मद्यप्राशनासह वाहन चालवण्यावर बंदीचा विचार

0
8

>> मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
>> कायद्यात आवश्यक दुरुस्ती करणार
>> राज्यातील रात्रीच्या वेळेतील ९५ टक्के अपघात मद्यपानामुळेच

गोव्यात रात्रीच्या वेळी होणार्‍या अपघातांपैकी ९५ टक्के अपघात हे मद्यपान करून वाहन चालवल्यामुळेच होत असतात. त्यामुळे मद्य सेवन केल्यानंतर वाहन चालवण्यावर बंदी आणण्यासाठी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मद्य प्राशन करून वाहने चालवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.

झुआरी नदीत कार कोसळून बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात चौघांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’च्या मुद्यावर भाष्य करत मुख्यमंत्र्यांनी कायदा दुरुस्तीबाबत भाष्य केले. राज्यात वाढू लागलेल्या रस्ता अपघातांविषयी चिंता व्यक्त करून मद्य प्राशन केल्यानंतर वाहन चालवण्यावर बंदी घालणारा कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मद्य सेवन करून वाहने चालवणार्‍यांना सध्या दंड ठोठावण्यात येत असला तरी दंडाची रक्कम ही अगदीच कमी आहे. त्यामुळे केवळ दंड ठोठावून भागणार नाही, तर सदर मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई व्हायला हवी. वेळप्रसंगी त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा निलंबित करायला हवा, असे आपले मत असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी देखील झुआरी अपघाताबाबत भाष्य केले. पुलांवर भरधाव वाहने हाकण्यास निर्बंध असून, ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्ते वेगाने वाहने हाकण्यास बंदी आहे. मात्र तरी देखील वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेफामपणे वाहने हाकली जातात. झुआरी येथील अपघात सुद्धा भरधाव वेगामुळेच झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे, असे काब्राल म्हणाले.

महामार्गावर सीसीटीव्ही बसवणार : गुदिन्हो

रात्रीच्या वेळी रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ नसल्याने अनेकजण अतिवेगाने वाहने चालवतात आणि त्यातूनच भीषण अपघाताच्या घटना घडतात. रात्रीच्या वेळीस वाहतूक पोलीस नसल्याने बेदरकारपणे वाहने चालवली जातात. त्यामुळे लवकरच राज्यातील महामार्ग व महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्याद्वारे वाहतूक नियम तोडणारे वाहनचालक कॅमेर्‍यात कैद होतील आणि त्यांना दंडाची पावती थेट घरी पाठवली जाईल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

स्वयंचलित देखरेख यंत्रणा उभारणार : काब्राल

राज्य सरकार गोव्यातील रस्त्यावर अतिवेग यासारख्या वाहतूक नियम उल्लंघनाला आळा घालण्यासाठी ‘स्वयंचलित देखरेख यंत्रणा’ उभारण्यावर काम करत आहे. ‘बीओओटी’ तत्त्वावर खासगी संस्थेच्या सहभागाने यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. मोठ्या पुलांवर येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असेही ते म्हणाले.

झुआरी पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काब्राल यांनी ही माहिती दिली. राज्यातील रस्तेच नव्हे, तर पुलांवर सुध्दा भरधाव वेगाने वाहने हाकली जातात. मांडवी नदीवरील नवीन अटल सेतू पुलावर सुध्दा भरधाव वाहन चालविण्यात येत आहेत. अटल सेतू पुलावर काही दिवसांपूर्वी भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात एका युवकाचा बळी गेला होता, ही बाब देखील काब्राल यांनी निदर्शनास आणून दिली.

राज्यातील पुलावर ओव्हरटेक करण्यास बंदी आहे. तसेच वाहनांची वेगमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे, तरीही भरधाव वेगाने वाहने चालविण्यात येतात. राज्यातील पूल आणि रस्त्यावरील भरधाव वाहन वाहतूक रोखण्यासाठी स्वयंचलित देखरेख यंत्रणा आवश्यक आहे. त्या यंत्रणेच्या माध्यमातून वाहनमालकाला वाहतूक नियमभंग प्रकरणी चलन पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.

बोरी पुलाच्या दुरुस्तीसाठी पूल बंद ठेवण्याची गरज आहे; मात्र सद्यस्थितीत पूल बंद ठेवला जाऊ शकत नाही. या पुलावर लक्ष ठेवले जात आहे. झुआरी नदीवरील नवीन पूल सुरू झाल्यानंतर बोरी पुलावरील वाहतूक मर्यादित करून त्याची दुरुस्ती केली जाऊ शकते, असेही काब्राल यांनी सांगितले.

खराब रस्त्यांमुळेच अपघात वाढले

>> विरोधी पक्षांची राज्य सरकारवर टीका

>> मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानालाही आक्षेप

रात्रीच्या वेळी घडणारे ९५ टक्के अपघात हे मद्यपान करून वाहन चालवण्यात येत असल्याने घडत असल्याचे जे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे, त्याला आक्षेप घेत राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर काल जोरदार टीका केली. खराब रस्त्यांमुळेच राज्यात अपघात वाढल्याचा आरोप कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डने काल केला.

याविषयी प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, राज्यातील बहुतांश रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. राज्यातील रस्ते व जुने पूल यांचे सरकारने ऑडिट केले पाहिजे. राज्यातील जुन्या पुलांचे कठडे कमकुवत बनले असून, सर्व पुलांची सार्वजनिक बांधकाम खात्याने तपासणी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाने देखील मुख्यमंत्र्यांनी जो दावा केला होता, तो खोडून काढला. असे दावे करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी व रस्त्यांवरील न पेटणार्‍या पथदीपांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली.

कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या वेळी होणार्‍या रस्ता अपघातांसाठी वाहनचालकांना जबाबदार न धरता राज्यातील चाळण झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच रस्त्यांवर पथदीपांची सोय करावी. मुख्यमंत्र्यांनी अपघातांबाबत जो दावा केला आहे, तो योग्य नाही. अपघातांसाठी केवळ वाहनचालकांनाच जबाबदार धरणे चुकीचे आहे. वर्षभरापूर्वी रात्रीच्या वेळी एका मुलीवर बलात्काराची घटना घडली होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित मुलीलाच जबाबदार धरले होते, याची आठवण चोडणकर यांनी करून दिली. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे स्वत:वरील जबाबदारी झटकू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.