Home बातम्या मुखर्जींना पाठिंब्याच्या मुद्द्यावर रालोआत मतभेद

मुखर्जींना पाठिंब्याच्या मुद्द्यावर रालोआत मतभेद

0

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी काल सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर रालोआचे निमंत्रक शरद यादव यांनी सांगितले की, बैठकीत सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी सविस्तरपणे मते मांडली. मात्र निर्णय झालेला नसून येत्या दिवसांत पुन्हा भेटून त्याबाबत ठरविण्यात येईल. लालकृष्ण अडवाणी रालोआच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दिल्लीबाहेरच्या अन्य नेत्यांशीही संपर्क साधला जाणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांचे मत रालोआचे उमेदवार उभा करावा असे होते मात्र घटक पक्ष जनता दल – संयुक्तच्या मते प्रणवदांना आव्हान देणे बरोबर होणार नाही. कालच्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता.

दरम्यान, मुंबईत रालोआचा घटक पक्ष शिवसेनेची बैठक झाली. यात राष्ट्रपतीपदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आले.

संगमा यांना पाठिंबा दिला तर जुने सहकारी अण्णा द्रमुख आणि बिजू जनता दल आपल्यासोबत येऊ शकतात असे मतही काही घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले मात्र पाठिंबा देण्यापूर्वी सर्व गोष्टी पडताळून पाहाव्यात असेही सूचविल्याचे कळते. तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाचा हट्ट सोडून संगमांना पाठिंबा देतील काय याबाबतही तर्कवितर्क व्यक्त झाल्याचे समजते. कलाम यांनी निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळून लावली असली तरी रालोआतील घटक जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यासारखे त्यांना उमेदवारी दिली जावी अशा मताचे आहेत.