- डॉ. मनाली महेश पवार
सध्या भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यता वाढली आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करून लोकांना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास प्रेरित करणे आवश्यक आहे. मधुमेहाचे भारतातील वाढते प्रमाण हे वैद्यकीयशास्त्राच्या दृष्टीने एक मोठे आव्हान ठरले आहे. हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास प्रत्येक पाचवा भारतीय हा मधुमेही असेल.
14 नोव्हेंबर रोजी सर फ्रेडरिक बँटिंग यांच्या जन्मतारखेला ‘जागतिक मधुमेह दिन’ साजरा केला जातो. चार्ल्स हर्बर्टसह सर फ्रेडरिक बँटिंग यांनी ‘इन्सुलिन’ या हार्मोनचा शोध लावला. या दिवसापासून दरवर्षी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जाऊ लागला. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले हे दिवस जनजागृतीसाठी नेहमीच साजरे करणे आवश्यक आहे.
सध्या भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यताही वाढली आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करून लोकांना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास प्रेरित करणे आवश्यक आहे. या आजाराचा शोध ‘यूएन’ने 1991 मध्ये लावला होता. याच दिवशी सर फ्रेडरिक बँटिंग यांनी चार्ल्स हर्बर्टसह इन्सुलिनचा शोध लावला. या दिवसापासून दरवर्षी जागतिक पातळीवर मधुमेह दिन साजरा केला जाऊ लागला. या वर्षीच्या जागतिक मधुमेह दिनाची थीम ‘मधुमेहाच्या काळजीसाठी प्रवेश- आता नाही तर कधी?’ अशी आहे. याचा अर्थ मधुमेहाच्या रुग्णांवर शक्य तितके लक्ष दिले पाहिजे. लक्ष देऊन मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येते. या रोगाची लक्षणे तुम्ही व्यवस्थापित करू शकता आणि त्यास वाढण्यापासून रोखू शकता.
मधुमेहाचे भारतातील वाढते प्रमाण हे वैद्यकीयशास्त्राच्या दृष्टीने एक मोठे आव्हान ठरले आहे. हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास प्रत्येक पाचवा भारतीय हा मधुमेही असेल.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह हा इंद्रियातील किंवा चयापचयातील बिघाडामुळे निर्माण होणारा रोग आहे. स्वादुपिंड या ग्रंथीच्या कामातील बिघाडामुळे हा रोग होतो. स्वादुपिंडातील ‘आयलेट्स ऑफ लॅगरहॅन्स वीटा’ पेशींमधून ‘इन्सुलिन’ नामक संप्रेरक (हार्मोन) शरीरात स्रवत असते. हे इन्सुलिन साखरेचे योग्य प्रमाणात चयापचय होण्यास कारणीभूत ठरते. वीटा पेशींना काही इजा झाल्यास इन्सुलिनच्या स्रवणातही बदल होतात. कधी इन्सुलिन तयारच होत नाही किंवा कधी कमी-अधिक प्रमाणात तयार होते, तर कधी पेशींमध्ये असलेल्या अतिरिक्त मेदामुळे किंवा इतर कारणांमुळे इन्सुलिनचा परिणामच होत नाही. या सर्वाचा परिणाम म्हणजे रक्तातील साखर वाढणे.
शरीराला साखरेची (ग्लुकोजची) शक्ती म्हणून आवश्यकता असते. खाल्लेल्या अन्नाचे विघटन व अन्नपचन नीट झाले व स्वादुपिंडाचे काम व्यवस्थित चालले तरच शरीरात साखरेचे शोषण होते; अन्यथा न पचलेली साखर रक्तात साठत जाते किंवा लघवीतून बाहेर जाऊ लागते. रक्तात साठलेल्या साखरेची परस्पर विल्हेवाट लावल्याने हलके-हलके साखर पचविण्याचे काम शरीर विसरून जाते व स्वादुपिंड अधिकच आळशी बनते.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ज्यामध्ये अधिक मात्रेने बऱ्याच वेळा मूत्रप्रवृत्ती होते, तो रोग प्रमेह म्हणजेच मधुमेह. हा त्रिदोषप्रकोपात रोग उद्भवत असला तरी हा कफप्राधान्यता होणारा आजार आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये दोषभेदाने या रोगाचे एकूण 20 प्रकार आहेत.
आधुनिक शास्त्राप्रमाणे मधुमेहाचे टाईप-1 मधुमेह व टाईप- 2 मधुमेह असे प्रकार आहेत.
टाईप- 1 मधुमेहामध्ये वीटा पेशीच नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनच तयार होत नाही.
टाईप- 2 मधुमेहामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे इन्सुलिन जास्त प्रमाणात वाहते, परंतु साखर मात्र कमी होत नाही.
मधुमेहाची कारणे
खरे पाहता ही एक कुलज व्याधी आहे. प्रमेही माता-पिता यांच्याकडून आलेल्या बीजदोषांमुळे प्रमेहाची उत्पत्ती होते.
