– डॉ. अजय वैद्य
गंधर्व नाटक मंडळीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्याआधी किर्लोस्कर मंडळीबद्दल थोडी माहिती करून घ्यावी लागेल. १८८० साली अण्णासाहेब किर्लोस्करांचे सं. ‘शाकुंतल’ हे नाटक आले आणि संगीत रंगभूमीचे सुवर्णयुग त्या दिवसापासून सुरू झाले.
अण्णासाहेबांचे स्वत:चे ‘सौभद्र’ आणि काकासाहेब खाडिलकरांचे ‘मानापमान’ या दोन नाटकांनी सर्व रसिकांना वेड लावले होते. किर्लोस्करांनंतर कंपनीची धुरा भाऊराव कोल्हटकरांच्या खांद्यावर येऊन पडली होती. गोविंदराव टेंबेंसारखा संगीत दिग्दर्शक, बालगंधर्व, गणपतराव बोडस, नानासाहेब जोगळेकर, भाऊराव कोल्हटकर यांसारखे कसलेले नट या कंपनीत होते. १३ फेब्रुवारी १९०१ रोजी भाऊरावांच्या निधनानंतर कंपनीची मालकी जबाबदारी नानासाहेब जोगळेकर व व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांनी सांभाळली. ‘मानापमान’ नाटकातील नानासाहेब जोगळेकर (धैर्यधर) व बालगंधर्व (भामिनी) यांच्या जोडीने अख्ख्या महाराष्ट्राला वेडे केले होते. परंतु दुर्दैवाने, मानापमान नाटकातील हा धैर्यधर अवघ्या आठ महिन्यांत म्हणजे १७ नोव्हेंबर १९११ रोजी अचानक सर्वांना दु:खात टाकून परलोकवासी झाला. नानासाहेबांचा अकाली मृत्यू म्हणजे किर्लोस्कर संगीत मंडळीवर झालेला एक दारुण आघात होता. त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीच्या मालकीचा वाद निर्माण झाला. कंपनीचे जुने जाणते व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांना कंपनीची मालकी हवी होती. पण त्यांचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला. शेवटी गोविंदराव टेंबे यांची सूचना मान्य होऊन १९११ च्या डिसेंबर महिन्यात कंपनीची मालकी बालगंधर्व, गणपतराव बोडस आणि शंकरराव मुजुमदार या तिघांकडे आली.
खाडिलकरांच्या विद्याहरण नाटकाच्या तालमी चालू असताना शंकररावांच्या एकतंत्री कारभारामुळे मंडळीला भाऊबंदकीचे वेध लागले होते. मुजुमदारांनी हेकेखोरपणे कंपनीचे स्वत:च्या मालकीचे थिएटर बांधण्याचा घाट घातला होता. ‘रंगभूमी’ नावाचे एक मासिकही सुरू केले होते. थिएटरचे बांधकाम सुरू झाले तेव्हापासून नटमंडळींचे पगार मिळेनासे झाले. सुरुवातीच्या पंचवीस हजार अंदाजपत्रकाचे प्रत्यक्षात पंचाहत्तर हजार रुपये थिएटरसाठी खर्च झाले हे नटमंडळींना शंकररावांनी कळविले नाही. कंपनीचे हिशेब तीन वर्षे सादर केले नाहीत. कंपनीला पस्तीस हजारांचे कर्ज झाले आहे ही गोष्टही लपवून ठेवली. यामुळे नटांच्या असंतोषाने उग्र स्वरूप धारण केले. त्याचे नेतृत्व गणपतराव बोडसांनी केले. १८ जून १९१३ रोजी बालगंधर्व आणि टेंबे यांनी कंपनी आमच्या स्वाधीन करून आपण निवृत्त व्हावे असा तोंडी खलिता शंकररावांना पाठविला. त्याला त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असे कळल्यानंतर बोडस त्यांच्याकडे ‘रंगभूमी’ मासिकाच्या कचेरीत गेले आणि १८ जुलै १९१३ पासून बालगंधर्व, टेंबे व आपण स्वत: कंपनी सोडणार आहोत अशी त्यांना रीतसर नोटीस दिली. बालगंधर्व किर्लोस्कर कंपनीतून बाहेर पडणार ही बातमी शाहू महाराजांना कळताच त्यांनी बालगंधर्वांना तार करून बोलावून घेतले. गंधर्वांबरोबर बोडसही गेले होते. परंतु या वाटाघाटी सफल झाल्या नाहीत.
