Home बातम्या भ्रष्टाचार आणि महागाई

भ्रष्टाचार आणि महागाई

0

डॉ. राजीव कामत, खोर्लीम्हापसा.

आजकाल आपण सर्वत्र भ्रष्टाचार आणि महागाई या विषयांवर तावातावाने बोलले जाते. लोकपाल विधेयकावरून अण्णा हजारे यांनी उपोषण करून सरकारला लोकांच्या इच्छेपुढे गुडघे टेकायला लावून इतिहास घडवला. या संग्रामात अण्णा हजारेंबरोबर पुष्कळ लोक एकजुटीने वावरले व भ्रष्टाचार विरोधी विधेयक लोकसभेत आणण्यासाठी सरकारला भाग पाडले. या लोकपाल विधेयकाच्या कक्षेतून प्रधानमंत्री, इतर मंत्री व खासदारांना वगळण्याच्या तरतुदीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. पण हे सर्व करताना पुष्कळ महत्वाच्या गोष्टी नजरेआड केल्या गेल्या आणि उद्या हे विधेयक संमत झाल्यावरसुद्धा भ्रष्टाचारापासून आपणाला मुक्ती मिळेल काय, याची शाश्‍वती कोणी देऊ शकेल काय?

येशू ख्रिस्ताने एकदा एका पापी महिलेला जेव्हा लोकांनी दगड मारण्याची शिक्षा दिली, तेव्हा ज्याने आयुष्यात कधीही व काहीच पाप केले नाही, त्या व्यक्तीने पहिला दगड महिलेवर मारावा अशी विनंती केली. तेव्हा त्या महिलेला एकही दगड न मारता सारा जमाव तेथून पांगला. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, सध्या चाललेला भ्रष्टाचारविरोधी लढा.

यात भाग घेणार्‍या लोकांवर नजर फिरवली तर, यातील जवळजवळ सर्वचजण काही ना काही प्रमाणात भ्रष्टाचाराचा भाग बनलेले आहेत. तेव्हा अशी आंदोलने उभारताना या गोष्टींचा परखडपणे जरूर विचार व्हावा. अन्यथा, एकमेकांवर या गोष्टीवरून चिखलफेक होण्याचीच शक्यता जास्त असते. त्या गोष्टीची चुणूक आम्ही अण्णांच्या आंदोलनातून अनुभवली आहे. ज्याप्रमाणे गोष्टी घडत आहेत, ते पाहून नजीकच्या काळात हे अंदोलन अनियंत्रितपणे भरकटण्याचीच शक्यता जास्त वाटते.

वास्तविक, जेव्हा आपण भ्रष्टाचाराबाबत बोलतो, तेव्हा आपणच या सर्व गोष्टींना कळत नकळत जबाबदार असतो, याची कोणाला जाणीव आहे का? अगदी लहानपणापासून आपण आपल्या बाळाला एखादी गोष्ट करण्यासाठी राजी करताना एखाद्या बक्षिसाचे प्रलोभन त्याला दाखवतो. वास्तविक जी गोष्ट करायची असते, ती त्या बाळाच्या फायद्याचीच असते. तरीपण ती गोष्ट करण्यासाठी देण्यात येणार्‍या बक्षिसामुळे त्या बाळाची अशी धारणा होते की, ती गोष्ट जी तो करतो, ती केवळ त्या बक्षिसाच्या प्रलोभनामुळे. तेव्हा आपणच भ्रष्टाचाराची बीजे आपल्या मुलांच्या आयुष्यात नकळत अगदी बालपणापासूनच रोवू लागतो.

पुढे मोठे झाल्यावर जेव्हा ही बक्षिसाची सवंय भ्रष्टाचाररूपी राक्षसाच्या रूपात थैमान घालते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही.

काही काळापूर्वी गोव्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत एक किस्सा मोठ्या कौतुकाने चघळला जात असे. तो असा की, एक राजकारणी म्हणे, लोकांची कामे करण्यासाठी (नोकरी वा अन्य तत्सम) काही रक्कमेची मागणी करायचा. त्याला ती रक्कम देऊनसुद्धा जर ते काम होऊ शकले नाही, तर त्या माणसाने दिलेली सर्व रक्कम त्याला परत मिळत असे. यात कोणतीही टोलवाटोलवी नसायची. लोक कौतुकाने त्याला ऑॅनेस्ट करप्शनअसे म्हणायचे. पण भ्रष्टाचार कुठल्याही स्वरूपात, अगदी नगण्य रकमेच्या स्वरूपात असला तरी, तो शेवटी भ्रष्टाचारच!

आजकाल विविध कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना, विविध औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना, अशिलाकडून वकिलांना दिल्या जाणार्‍या छोट्यामोठ्या भेटवस्तू यासुद्धा भ्रष्टाचार या प्रकारातच मोडतात. आणि अशा गोष्टींवर पूर्णतः बंदी आणणे ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे. तेव्हा भ्रष्टाचाराचा जर समूळ नाश करायचा असेल, तर कुठलेही विधेयक ते करू शकणार नाही. लाच देणार्‍याने व लाच घेणार्‍याने जर स्वतःवर निर्बंध घातले तरच ही गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकेल.