- नेहमी आरामात बसून राहणे.
- अतिप्रमाणात झोप घेणे.
- बैठे काम करणे.
- शीत-स्निग्ध, मधुर, मेद्य, द्रव अशा प्रकारच्या अन्नाचे सेवन करणे. विशेषतः दही, ग्राम्य, आनूप, नवे धान्य, नवीन पाणी, गूळ आणि त्यापासून बनविलेले पदार्थ.
- बदलती जीवनशैली, सुस्तपणा, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहारपद्धती या कारणांमुळे मधुमेही वाढत आहेत.
- लहान मुलांमध्येसुद्धा याचे प्रमाण फास्टफूड संस्कृती, मोबाईलचा अतिवापर, चॉकलेट, आईस्क्रीम यांचे जास्त सेवन आदी कारणांमुळे वाढत चालले आहे.
- काही जनुकीय समस्या, औषधांचा दुष्परिणाम, शस्त्रक्रिया, जंतुसंसर्ग, कुपोषण यांमुळेसुद्धा मधुमेह होऊ शकतो.
मधुमेहाची लक्षणे
मूत्राची अधिकता आणि अविलता ही मधुमेहाची सामान्य लक्षणे आहेत.
- जास्त भूक लागणे.
- अचानक वजन कमी होणे.
- हाता-पायांना मुंग्या येणे.
- थकवा, कमकुवतपणा येणे.
- त्वचा रुक्ष होणे.
- जखमा भरण्यास वेळ लागणे.
- जास्त तहान लागणे.
प्रतिबंधात्मक उपाय
- ब्लड शुकर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांची आणि लाईफ स्टाईलमध्ये बदल करण्याची गरज असते. मधुमेहीनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करायला हवे. कारण यातील पदार्थ हळूहळू रक्तात शुगर रिलीज करतात.
- आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सातू, वरी, नाचणी, मूग, कुळीथ, हरबरा, जुने तांदूळ, कारली, दोडकी, दुधी भोपळा यांसारख्या भाज्या असे पथ्यकर पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहे.
- तांदूळ, गहूसारखी धान्ये भाजून नंतर वापरल्यास पचायला हलकी बनतात.
- दूध, मिठाई, पक्वान्ने यांच्याबरोबर साखर शिजवल्यानंतर पचायला कठीण होते; परंतु चहा, सरबत, शिरा यांत मिश्रण रूपात असलेली साखर पचायला त्यामानाने हलकी व गुणाने थंड असते.
- काही विशिष्ट विकृत अवस्थेतील रोगी सोडले तर मधुमेहीच्या आहारात थोडीशी साखर नेहमीच असावी. मात्र साखरेचे अतिसेवन करू नये.
- वारंवार, वेळी-अवेळी खाल्ल्याने स्वादुपिंडावर ताण पडतो व हलके-हलके ते काम करेनासे होते. योग्य अंतराने व नियमित आहार ठेवणे मधुमेहीसाठी आवश्यक असते.
- लघवीतून साखर जाऊ लागली की मूत्रपिंडावर ताण वाढतो म्हणून मधुमेहींनी फ्लॉवर, कोबी, राजमा, छोले, चवळी, चीज इत्यादी गोष्टी खाऊ नयेत.
- फळांपैकी चिकू, अननस, सीताफळ, रामफळ, फणस व आंबा कधीच खाऊ नये. इतर फळे अधूनमधून अत्यल्प प्रमाणात कधीतरी खाता येतात.
- पक्वान्नांपैकी खवा, चण्याचे पीठ वापरून केलेली पक्वान्ने, श्रीखंड कधीच खाऊ नये.
- दूध, रव्याची खीर, रव्याचा शिरा, मुगाचे लाडू असे पदार्थ अल्प प्रमाणात खाता येतात.
- योग्य प्रमाणात भात, बटाटे, साजूक तूप, ताजे दूध घेता येते. या पदार्थांनी मधुमेह वाढत नाही.
- अंडे कधीच खाऊ नये.
- कोणत्याही प्रकारचे मद्य (अल्कोहोल) मधुमेहीसाठी पूर्णतः वर्ज्य आहे.
- कारल्याचा रस, मेथीचे किंवा तत्सम कडू द्रव्याचे चूर्ण यांचे सेवन अतिप्रमाणात आणि बराच काळपर्यंत करू नये.
- मानसिक ताणामुळे कमी झालेले साखरेचे प्रमाण वाढून चित्र उलटू शकते. तेव्हा घरातील आप्तजनांबरोबर होणारे वाद-विवाद टाळून मनस्ताप कमी करावा. स्वतःची ताकद ओळखूनच जबाबदारीची कामे स्वीकारावीत.
- रोज 25 ते 30 मिनिटे चालण्याने खूप मोठा फायदा होतो.
- शरीराच्या ताकदीनुसार योगासने करावीत.
- प्रमाणित व योग्य आहार तसेच आहारातील नियमितता या गोष्टी मधुमेहामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात.