मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा आज उघडणार

0
9

>> ३ दिवस सिनेरसिकांना दर्जेदार २२ चित्रपटांची मेजवानी; अशोक सराफ यांचा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान

तीन दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा आज (शुक्रवारी) उघडणार असून, पणजीतील आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी ५.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत होणार्‍या या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान होणार आहे.

या तीन दिवसीय महोत्सवाला मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते व अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत. त्यात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, उमेश कामत, मृण्मयी गोडबोले, नेहा पेंडसे, मृणाला कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, राहुल देशपांडे, रवी जाधव, मोहन आगाशे यांचा समावेश आहे.
कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेला गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा ५ ते ७ ऑगस्ट या दरम्यान होणार असून, या महोत्सवात एकापेक्षा एक असे सरस व अप्रतिम असे एकूण २२ चित्रपट पाहण्याची संधी चित्रपटशौकिनांना मिळणार आहे. या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी सायंकाळी मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ या चित्रपटाने होणार आहे.

या महोत्सवात गोदाकाठ, मी वसंतराव, चंद्रमुखी, ताठ कणा, मोहरा, झोंबिवली, तिचं शहर होणं, टाईमपास-३, येरे येरे पावसा या चित्रपटांबरोबरच गोष्ट एका पैठणीची, दीड, जून, क्रिप्टो आजी, कडू गोड, तमाशा लायव्ह, पॉंडिचेरी, सुमित्रा भावे – एक समांतर प्रवास हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. या मराठी चित्रपटांबरोबरच ‘वागरो’ हा कोकणी लघुपट पाहण्याची संधी सिनेप्रेमींना मिळणार आहे.