गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. विद्यमान गोमंतक मराठी अकादमीसंदर्भातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे सारे प्रयत्न थकल्यानंतर निरुपाय होऊन सरकारला शेवटी हे पाऊल उचलावे लागले आहे. गोव्यातील समस्त मराठीप्रेमींची स्थिती त्यामुळे आज एका डोळ्यात हासू आणि एका डोळ्यात आसू अशी झाली असेल. कै. शशिकांत नार्वेकर आणि इतरांनी रक्ताचे पाणी करून नावारूपास आणलेल्या विद्यमान गोमंतक मराठी अकादमीच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला जाण्याचे दुःख आणि सरकारी पातळीवर गोव्यामध्ये मराठीला सन्मानाचे स्थान मिळवून देणारे शासकीय अकादमीच्या रूपातले पहिले पाऊल उचलले गेल्याचा आनंद अशी ही द्विधा मनःस्थिती आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा गोमंतकातील शतकानुशतकांचा वारसा या नव्या संस्थेच्या निमित्ताने शासकीय पातळीवर जाहीरपणे मान्य झालेला आहे आणि ही एक खूप महत्त्वाची घडामोड आहे. लोकसहभागातून स्थापन झालेल्या विद्यमान गोमंतक मराठी अकादमीचे कार्य स्वबळावर पुढे रेटण्याच्या कितीही वल्गना केल्या गेल्या, तरी सगळी सोंगे आणता येतात, परंतु पैशाचे सोंग आणता येत नसतेे. स्वबळावर कार्य पुढे नेण्याची खरोखरच धमक असेल तर त्यांनी ते जरूर पुढे न्यावे. त्याला कोणीही आडकाठी केलेली नाही. परंतु गोमंतकीय मराठीप्रेमींच्या त्या शिखरसंस्थेची सारी प्रतिष्ठा आणि नावलौकीक आतापावेतो धुळीला मिळाला आहे. मराठीप्रेमी त्यापासून सतत तुटत गेले आहेत. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता नव्या गोवा मराठी अकादमीची स्थापना ही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या क्षितिजावरील पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक बाब बनली होती. लवकरच मुहूर्तमेढ रोवल्या जाणार असलेल्या या नव्या गोवा मराठी अकादमीला ‘सरकारी’ थाटाची न बनवता लोकाभिमुखता, प्रतिष्ठा आणि लौकीक प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी तिच्या कार्यकारिणीवर असेल. त्यासाठी मराठी साहित्य आणि संस्कृतीसाठी वावरत आलेल्या समर्पित, निःस्वार्थी कार्यकर्त्यांपाशीच या नव्या संस्थेची सूत्रे असणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण येऊ नये यासाठी समस्त राजकारण्यांना या संस्थेपासून चार पावले दूरच ठेवणे श्रेयस्कर ठरेल. लोकाभिमुखता आणि उपक्रमांची गुणवत्ता हे कै. शशिकांत नार्वेकर, प्राचार्य गोपाळराव मयेकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील गोमंतक मराठी अकादमीचे दोन ठळक विशेष होते. त्यामुळे ‘वर्षत सकळ मंगळी’ हे ब्रीदवाक्य धारण करणार्या त्या संस्थेचे नाव गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरही सदैव दुमदुमत राहिले होते. नव्या गोवा मराठी अकादमीची स्थापना जरी सरकारी प्रेरणेतून होत असली, तरी ती लोकाभिमुख आणि लोकप्रिय करण्याचे जे मोठे आव्हान समोर उभे आहे, त्या अनुषंगाने सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे या नव्या संस्थेला पूर्ण स्वायत्तता मिळायला हवी. म्हणजे भविष्यात बदलत्या सत्ता समीकरणांचा कोणताही दुष्परिणाम तिच्या कार्यावर होऊ शकणार नाही. कितीही मराठीद्वेष्टे सरकार कधीकाळी सत्तेवर आले, तरीही या संस्थेची गळचेपी करणे त्यांना शक्य होता कामा नये. व्यापक लोकसहभाग हा या नव्या संस्थेचा प्राण असला पाहिजे. ही संस्था आपल्या कार्यक्रम – उपक्रमांद्वारे अधिकाधिक लोकाभिमुख कशी करता येईल या विचाराला सर्वोच्च प्राथमिकता गरजेची असेल. प्रत्येक खेड्यापाड्यातील जाज्वल्य मराठीप्रेमीपर्यंत या नव्या संस्थेचे कार्य पोहोचावे लागेल आणि ही संस्था ‘सरकारी’ न वाटता प्रत्येक मराठीप्रेमीला आपली हक्काची संस्था वाटावी लागेल. केवळ पैसा हाताशी असला म्हणजे संस्था भरभराटीला येते असे नव्हे. त्यासाठी कल्पकता, नावीन्य, गुणवत्ता यांची आवश्यक असते. तसे घडले तरच अशा संस्थेमध्ये चैतन्य खळखळत राहतेे. सध्या मराठीशी संबंधित उपक्रम कला अकादमी, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, कला आणि संस्कृती खाते, राजभाषा संचालनालय अशा विविध घटकांपाशी विभागले गेले आहेत, ते या संस्थेच्या एका छत्राखाली आणले गेले, तर गोमंतकातील मराठी भाषा आणि संस्कृतीची शिखरसंस्था हे गौरवाचे स्थान ती नक्कीच मिळवू शकेल.