आजकाल दुसरी चघळली जाणारी समस्या म्हणजे महागाई. हा महागाईचा राक्षस आज सर्व जगभरच पसरलेला आहे. आणखी काही वर्षांत तो सर्व जगच गिळंकृत करेल यात शंकाच नाही. पण आपण भारतापुरतेच बोलायचे झाल्यास महागाई हा शब्द केवळ थट्टाच करण्यासाठी वापरला जातो काय इतपत शंका यावी.

पेट्रोल व इतर तत्सम पदार्थांचे दर, व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर आज गगनाला भिडले असतानाही परवाच जाहीर झालेल्या तक्त्यानुसार या पदार्थांचे भारतातील दर हे जगात सर्वाधिक असून केवळ सरकारी करांमुळेच तशी परिस्थिती उद्भवली आहे, हे दिसून येते. तेव्हा हे सरकारी कर नियंत्रित करायचा विचार नको का करायला? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे अन्य सर्व वस्तूंची दरवाढ अटळ असते, ही साधी गोष्ट सरकारच्या ध्यानात येत नाही काय? त्यात विविध सरकारी खाती, जी या महागाई निर्देशांक विषयक आकडेवारी जाहीर करतात, ती वाचल्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही. ही आकडेवारी म्हणजे केवळ लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचेच काम करते.

परवाच ज्यांना दारिद्रय रेषेखाली असण्याचा निकष ठरवण्यासाठी प्रतिदिन उत्पन्नाची मर्यादा रूपये ३२ इतकी ठेवण्यात आली, ती कोणत्या निकषावर अधारित होती याचा खुलासा होणे आवश्यक आहे. कदाचित ही मर्यादा ठरवताना खासदारांना लोकसभेच्या उपहारगृहात ज्या दरात पदार्थ उपलब्ध होतात, त्या निकषावर आधारित असावी. हल्लीच वाचनात आल्याप्रमाणे या कॅन्टीनमध्ये आमच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधींसाठी वेगवेगळ्या पदार्थांचे जे दर लावण्यात आले आहेत ते एखाद्या गावातल्या छोट्या गाड्यावरील पदार्थांना पण लाजवणारे आहेत. उदाहरणार्थः चहा १ रू., बटाटावडा १ रू., चिकन बिर्याणी १५ रू., इत्यादी. तेव्हा ही महागाई म्हणजे नेमके काय असते हे आमच्या खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींना कसे समजणार?

पण एकीकडे महागाईविरूद्ध ओरड चालू असताना सध्या प्रत्यक्ष जीवनात मात्र एकदम विरोधी टोकाचेच चित्र दिसते. आजकाल हॉटेलात खाणे इतके महाग झाले असताना पण तिथे कायमच गर्दी असते. म्हापसा आणि पणजी या दोन शहरांमधल्या उपहारगृहांतील खाद्यपदार्थांचे दर बघितले तर, पणजीतील दर म्हापशापेक्षा दीड ते दोन पटीने जास्त आहेत. इतके असूनही खुद्द म्हापशेकरांची जास्त गर्दी पणजीतील हॉटेलमधून दिसते. बाजारात मासळी आणि भाज्यांचे दर तर, गगनाला भिडलेले आहेत. तरीही दैनंदिन गरजेच्या वस्तू सोडून अन्य अनावश्यक गोष्टी खरीदण्यास लोक मागेपुढे पहात नाहीत. तेव्हा ही महागाई म्हणजे नेमकी कोणासाठी? असाच प्रश्‍न पडतो.

आता प्रश्‍न राहतो तो महागाई रोखण्याचा. ही समस्या सोडवण्यासाठी आधी ग्राहकांनी एकजुट दाखवली पाहिजे. ज्या ज्या गरजेच्या वस्तूची किंमत भरमसाट वाढली आहे, ज्यात भाज्या, फळे, मासळी, मटण वगैरे येतं व या सर्व वस्तू नाशिवंत आहेत, त्या वापरताना ग्राहकांनी थोडी कळ सोसून विक्रेत्यांना त्यांची योग्य जागा त्यांना दाखवली तरच हा महागाईचा राक्षस थोड्याफार प्रमाणात काबूत येईल.

दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे, लोकप्रतिनिधींचे पगार वाढवून त्यांचे सर्व व्यवहार त्यांना त्यांच्या वेतनातूनच करायला लावले पाहिजेत. त्यामुळे त्यांना आता जे पेट्रोल, गाड्या, वीज, पाणी यांचा अनिर्बंध वापर करायला मिळतो, त्याची किंमत त्यांना कळून ते महागाई रोखण्यास पुढाकार घेतील.

शेवटी थोडे अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्यासंबंधी. अण्णा टीमच्या काही सदस्यांनी जी बेताल वक्तव्ये केली किंवा पोरकट वागणूक दाखवली त्यामुळे या लढ्याची तीव्रता दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. हे असंच सुरू राहिले तर, लढ्याची काय सांगता होईल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही. आणि शेवटी अण्णांनी आपले उपोषण सोडताना एका दलित आणि एका मुस्लिम मुलीच्या हातून नारळपाणी घेऊन भारताला व सबंध जगाला काय बोध दिला याचा नीट उलगडा झाला नाही. शेवटी सर्वांचे पाय मातीचेच असतात ही गोष्ट मात्र अधोरेखित झाली.