नव्या कंपनीचे नाव काय ठेवायचे याचा विचारविनिमय सुरू झाला होता. प्रथम नूतन किर्लोस्कर मंडळी हे नाव सुचविण्यात आले. पण खाडिलकरांनी गंधर्व नाटक मंडळी असेच नाव ठेवा असे सांगितले आणि सर्वांनी ते मान्य केले. अशा रीतीने पुणे येथे ढमढेरे बोळात माळ्याच्या धर्मशाळेत ५ जुलै १९१३ रोजी गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेचा मुहूर्त झाला.
नाटक मंडळीची घडण
नव्या कंपनीला आर्थिक साहाय्याची गरज होती, पण त्या काळात बालगंधर्वांच्या नावाचा महिमा इतका होता की त्यासाठी त्यांना फार वणवण करावी लागली नाही. विनायक शिवराम ऊर्फ बाळासाहेब धारकर या पेणच्या जमीनदार सावकारांनी सात हजार रुपयांचे कर्ज एका रकमेत दिले. सात हजार रुपयांत पहिल्या नाटकाचा खर्च भरून येणे कठीण होते. म्हणून टेंब्यांनी उंची कपड्यांवरचा खर्च कमी करण्यासाठी आपल्या ओळखीने बडोद्याचे सरदार राजे वाघोजीराव शिर्के व त्यांच्या शिफारशीवरून देवासच्या महाराजांकडून जवळ–जवळ वीस–पंचवीस शालू तसेच महेश्वरी, बडोदी, चंदेरी अशी जरीकाठी, काही रेशमी, काही अत्यंत तलम लुगडी कंपनीला दिली. मुंबईच्या केसरबाई केरकर या प्रख्यात गायिकेच्या घरी राधाकृष्णाचे एक सुंदर चित्र होते. ते चित्र गंधर्व नाटक मंडळीच्या ड्रॉपवर असावे असा निर्णय घेऊन तो ड्रॉप रंगविण्याची कामगिरी रघुनाथ रामनाथकर पेंटर यांच्यावर सोपविण्यात आली. काही नवीन मुले कंपनीत घेण्यात आली. त्यांना तालमी देण्याची जबाबदारी बोडसांनी स्वीकारली. ३ सप्टेंबर १९२३ ला गंधर्व नाटक मंडळीचे पहिले नाटक सं. ‘मूकनायक’ याचा प्रयोग मुंबईतील प्रख्यात नागरिक सर भालचंद्र भाटवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या एलफिन्स्टन थिएटरमध्ये झाला.
गंधर्व नाटक मंडळीला समाजातील मान्यवर मंडळींचा पाठिंबा आहे हे सूचित करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली. त्यात न. चिं. केळकर, श्रीमंत आबासाहेब विंचूरकर, दत्तात्रेय लक्ष्मण वैद्य सॉलिसिटर, विनायकराव धारकर आणि कृष्णाजी पंडित यांचा समावेश होता. याच सुमारास सॉलिसिटर वैद्य यांनी बालगंधर्व, बोडस आणि टेंबे यांचे भागीपत्र तयार केले. यानुसार भागीची मुदत दहा वर्षांची राहील असे ठरले. तसेच कंपनीचा खर्च वजा जाता जी शिल्लक राहील, ती महिन्याच्या महिन्याला वाटून घ्यायची आणि नोकरांला उत्तेजन म्हणून दरवर्षी वाढदिवसानिमित्त त्यांना सहाशे रुपये द्यायचे ठरले.
