्याया’चा हा एक पैलू आहे. मुळांचं रक्षण, पोषण जितकं चांगलं तितकी फळं चांगली होतात. एवढंच नव्हे तर मुळापासून फळापर्यंत होणारा विकास हा एकसूत्री (इंटिग्रेटेड) असतो. रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या खास शैलीत म्हटलंय, ‘झाडाचं एक पिकलेलं पानही गळून पडणार असेल तर तो झाडाच्या सर्व भागांचा निर्णय असतो.’ झाडांच्यात सजीवता असते(ऑर्गॅनिक युनिटी) ती अशी. ‘मूल-फल न्याया’चा हा दुसरा पैलू आहे. मुळं घट्ट तर अख्खं जीवन सुरक्षित कारण अशी घट्ट मुळं असलेली (डीपरूटेड) व्यक्ती सुविकसित (वेल डेव्हलप्ड) होण्याची शक्यता अधिक असते.
पण ‘मूल-फल न्याया’चा खरा महत्वाचा पैलू आहे – जे मुळात तेच फळात! म्हणतात ना विषारी बीजं पेरली तर विषवृक्षच तयार होणार. अमृतवृक्ष हवा असेल तर अमृत-बीजंच पेरायला हवीत. आपल्या घरात रामकृष्ण जन्मावे असे वाटत असेल तर आधी आपण कौसल्या-दशरथ व देवकी-वसुदेव व्हायला नको का? कारण आपण मूळ असतो तर आपली मुलं ही फळं असतात. फरक एकच असतो की झाडाची मुळं खाली असतात. फळं वर लागतात. तर आपल्या वंशवृक्षाची मुळं वर असतात. फांद्या-पानं-फुलं-फळं हा विस्तार खाली वाढत जातो. या संसारवृक्षाला भगवंतांनी गीतेत ‘ऊर्ध्वमूलं अधःशाखम्|’ असंच म्हटलंय. मुळं वर तर शाखा (फांद्या इ.) खाली.
मूळ व फळं यात कितीही एकात्मता असली तरी प्रवृत्ती निरनिराळ्या भागाची वेगळी असते. आपल्या देहाच्या अवयवांचं असंच असतं. डोळे-कान-नाक यांचं कार्य भिन्न असते. कार्यपद्धतीही वेगवेगळी असते. पण कार्य परस्परपूरक असतं. तसं मुळं ही मातीच्या दिशेनं आत जाणारी (जिऑट्रॉपिक) असतात. तशीच ती पाण्याच्या दिशेनं (हैड्रोट्रॉपिक) वाढत राहतात. पण खोड-फांद्या इ. प्रकाशाच्या (आकाशाच्या) दिशेनं (फोटोट्रॉपिक) विकसत जातात. मुलांवर संस्कार घडवतानाही हा विचार करावा लागतो. सकाळी (वा संध्याकाळी) योग, ध्यान, प्रार्थना करताना आत वळलेलं, अंतर्गामी (इंट्रोव्हर्ट) मन हे अभ्यास करताना, काम-धंदा करताना पुस्तकांकडे, इतर साधनांकडे वळलं पाहिजे. नाहीतर अनर्थ होईल. एकांतात ध्यान तर लोकांतात भान असलं पाहिजे. त्या दृष्टीनं मुलांना घरी वा शाळेत शिकवलं पाहिजे. विशेषतः श्वासनियंत्रण, ध्यान, प्रार्थना, स्वयंसूचना (ऑटो सजेशन) यावर आधारित सत्र पंधरा मिनिटं तरी शाळेच्या वेळापत्रकात बसवलं पाहिजे. ज्या अपवादात्मक शाळातून हे सुरू केलंय त्या शाळात अपवादात्मक शिस्त व चांगली कामगिरी आढळून आलीय. घरी मुलांबरोबर पालक जर असं आध्यात्मिक सत्र रोज घेत असतील तर ते घर भाग्याचं! मुलं लहान असल्यापासून सुरुवात केली तर अनेक वर्ष हे सत्र चालू राहतं असा अनुभव आहे. मुळापासून फळापर्यंतच्या प्रवासात अनेक टप्पे असले तरी तो प्रवासअखंड चालू असतो. गंगा समुद्राला मिळाली तरी उगमापासून अखंड वाहतच असते म्हणून तिला गं-गा म्हणजे जाते (गमन) आणि जातच राहते (गामिनी!) मुळापासून फळापर्यंतचा विकास व प्रवास हा असा निरंतर चालू असतो. संस्कारांना सुट्टी नसते. शिक्षणाला पूर्णविराम नसतो.
