Home बातम्या माटोळी

माटोळी

0

पौर्णिमा केरकर

गणेशाच्या आगमनाचा जल्लोष अजून काही पुरता ओसरलेला नाही. दीड, पाच, सात, नऊ दिवसांच्या गणेशपूजनाची हौस भागवून इतरत्र असलेले एकवीस दिवसांचे गणेशचित्र देखावे बघण्यासाठी उसंत काढून कुटुंबीयांसमवेत फिरणे होत आहे.

लोकमान्य टिळकांनी सामाजिक परंपरा भावनेचा विचार मनीमानसी रुजविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. त्याला आज व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. पैसा प्रतिष्ठा पणाला लावून धूमधडाक्यात उत्सव साजरा करण्याकडेच गणेशोत्सव मंडळाचे प्रयत्न दिसतात. या सार्‍यांसाठी राजकीय मंडळीचा वरदहस्त अतिशय गरजेचा झालेला आहे. दारूकामाची आतषबाजी, भडक विद्युत रोशणाई, ज्या राजकीय व्यक्तीने अथवा पक्षाने मंडळाला मदत केलेली असेल त्यांच्या बॅनरखाली जाहिराती, अनेकांनी प्रायोजित केलेल्या कार्यक्रमांची रेलचेल, कानठळ्या बसविणारा ध्वनिक्षेपकांचा आवाज, या सार्‍या प्रकारांमुळे वाटते की गणेशमहाराजांना गुदमरायला तर होणार नाही ना? मृण्मयी मातीपासून तयार करून घराघरांतील आसनांवर विराजमान करण्यात येणारी गणेशाची मूर्ती ही निसर्गपूजाच होती आहे. पण आज मात्र थर्मोकोल, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर करून पर्यावरण प्रदूषित करण्याचा विडाच उचलल्यासारखा वाटतो.

एक काळ असा होता की शिक्षणाचा जास्त प्रचार आणि प्रसार झालेला नसला तरी ज्या नैसर्गिक तत्त्वाने जगण्याला समृद्धी बहाल केली त्या तत्त्वासमोर नतमस्तक होणे लोकमानसाने महत्त्वपूर्ण मानलेले होते. त्याच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला आदराचे स्थान बहाल करण्यात आले. प्रतीकात्मकतेने त्याची पूजा आरंभिली व मोठ्या श्रद्धेने ही परंपरा प्रवाही ठेवली.

गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी, तयेच्या दिवशी बांधण्यात येणारी माटोळी लोकमानसाच्या कल्पकतेचा, बुद्धीचातुर्याचा एक मनोज्ञ आविष्कारच आहे. समाजाचा होत असलेला भौतिक विकास, त्यातून त्याच्या जगण्यात अतर्ंभाव झालेल्या आधुनिक गोष्टी म्हणून झालेला बदल परंपरा, रूढी, लोकसाहित्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण करतो. पण असे काही उपक्रम काही सजग संस्था राबवितात जेणेकरून या परंपरांतील लोकतत्व, नैसर्गिक अधिष्ठान अबाधित राहण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांपासून कला आणि संस्कृती खात्याने पारंपरिक माटोळी स्पर्धा आयोजित करून नव्याने या मातीतील संचिताची ओळख करून घेण्यास भाग पाडलेले आहे.

आम्या तुझा टाळा, टाळा मोडूनी रथ घडविला

गणपती देवाचा रथ घडविला

गणपती देवाची ही किमया

गणपती देवाला जाऊ शरणा

मांगल्याचे प्रतीक असलेला पाच पानांचा आंब्याचा टाळा माटोळीला मधोमध बांधून इतर फुले, फळे, पत्री माटोळीला बांधण्यास सुरुवात केली जाते. ही माटोळी म्हणजे औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेला खजानाच आहे, याची प्रचिती स्पर्धेसाठी म्हणून बांधण्यात आलेल्या माटोळी बघून येते. घराघरांतील माटोळी अनुभवतानासुद्धा हा जैवविविधतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सत्तरी, सांगे, काणकोणसारख्या तालुक्यातील तर वनौषधीचे वैविध्य अचंबित करायला लावणारे असेच होते. रानावनातील फुलाफळांचा, औषधी वनस्पतींचा कल्पकतेने वापर करून केलेली सजावट नजरेत भरणारी अशीच होती. एका अर्थाने पत्री फुलांची ही पूजा भूमीच्या सफलतेची, संपन्नतेची पूजा आहे. ग्रामीण लोकमानसाच्या ओठांवर सहजपणाने ओठांवर असलेली ही नावे त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचीच साक्ष पटवितात.