त्यानंतर कंपनीने बडोदा, इंदूर, पुणे व नागपूरचा दौरा केला. या दौर्यात मानापमान, मृच्छकटिक, मूकनायक आणि विद्याहरण या नाटकांचे प्रयोग केले. १९१५ साली कंपनीने हैदराबाद, औरंगाबाद व पुन्हा बडोदा असा दौरा केला. याच दौर्यात मास्तर कृष्णाचा कंपनीत प्रवेश झाला.
कंपनीची नाटके
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी आपल्या जुन्या फाल्गुनराव या गद्य नाटकाला संगीताचा साज चढवून त्याचे संगीत संशयकल्लोळ केले ते गंधर्व संगीत मंडळीतील लोकांच्या आग्रहामुळेच. या नाटकाचा पहिला प्रयोग देवलांच्या पश्चात गंधर्व मंडळीने ३० ऑक्टोबर १९१६ रोजी केला. मानवी स्वभावात दडलेली संशयी वृत्ती यावर आधारलेले कथानक आणि देवलांची सुबोध व प्रासादिक वाक्यरचना यामुळे हेही नाटक फार लोकप्रिय झाले होते. अगदी घरगुती पण चटकदार भाषा, चपखल म्हणी, खटकेबाज संवाद, विनोदपूर्ण घटना, नाट्यपूर्ण प्रसंग व या सर्वाला साजेल असे आकर्षक संगीत अशा अनेक गुणांनी हे नाटक संगीत रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय झाले.
गंधर्व नाटक मंडळीने स्थापनेनंतर अनेक संगीत नाटके रंगभूमीवर आणली. परंतु कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तो खाडिलकरांच्या ‘सं. स्वयंवर’ या नाटकाने. हे नाटक कंपनीने १० डिसेंबर १९१६ ला रंगभूमीवर आणले. याची संगीत योजना कै. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी केली होती. बखले हे फार मोठ्या योग्यतेचे व चतुरस्र असे गायक होते. या नाटकातील पदांसाठी त्यांनी यमन, बिहाग, भूप, भीमपलास, बागेश्री, तिलककामोद, काफी, भैरवी अशा अगदी परिचयातील रागांच्या चाली निवडल्या व रंगभूमीवर रागदारी संगीत योग्य रीतीने कसे गावे याची विचारपूर्वक तालीम दिली. या परंपरेतून रंगभूमीवर जी एक गायकी रूढ झाली किंवा संगीताच्या भाषेत सांगायचे झाल्यास जे एक घराणे निर्माण झाले त्याला गंधर्व परंपरा अगर घराणे असे म्हणायला हरकत नाही. याच नाटकाने बालगंधर्वांना रुक्मिणीच्या भूमिकेत अजरामर करून ठेवले. ‘दादा ते आले ना’ हे त्यांचे वाक्य हे आजही रंगभूमीवर अभिनयाचा आदर्श म्हणून टिकून आहे.
गंधर्व कंपनीच्या कारकिर्दीतील तिसरे यशस्वी नाट्यपुष्प म्हणजे अत्यंत प्रतिभासंपन्न अशा राम गणेश गडकरींचे ‘सं. एकच प्याला’ हे नाटक. कंपनीने या नाटकाचा पहिला प्रयोग गडकरी मास्तरांच्या निधनानंतर २० फेब्रुवारी १९१९ रोजी केला. मद्यपानाच्या विषयावर इतके प्रभावी नाटक त्यावेळी केवळ मराठीच नव्हे तर जागतिक रंगभूमीवरसुद्धा आले नसावे. या नाटकात सिंधूच्या पदांना संगीत सुप्रसिद्ध ललित–गायिका सुंदराबाई जाधव यांनी दिले होते. स्वयंवर हे नाटक झाल्यानंतर गडकरी मास्तरांनी आपल्या कंपनीसाठी एखादे नवीन नाटक लिहावे असा आग्रह बालगंधर्वांनी धरला होता, तेव्हा मी नाटक लिहायचे तर तुम्हाला फाटक्या लुगड्यात यावे लागेल असे मास्तरांनी त्यांना सांगितले. बालगंधर्वांनी मास्तरांची ही अट बिनतक्रार मान्य केली आणि अजरामर ‘सिंधू’ मराठी रंगभूमीवर अवतरली.
