मांद्रे सरपंचांविरुद्धचा अविश्‍वास ठराव मंजूर

0
20

सरपंचपदी निवड झाल्यानंतर २४ तासांच्या आत अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागल्यानंतर मांद्रे पंचायतीचे सरपंच महेश कोनाडकर हे चर्चेत आले होते. काल या ठरावावरील चर्चेवेळी ७ विरुद्ध ४ मतांनी तो संमत होऊन महेश कोनाडकर यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आता नवा सरपंच मांद्रे पंचायतीचा कारभार हाताळणार आहे.

मांद्रे पंचायतीत सरपंच निवडीवरुन दोन गट पडले होते. दयानंद सोपटे यांचे समर्थक महेश कोनाडकर हे २२ ऑगस्टला झालेल्या सरपंच निवडीनंतर सरपंचपदी विराजमान झाले होते; मात्र त्यानंतर अवघ्या २४ तासांत आमदार जीत आरोलकर यांच्या गटाने त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर काल पंचायत कार्यालयात चर्चा झाली आणि सदर ठराव ७ विरुद्ध ४ मतांनी संमत होऊन जीत आरोलकर यांच्या गटाने बाजी मारली.

यावेळी प्रशांत नाईक, तारा हडफडकर, शेरॉन फर्नांडिस, रॉबर्ट फर्नांडिस, किरण सावंत, मिंगेल फर्नांडिस आणि अमित सावंत या पंच सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.