रानावनांत भटकताना अशा असंख्य झाडपाल्यांशी, फुलपत्रींशी त्यांचा संबंध आला असावा, त्यांचे प्रयोग करूनही बघितले असावेत. कोणता रोग, कोणते औषध यांचे आराखडे बांधले त्यानुसार मनातली जंत्री सुरू झाली. या सार्‍यांत ज्याने मन:पूर्वक लक्ष घातले तेही औषधे देण्यातील मातब्बर जाणकार झाले. दुखले, खुपले, इतर असंख्य शारीरिक मानसिक आजारपणासाठी मन हेच जाणकार आश्‍वासक झाले, अडीअडचणीला पोहोचणारे ठरले. सगळा गावच त्यांच्यावर विश्‍वास ठेवून निर्भर झाला. गावठी औषधांची सूक्ष्म जाण असणारे वैदू गावागावांत होते. कालांतराने विज्ञानाची प्रगती होत गेल्याने झाडपाल्याची औषधे वापरात आणणे हे अशिक्षितपणाचे लक्षण ठरले गेले. वनस्पती दुर्मीळ झाल्या. रानावनातील लोकांचा वावर कमी झाल्याकारणाने झाडपानांची, रानफुलाफळांची ओळखसुद्धा होताना कठीण झाली. पण चवथीच्या दिवसात मात्र वेगळेच चित्र अनुभवास येते. फुलपत्री पाना फळांनी भरलेल्या बाजारपेठा सजून धजून सामोर्‍या येतात. कधी नव्हे ती नावे घेऊन विकत घेणे होते. स्पर्धेच्या निमित्ताने माटोळीला जास्तीत जास्त नग बांधण्यासाठी काही विकत तर काही रानावनांत भटकून फुलेफळे, पत्री गोळा केली जाते. त्यांची नावे, औषधी गुणधर्म लक्षात ठेवून जेव्हा हे सारे पु ढे नेले जाते तेव्हा पारंपरिकतेच्या दृष्टिकोनातून ते फार मोठे यश असते. स्पर्धेत सहभागी झालेल्यांच्या माटोळीचा अनुभव घेताना या पारंपरिक धनाविषयी ऊर अभिमानाने भरून येतो. किती म्हणून वैविध्य? नुसतेच औषधी गुणधर्म नाहीत, त्यातही पारंपरिक भाज्या, पौष्टिक घटक, सकस धान्य सारेच माटोळीला बांधायचे. जे जे म्हणून संसारोपयोगी त्या त्या सार्‍यांविषयी कृतज्ञता अंत:करणात ओतप्रोत भरलेली. शिरमुंडोळी सुंदर वास असलेल्या या वनस्पतींच्या पानांची भाजी केली जाते. त्याशिवाय करनेफळा, कुयेची फळे, कुये ज्याला इरयअसेही संबोधले जाते त्याच्या आतील बियांनी खेळले जायचे. या बिया भाजून खाल्या तर काजूगरासारख्याच लागतात. पण जास्त खाल्याने भोवळ येण्याची शक्यता असते. चिप्स फळे, सोलगी, भेकर, बोकड्याची फळे, नागुलकुडा, जीनो, आशाळे, रक्तवेल, आटकी, रानकरमळ, सीतेवरीचे मूळ, धुपाचेफळ, रुद्राक्ष, ताडमाड, शिवलिंग, तांबडे चाफे, पांढरी अबोली, घोड्याची जिभली, घोड्याची पावले, हेरडा, कवचा फुल, ताह्मण फुल, लाजरी, हातो, जायफळ, सोनचाफ्याची फळे, वीख मोगरी, तुमो, कौशी, एरंड, खरसंगची शेंग, धनुकाचो कात्रो, फुगरो, नर्कवाल, आभाळ काकडी, माकडतीळ, पांडवगदा, लुतीचे फळ, दारांबो, तवशे, तोरींग, माडतीची फुले, कांगला, घागर्‍यो, हरयाळी, कारवी, रानदोडगी, फागला, करांदो, आणखीही असंख्य नावे संपता संपतच नाहीत. त्यातही लोकगायिकांनी त्यांना अशा काही खुबीने लोकगीतात गुंफून घेतलेले आहे की त्यातील सौंदर्याची किनार उंचावतच जाते.