कंपनीत फाटाफूट
१९१३ साली स्थापन झालेल्या गंधर्व नाटक मंडळीत १९१५ साली नागपूरच्या दौर्यात बालगंधर्वांशी वाद झाल्यामुळे फाटाफूट होऊन गोविंदराव टेंबे भागीदारीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:ची ‘शिवराज नाटक मंडळी’ स्थापन केली. स्थापनेनंतर देवलांचे संशयकल्लोळ (१९२६), खाडिलकरांचे मानापमान (१९१६) आणि गडकर्यांचे एकच प्याला (१९१९) ही असामान्य नाटके तिच्या रंगभूमीवर आली. बालगंधर्वांच्या सतत वाढणार्या उत्कर्षाचा आणि लोकप्रियतेचा हा काळ होता. ‘रेवती’, ‘रुक्मिणी’ आणि ‘सिंधू’ या त्यांच्या भूमिकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. १९१९ अखेर गणपतराव बोडसांनी कंपनी सोडल्यानंतर बालगंधर्व हे तिचे एकटे मालक राहिले.
१९२२ ते १९३४ या कालखंडात कंपनीने य. ना. टिपणीस यांचे ‘आशानिराशा’ (१९२३), वि. सि. गुर्जर यांचे ‘नंदकुमार’ (१९२६), खाडिलकरांची ‘मेनका’ (१९२६) व ‘सावित्री’ (१९३३), व. शां. देसाई यांचे ‘विधिलिखित’ (१९२८) व ‘अमृतसिद्धी’ (१९३३) आणि ना. वि. कुलकर्णी यांचे ‘कान्होपात्रा’ (१९३१) अशी नवीन नाटके बसविली. या नाटकांना बहुतेक संगीत मास्टर कृष्णराव यांनीच दिले आहे. १९२३ ते १९३३ पर्यंत गंधर्व नाटक मंडळीच्या रंगभूमीवर आलेल्या सात नाटकांतील पदांच्या चाली मास्तर कृष्णरावांनी दिल्या होत्या. ‘विधिलिखित’ व ‘कान्होपात्रा’ या नाटकांतील स्वत:च्या भूमिकेच्या पदांना पटवर्धनबुवांनी चाली दिलेल्या आहेत. ‘अमृतसिध्दी’ या नाटकात संगीत चांगले असूनही गंधर्व कंपनीच्या अखेरच्या पडत्या काळात ते नाटक सापडल्याने त्या संगीतास योग्य ती लोकप्रियता मिळाली नाही.
