भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रो-चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मंगळ मोहीमेची तयारी पूर्ण झाली असून अवकाश यान ५ रोजी दुपारी २.३६ वा. अंतराळात झेपावणार आहे. त्यासाठीची उलटी मोजणी आज रविवारी पहाटे ६.०८ मि. पासून सुरू झाली आहे.
रु. ४५० कोटी या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आले आहेत. मंगळावर पाठविण्यात येणारा हा उपग्रह पीएसएलव्ही-एक्सएलद्वारे झेपावेल. तो १३३७ किलो वजनाचा आहे. अवकाश उड्डाणाची रंगीत तालीम गुरुवारी यशस्वीरित्या झाली.
हा उपग्रह अवकाशात झेपावल्यावर १ डिसेंबर रोजी दुपारी १२.४२ वा. पृथ्वीच्या कक्षेबाहेर सूर्यकेंद्रित कक्षेत प्रवेश करेल. तेथे तो ३०० दिवस राहील व त्यानंतर २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल.
दरम्यान या उपग्रहातून पाठविलेल्या अवकाश तबकडीत अनेक उच्च तंत्रज्ञानाची उपकरणे बसविण्यात आली आहेत.