इच्छा माझी गेली कांगल्यावरी

कांगल्यावाचून माटी शोभे ना रे देवा

कांगल्या वाचून माटी शोभेना

या तर्‍हेने विविध फळाफुलांच्या नावांचा वापर करीत करीतच हे गीत लांबविले जाते. एकातूनच इतर अनेक उपयोग, जी माटोळीसाठी उपयोगी त्याचाच वापर दैनंदिन जीवनव्यवहारात, त्यालाच दैवी अधिष्ठान बहाल करायची, त्याचीच मोठ्या श्रद्धेने पूजा करायची, मन:पूर्वक कृतज्ञता बाळगायची. त्यांच्यातीलच औषधी गुणधर्माचा वापर वृक्षवेलींना इजा न पोहोचविता करायची अशी चौफेर दृष्टी. ही एक सृजनशीलताच नावीन्याचा ध्यास असणारी.

भेरल्यामाडा फळांची लांबलचक लडसजावटीसाठी खुबीने वापरली की तिची आकर्षकताच वाढते. तळेवाडी नेत्रावळीचे महादेव शाबा गावकर औषधी वनस्पतीचे जाणकार कौशी (चवरमांडो) च्या सालीपासून त्या कुटून त्याचे गोंडे तयार करून ते पूर्वी पाडव्याला व इतरही वेळा गुरांच्या गळ्यात घातले जायचे. त्यांना नैसर्गिक रंग दिला जायचा. ‘खरसांगची लांबलचक शेंग तबला,

पखवाजसाठी उपयोगी असलेली. मासिक पाळीवर गुणकारी असलेला ताह्मण, एरंड, खरजेवरचे प्रभावी औषध असलेला तुमोवीख मोगरी, हात्यामधील (केवडा) सुगंधित बोणी सुकवून त्याचा काढा करून प्याल्यास हुरहुरेनष्ट होते. मुतखड्यावर सीतेचवरीची मुळे झरवून रस पिणे, लहान मुलांच्या घोषासाठी आटकी’, सर्पिणीवर लाजरी, कॅन्सरवरील दिलासा म्हणून पात फणसाकडे बघितले जाते. उलटी थांबविण्यासाठी सोलगीचा वापर अशी कितीतरी नावे ज्यांना औषधी गुणधर्म आहेत. अनेक कंदमुळे जी खतखतेसारख्या खाद्यपदार्थात वापरली जातात. माटोळी बांधण्यासाठी वापरण्यात येणारे दोर केवनीचे असतात. माटोळीचा साचासाटी ही केवनीच्या काठ्यांची, वर झाकण्यासाठी करमळाची पाने सारेच नैसर्गिक! काळ्या दोळ्यांचे, तांबड्या रंगाचे इटुकले गुंजीहे पूर्वी लहानांचे खास आकर्षण होते. रानावनात फिरून, कुंपणाच्या कडेेकुशीला गुंजीचे अस्तित्व शोधीत फिरणारी लहान लहान मुले डबीत भरून गुंजी साठवीत. आज ही झाडे पूर्णपणे दुर्मीळ झालेली असली तरीसुद्धा ती शोधून आणून माटोळीला बांधून माटोळीचे सौंदर्य वाढविलेले आहे. छोटी छोटी करड्या रंगाची गमफळे गुच्छाने बघताक्षणी पटकन तोंडात टाकावी असे वाटायला लावणारी खूप आकर्षक पण बोटाला चिकटताच त्यांच्यातूनच गमाची निर्मिती तिही नैसर्गिक. हा खजाना आज दुर्मीळ होताना दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर माटोळीच्या रूपात त्याची राखण होऊ शकते अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. दरवर्षी हे निसर्गधन धार्मिक कार्यासाठी, उत्सवांसाठी गरजेचे आहे म्हणून त्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. स्पर्धेसाठी, विधीसाठी म्हणून त्याला अक्षरश: ओरबाडून काढणे ही घातक प्रवृत्तीच असेल.