गंधर्व नाटक मंडळीचे नायक
गोविंदराव टेंबे हे गंधर्व कंपनीचे नायक होते. कंपनी स्थापन झाल्यानंतर दोन वर्षांतच म्हणजे १९१५ साली टेंबेनी कंपनी सोडली आणि स्वत:च्या शिवराज कंपनीची स्थापना केली. म्हणून नायकाची भूमिका करण्यासाठी भास्करबुवा बखल्यांचे शिष्य दत्तोपंत पेठकर यांना आणले. दुर्दैवाने फेब्रुवारी १९१९ मध्ये पेठकर हे अकाली मृत्यू पावले. मग त्या ठिकाणी पंढरपूरकर बुवा आले. ते पुण्याच्या पर्वती या देवस्थानचे गवई. गाणे बाळबोध वळणाचेच होते. तरीसुद्धा आवाजाच्या अनुकूलतेवर, मेहनतीवर व योग्य मार्गदर्शनामुळे त्यांनी यशस्वी गायक नट म्हणून नाम कमावले. ते १९२५ मध्ये वारले. यापुढील कालखंडातील नायकांमध्ये माधवराव वालावलकरांचा उल्लेख पहिल्यांदा केला पाहिजे. १९२१ च्या सुमारास ते ललितकलेतून या कंपनीत आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. धिप्पाड शरीर व चढा आवाजी हे त्यांचे वैशिष्ट्य होय. कोणतीही भूमिका करायला ते कधी नडले नाहीत व कसलेही पद गायला ते कधी अडले नाहीत. त्यांचा आवाज कधी बसला नाही की गाणे कधी पडले नाही हे जितके खरे तितकेच त्यांचे गाणे कधी विशेष रंगले नाही हेही तितकेच खरे. कंपनीला मिळालेले दुसरे चांगले गायक नट म्हणजे पं. विष्णू दिगंबरांचे शिष्य पं. विनायकबुवा पटवर्धन. १९२२ ते १९३२ या काळात ते कंपनीत होते. ‘शाकुंतल’पासून ‘संत कान्होपात्रा’पर्यंत कंपनी जी जी नाटके करीत होती त्यात नायकाची भूमिका त्यांनी यशस्वी केली. त्यांची गायकीची पद्धत शास्त्रशुद्ध होती. आवाज स्वच्छ व मोठा होता. आपल्या गायकीत त्यांनी नाट्यसंगीताच्या दृष्टीने हवा तसा बदल केला नाही त्यामुळे संगीत नट म्हणून त्यांचा हवा तसा लौकिक झाला नाही. गोमंतकीय गायक श्रीपादराव नेवरेकर हेही काही काळ गंधर्व मंडळीत होते. त्यांनी बहुतेक नाटकांत नायकाच्या भूमिका केल्या होत्या. कंपनीच्या उतरत्या काळात ते कंपनीचे मालकही झाले होते. परंतु त्यांनाही कंपनी टिकवता आली नाही.
गंधर्व नाटक मंडळीबद्दल लिहिताना नाटककार वसंत शांताराम देसाई यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. ‘विधिलिखित’ व ‘अमृतसिध्दी’ ही नाटके त्यांनी खास या कंपनीकरिता लिहिली. वसंत देसाई हे त्यावेळी न्यायाधीश होते. आपला न्यायाधीशाचा पेशा व त्यानिमित्ताने येणारी सर्व नियंत्रणे सांभाळून त्यांनी आपला बराच वेळ गंधर्व कंपनीच्या बिर्हाडी घालविला. त्यांचे अनेक नाटक मंडळींशी व त्यातील कलाकारांशी सख्य होते. म्हणून मखमलीचा पडदा, कलावंतांच्या सहवासात, कलेचे कटाक्ष, नट, नाटक व नाटककार, बालगंधर्व– व्यक्ती आणि कला, खाडिलकरांची नाट्यसृष्टी इत्यादी नाट्यविषयांशी संबंधित पुस्तके लिहिली. बालगंधर्वांच्या नाट्याचा लाभ पुढच्या पिढीला व्हावा म्हणून गंधर्वांचे परममित्र बाबूराव रुईकर यांच्याबरोबर त्यांनी आपल्या अमृतसिध्दी या नाटकाच्या कथानकावर आधारलेला मीराबाई हा बोलपट नाटकाच्या पद्धतीने काढला होता. यात बालगंधर्व, गंगाधरपंत लोंढे आदींच्या भूमिका होत्या. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो बोलपट प्रकाशित होऊ शकला नाही.