‘शुद्ध बीजा पोटी| फळे रसाळ गोमटी॥ ही जशी संतवाणी आहे तशीच शास्त्रज्ञांची वाणीही आहे. आपला ‘बीजशुद्धी’चा सिद्धांत आहे त्यालाच विज्ञानात जनुकांचं शुद्धिकरण (रिफाइनमेंट ऑफ जीन्स) असं म्हणतात. असं म्हणतात की एखाद्या पिढीत सुरू केलेली आध्यात्मिक उपासना व खरी धार्मिक साधना तशीच चालू राहील तर वंशाचं बीज शुद्ध होत जाऊन आठव्या पिढीत संतपुरुष जन्माला येतो. संतचरित्राच्या असा आठ पिढ्यांचा शोध नि वेध घेतलेला दिसतो. यासाठी कुटुंबात हवी स्वयंशिस्त; सर्व प्रकारचा अतिरेक टाळून आलेला नीटनेटकेपणा, नेमस्तपणा, उपासनेचा नित्यपाठ, उमलत्या पिढीवर कालानुरूप व परंपरेनुसार घडवलेले संस्कार, तसंच त्यांनी अनुसरण करावं असं वडील मंडळींचं प्रत्यक्ष उदाहरण या गोष्टी हव्यात. उगीच नवससायास व कर्मकांडी व्रतवैकल्य करून तेजस्वी पिढी निर्माण होत नाही.
बीज किंवा मुळं ही अनुवंशिकता (हिरिडिटी) आहे तर विकासासाठी अनुकूल परिस्थिती हे वातावरण (एनव्हॉयर्नमेंट) आहे. पण एक गोष्ट सदैव लक्षात ठेवायची की अभ्यास हे मूळ तर निकाल (रिझल्ट) हे फळ आहे; साधना मूळ, तर सिद्धी फळ; शिष्य हे मूळ तर गुरू हे फळ आहे. कठोपनिषदातील यम-नचिकेता संवादात यम छोट्या नचिकेतला खूप प्रलोभनं दाखवतो. नचिकेतानं मागितलेल्या ‘मृत्यूचं रहस्य जाणणाच्या’ वराला इतर पर्याय सुचवतो पण या सार्यांचा नचिकेताच्या दृढ निश्चयावर परिणाम होत नाही. कारण भावी विकासाची व प्रभावाची बीजं (मुळं) लहानपणीच दिसून येतात. या मूल-फल न्यायानुसार घडणार्या विकासासाठी आपल्याला काय करता येईल?
श्र घरातलं वातावरण प्रसन्न ठेवता येईल. एकमेकातील संबंध जिव्हाळ्याचे राखता येतील. भोगापेक्षा त्याग, सुखापेक्षा सेवा, स्वार्थापेक्षा परार्थ अधिक महत्वाचा मानून राहावं लागेल.