विविध औषधी वनस्पती, भाजी, फळेफुले हे सारेच रानवैभव, घर, घरासभोवतालचा परिसर तिथेच सहजपणे उपलब्ध असलेल्या या वैविध्यतेचा वापर त्यांनी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रूढी परंपरेत केला. निसर्गाचीच प्रतीकपूजा. रामसीतेचा संदर्भ येथेही लावलेला आहेच. कुमयाचे दोर एरव्ही इतर कामासाठी उपयोगी पडतात. पण धार्मिक कार्यात त्याला वर्ज्य मानले गेले आहे. ‘केवनीच्या दोराला जास्त महत्त्व. नैसर्गिक वैभवाचा वापर करताना त्यातील संवेदनशीलता सतत जागीच ठेवलेली आहे. हे संचित एकत्रित करताना झाडांना दुखणार नाही, वेलींना ओरखडा येणार नाही याची दक्षता घेतली जायची. पाहिजे तेवढेच घ्यायचे, त्याचाच पुरेपूर वापर करायचा, त्याच्यासाठी धार्मिक पौराणिक संदर्भ जोडले जाणे आणि त्याच्याशी निर्माण झालेले हृदयबंध कायम टिकवणे हेच आद्य कर्तव्य मानले गेलेे आहे. सीता आणि भूमी यांचे परस्पर नाते जुळवलेले आहे. सर्वसामान्य स्त्रीमनाला सहन कराव्या लागणार्‍या यातना दैवी पुरुषाची पत्नी असताना सीतेच्या वाट्याला याव्यात, हे दुर्दैव लोकमानसाला जाचते. त्याशिवाय सीता वनवासात असताना तिचा संबंध अनेक वृक्षवेलीशी आला. त्यामुळे सीतेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मग निसर्गातील पानपत्रीना सीतेच्या नावाने अजरामर केलेले आहे. त्यात सीतेचवर, सीतेची बोटे, सीतेची पावला आहेत. सीतेचवरच्या मुळाचा रस काढून काढा करून तो प्राशन केला तर मुतखड्यावरील इलाज होऊ शकतो असे सांगण्यात येऊ लागले. सीता वनवासात असताना तिच्या अधिवासाचे पुरावे म्हणूनही कदाचित या पत्रींची नावे ही सीतेवरून असावीत. पण त्याहीपेक्षा एक वेगळा संदर्भ, सीतेसंदर्भातील तळेवाडीसांगेला मिळाला. तिथे तर माटोळीला नर्कवाल (नरकवाल) बांधण्यात आली होती. सीतेला जेव्हा रावणाने पळवून लंकेला नेऊन ठेवली होती तेव्हा सीता रावणाच्या आमिषांना कशीच बळी पडत नव्हती. हे पाहून रावणाने म्हणे आपल्या बहिणीकडे नर्कवाल दिली. बहीण शूर्पणखेने अत्यंत उग्र वास येणार्‍या त्या वनस्पतीचा उपयोग करून सीतेला त्रास करायचा जेणेकरून सीता बदलेल. या नर्कवालीला खूप घाण, उग्र वास येतो. तिच्याजवळ उभे राहिल्यावरसुद्धा गरगरल्यासारखे वाटते. पण त्याचा काहीच परिणाम पतिव्रता सीतेवर झाला नाही. सीतेने त्यावर मात केली. या आनंदाप्रीत्यर्थ तिचा वापर माटोळीसाठी केला जात असावा असे मानायला हरकत नाही. सीतेला त्रास करण्यासाठी वापरलेली, उग्र दर्पाची म्हणून नर्कवाल!’

मानवी जीवन विकसीत झाले तेच शेतीमुळे. शेती केली आणि जमिनीतून अन्नधान्याची निर्मिती झाली. अन्न या भूमीची देणगी म्हणून मग तिची पूजा, तिच्यासाठी प्रार्थना! त्यासाठी समूहाने श्रम करणे ओघाने आलेच. या श्रमातूनच सोने पिकले. हे सारे वैभव ही भूमीच आपल्यासाठी देते मग तिचाच उत्सव आत्मीयतेने साजरा करायचा हे कृतज्ञतेचे भान इथे आहे. गणपती मातीचा, त्याच्या डोक्यावर बांधण्यात येणारी माटोळी पूर्णपणे नैसर्गिक, त्याच्या शेजारी होणारे गौरी पूजन हे नैसर्गिक पत्रीपानांचेच पूजन. गावागावांतील गणेश चतुर्थीच्या दिवसातील माटोळीचे अवलोकन केले तर त्या त्या गावातील समृद्ध जैविक संपत्तीचा वारसा सोबत घेऊनच ही चवथ मिरवताना दिसते. माटोळीच्या स्वरूपातील जैविक संपत्तीचा खजिना हे या भूमीचे वैभव आहे.