कंपनी कर्जबाजारी
गंधर्व नाटक मंडळीचे उत्पन्न १९२१ सालापासून दरमहा सुमारे पंधरा हजार रुपये होते. इतर नाटक मंडळींपेक्षा तिचे उत्पन्न जास्त असले तरी खर्चाचे प्रमाणसुद्धा जास्त होते. १९३१ साली उत्पन्न खालावले तरी इतरांपेक्षा ते अधिकच होते. रंगभूमीला शृंगारण्याची बालगंधर्वांची हौस जराही कमी न झाल्यामुळे त्यांना कर्ज झाले होते. वाढते कर्ज, वाढता खर्च आणि खालावत चाललेले उत्पन्न अशा परिस्थितीत ते सापडले होते. ना. वि. कुलकर्णी यांचे कान्होपात्रा हे नाटक बसत होते आणि त्यानंतर खाडिलकरांचे सावित्री नाटक बसवायचे होते. कान्होपात्रा नाटकातील कपड्यालत्त्यासाठी बालगंधर्वांनी अंदाजाबाहेर खर्च केला होता. पंढरपूरच्या देवालयासारखे हुबेहूब देऊळ रंगभूमीवर दिसले पाहिजे अशा कल्पनेने सुरू केलेल्या देखाव्याचे काम कधी पूर्ण होईल ते कोणालाच सांगता येत नव्हते. ही दोन्ही नाटके रंगभूमीवर आली तरी त्यांचा बालगंधर्वांच्या कर्जफेडीला उपयोग झाला नाही. तेव्हा खर्चात काटकसर व्हावी म्हणून माधवराव वालावलकर (प्रमुख पुरुष भूमिका) आणि कृष्णाप्पा भांडारकर (प्रमुख विनोदी भूमिका) या गंधर्व मंडळीतील जुन्या आणि लोकप्रिय नटांना बालगंधर्वांनी निरोप दिला. परंतु, त्यामुळे नाटकांचे प्रयोग विस्कळीत झाले. त्यातील रंगत बिघडली. त्यामुळे वालावलकर आणि भांडारकर यांना परत बोलवावे लागले.
नाट्यव्यवसाय करून कर्ज फिटणे शक्य नाही अशी बालगंधर्वांची खात्री होत चालली होती. अशा मन:स्थितीत ते असताना, बालगंधर्वांची भूमिका असलेला बोलपट काढला तर विपुल पैसा मिळेल असे प्रभात फिल्म कंपनीच्या मालकांना वाटू लागले होते. अखेर, प्रभातचे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पुढाकाराने बालगंधर्व–प्रभात या नावाने बोलपटांचा व्यवसाय करण्याचा करार बालगंधर्व आणि प्रभात फिल्म कंपनी यांच्यात झाला. बालगंधर्वांनी १९३४ अखेर गांधर्व नाटक मंडळी बंद करून बोलपटांच्या सृष्टीत प्रवेश केला. बालगंधर्व व व्ही. शांताराम ही दोन महान नावे एकत्र आल्यामुळे प्रभातचा पहिला धर्मात्मा (डिसेंबर १९३५) हा बोलपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जमली. पण बालगंधर्वांची पुरुष भूमिका प्रेक्षकांना रुचली नाही.
कंपनी बंद पडली
१९१३ साली सुरू झालेली ही कंपनी १९३४ अखेर बंद पडली. पुन्हा १९३५ ला ती सुरू झाली. गंगाधरपंत लोंढे आणि गंधर्व मंडळीतील इतर प्रमुख नट यांनी ‘धर्मात्मा’ प्रकाशित होण्यापूर्वी गंधर्व मंडळीचे एप्रिल १९३५ मध्ये पुनरुज्जीवन करून बालगंधर्वांशिवाय प्रयोग सुरू केले होते. १९३६ च्या मे महिन्यात बालगंधर्व–प्रभात या संस्थेचे विसर्जन करून बालगंधर्व पुन्हा गंधर्व मंडळीच्या नाटकात त्यांच्या गाजलेल्या स्त्री भूमिका करू लागले. कंपनी काही काळ चालली व पुन्हा बंद पडली. असे प्रकार वरचेवर झाले असले तरी या कंपनीची खरी कारकीर्द १९३४ अखेरपर्यंतचीच होय. रंगभूमीच्या पहिल्या ३०–३२ वर्षांच्या काळात वैभव, प्रसिद्धी व लोकप्रियता या बाबतीत किर्लोस्कर कंपनी जशी आघाडीवर होती, तोच मान पुढील २०–२२ वर्षांत गंधर्व मंडळीकडे आला होता.
