हमजा याला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने त्याला पंधरा दिवसांचा पोलीस रिमांड मिळवला आहे. मुंबईच्या क्राईम ब्रँचचे एक पथक येत्या काही दिवसांत त्याला ताब्यात घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे.
अबू हमजा याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला संबंधित यंत्रणांकडे सोपविण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काल दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांनीही या घटनेला दुजोरा दिला. दिल्ली पोलिसांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आम्ही असून तो मिळाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे ते म्हणाले.
अबू हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असून तो भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाते. मुंबईवरील हल्ल्याच्या नियोजनासाठी तो पाकिस्तानात गेला होता. अबू हा अनेक नावांनी वावरत असे. सन २००५ साली बंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणातही पोलिसांना तो हवा होता. त्याच्याविरुद्ध भारताच्या विनंतीनुसार इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या अटकेमुळे मुंबईवरील हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करणार्या आवाजाचे गूढ उकलणार आहे.
अबू हा आखाती देशांत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर अधिकार्यांनी मिळवली होती. दहशतवाद्यांशी केलेल्या संभाषणात तो हिंदीचा सफाईने वापर करीत असल्याचे दिसून आले होते. ‘प्रशासन’ सारखे शब्द त्याच्या संभाषणात ऐकू आल्याने हा आवाज भारतीयाचा असावा असा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी बांधला होता. गेली तीन वर्षे भारतीय गुप्तचर यंत्रणा अबू याच्या मागावर होत्या. तो मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई भागातील आहे. सन २००५ पासून तो बेपत्ता झाला होता. बीडच्या इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेणारा हमजा गुजरातमधील दंगलींनंतर ‘सिमी’ संघटनेवर बंदी घातली गेल्याने लष्कर ए तोयबाच्या संपर्कात आला होता. गुप्तचर यंत्रणांनी मुंबई हल्ल्यानंतर अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हमजाची माहिती मिळाली होती. तो कराची आणि पाकव्याप्त काश्मीरमधून वावरत असल्याचा तपशील गुप्तचर यंत्रणांना मिळाला होता. सध्या मुंबईत कारावासात असलेल्या अजमल कसाब यानेही अबु हमजा याच्या मुंबई हल्ल्यातील सहभागाची कबुली पोलिसांना दिलेली होती. सतत पाठपुरावा करून गुप्तचर यंत्रणांनी अखेर त्याचा सौदी अरेबियातील ठावठिकाणा शोधून काढला आणि इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात हस्तांतरित करण्यात यश मिळवले.
हल्ल्यातील सहभागाची हमजाची कबुली
अबू हमजाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात स्वतः सामील असल्याची कबुली दिल्ली पोलिसांना काल दिली. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या झाकीउर रेहमान लख्वी याच्या मार्गदर्शनाखाली आपण या कटात सहभाग घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे. कराचीतील नियंत्रण कक्षातून आपण हल्ल्यात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या दहा दहशतवाद्यांना दिशादिग्दर्शन केल्याचेही त्याने कबूल केले आहे. हमजा याची किमान दहा टोपणनावे असून वेगवेगळ्या नावांनी आजवर तो वावरत आला होता.