श्र आधी पाया मग इमारत म्हणजेच आधी मूळ नंतर फळ. एवढंच नव्हे कर मूळ तसं फळ. लहानपणी मुलांसमोर स्वतःच्या वर्तनातून आदर्श निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. घरी पालक तर शाळेत शिक्षक हेच मुलांचे आदर्श (रोल मॉडेल्स) बनू शकतात. केवळ परीक्षेची तयारी करून घेणं म्हणजे मुलांना घडवणं नव्हे. तर सुसंस्कृत मुलं जी कुटुंबाचा गौरव नि राष्ट्राचा अभिमान बनतील ती घडवणं हे खरं कर्तृत्व आहे. इकडे सध्या प्रचंड नि अक्षम्य दुर्लक्ष होतंय. पण स्वतःच्या पैशाची नि मुलांच्या मार्कांची नशा चढलेल्या लोकांना खूप उशीरा त्यांच्या मर्यादांची जाणीव होतेय. त्यामुळे आपण आत्मकेंद्री, स्वार्थी बनू लागलो आहोत. या वृत्तीची फळं आपण चाखू लागलो आहोत. पण अजून उपरती नाही.
श्र शाळेतही सारं शिक्षण प्रश्नोत्तरांच्या वर्तुळात गर्गरतंय. टाचणं – टिपणं (नोट्स) सुद्धा मागे पडली. फक्त प्रश्नोत्तरं! या गिरणीतून मार्क्स, टक्के, ग्रेड्स यांचं पीक नव्हे तर पीठ तयार होतंय. त्याची सकस भाकरी बनवण्याऐवजी चमचमीत पिझ्झा बनवणं सुरूय. सारा प्रवास संख्यात्मक (क्वांटिटेटिव्ह) आहे. गुणात्मकतेचा (क्वालिटी)बळी दिला जातोय. सध्याच्या माहिती युगात हे टीक वाटतंय. पण यातून ज्ञानयुगाचा उदय कसा होणार?
श्र इमारतीचे दोन प्रमुख भाग (अंगं) असतात. पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) नि वरची उभारणी (सुपरस्ट्रक्चर). आज वरच्या उभारणीकडे (म्हणजेच फळाकडे) अधिक लक्ष पुरवलं जातंय पण पायाभरणीकडे (म्हणजे मुळाकडे) दुर्लक्ष होतंय. केवळ लवकरात लवकर मुलांना शाळेत घालणं (डांबणं!) म्हणजे संस्कारांची पायाभरणी नव्हे हे आपल्या लक्षात येईल तो सुदिन!
श्र आरोग्याच्या सवयी, व्यायामाची आवड, स्वच्छतेचे संस्कार शाळेत घडवले नाहीत तर पुढच्या जीवनात अधिक व्याधींना बळी पडावं लागतं. व्याधिग्रस्त दीर्घायुष्य हा शाप नव्हे काय?
श्र सामाजिक पातळीवर याची जाणीव होण्यासाठी पालकांचा (मातापित्यांचा) सत्कार केला गेला पाहिजे. हल्ली गोवत्स द्वादशीला (वसुबारस, दिवाळीच्या आधीचा दुसरा दिवस) अशा मातांचा सत्कार केला जातो ज्यांनी विविध क्षेत्रात महान कामगिरी करणार्या मुलांना घडवलं.
श्र काही शाळातून आजी-आजोबांसाठी स्नेहसंम्मेलन साजरं केलं जातं. मुलं त्यांच्यासाठी कार्यक्रम सादर करतात. त्यांना फुलं, मिठाई, भेटी देतात. सर्वांचं हृदय हेलावणारा हा कार्यक्रम असतो.
शेवटी एक मुद्दा चिंतन व कृतीसाठी! ‘हेचि फल काय मम तपाला’ असं अनेक पालक सुस्कारे सोडत विचारतात. खरंच त्यांनी मुलांसाठी खूप केलेलं असतं. जीवनात खूप भोगलेलं असतं. चूक एकच असते की ‘फळ’ मिळण्यासाठी ‘मुळाची’ काळजी घेण्याऐवजी पान-फुलांकडेच लक्ष दिलेलं असतं. म्हणजेच मूलभूत, मौलिक संस्कारांपेक्षा साजश्रुंगाराकडे लक्ष अधिक दिलेलं असतं. अभ्यासापेक्षा परीक्षेला अधिक महत्व दिलेलं असतं. मुळाकडे दुर्लक्ष केलं तर फळ अपेक्षेप्रमाणे येईलच कसं?… विचार करू या…!