‘मी पाहिलेली मराठी नाट्यसृष्टी’ या पुस्तकात डॉ. द. रा. गोमकाळे यांनी १९२७–२८ च्या सुमारास गंधर्व नाटक मंडळीबद्दल वर्हाडात काय आकर्षण वाटत होते याचे वर्णन केले आहे ते पुढीलप्रमाणे :
‘‘पण गंधर्व कंपनी अमरावतीस येणार आहे असे नुसते कळले आणि गंधर्वांच्या नावाशी जोडलेल्या अनेक नवलकथांची संगती जुळू लागली. अमरावती, नागपूरच नव्हे तर मध्य प्रदेशचे त्यावेळचे सर्व मराठी जिल्हे जणू एकच जिल्हा झाला. नागपूर अमरावतीतील शंभर मैलांचे अंतर नष्ट झाले. कुंभमेळ्यासारखी गर्दी नाटकाच्या दिवशी अमरावतीला होऊ लागली. नागपूर व अवांतर ठिकाणांहून लहान मोटारगाड्या, बसेस यांची एकच रीघ लागली होती. सर्वांची तोंडे अमरावतीच्या दिशेने. सर्वांचा धावा बालगंधर्वांचे धाकटे बंधू मॅनेजर बापूराव राजहंसांकडे. नाटक हाऊसफुल्ल. एकही तिकीट शिल्लक नाही हे पाहून कित्येक मैलांहून गंधर्व नाटक मंडळीचे नाटक पाहायला आलेला, अगदी अगतिक झालेला हा नाट्यरसिक लाचारीने बापूरावांसमोर उभा आहे, ही सारी दृश्ये काल पाहिल्यासारखी वाटतात. वास्तविक या वेळेस कंपनी कर्जबाजारी झाली होती. तिच्या ऐश्वर्याला व बालगंधर्वांच्या वैभवालाही उतरती कळा लागली होती. अशा पडत्या काळातही कंपनीचे इतके आकर्षण वाटत होते. याला एकमेव कारण म्हणजे बालगंधर्वांचे कंपनीतील अस्तित्व.’’
बालगंधर्वांचे अस्तित्व हे कंपनीच्या उत्कर्षाला जसे कारणीभूत ठरले तसेच ते तिच्या अस्तालाही कारणीभूत झाले. अंगी बाळगलेले शौक, कुणाचेही न ऐकण्याचा स्वभाव, नाटकांवर केलेला अनाठायी व टाळण्याजोगा खर्च, सहकारी नट व हितचिंतकांच्या वेळोवेळीच्या सल्ल्यांकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष अशा अनेक स्वभावदोषांमुळे मराठी संगीत रंगभूमीला वैभवशिखरावर नेणारी, रंगभूमीला ललामभूत ठरलेली, अनेक कलाकारांचे आयुष्य घडविणारी ही गंधर्व नाटक मंडळी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत बंद पडली हे रंगभूमीचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
(संदर्भ ः ‘तो एक राजहंस’- बाळ सामंत, माझी भूमिका– गणपतराव बोडस, गंधर्वगाथा– भा. द. खेर, विश्रब्ध शारदा– ह. वि. मोटे, मराठी संगीताने गाजलेली रंगभूमी– बाबुराव जोशी.)