– कमलेश बांदेकर
स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये देशाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळवून देणार्या लढ्याला दोन महान, निःस्वार्थी व त्यागी संन्यस्त वृत्तीची नेतृत्वे रामदेवबाबा व अण्णा हजारे यांच्या रूपाने लाभली आहेत. खरे तर ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक नेतृत्व इतर विषयांबरोबर काळे धन या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत आहे, तर दुसरे नेतृत्व भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कायद्यासाठी जनलोकपालाच्या मागणीसाठी उभे ठाकले आहे. आपण या दोन्ही आंदोलनांचा सविस्तर आढावा घेऊ व कोणत्या पार्श्वभूमीतून ही दोन्ही आंदोलने उभी राहिली याचाही विचार करू.
रामदेवबाबा हे पूर्वाश्रमीचे रामकृष्ण यादव. त्यांचा जन्म हरियाणा राज्यातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. जन्मापासूनच अध्यात्माची ओढ, त्यागी वृत्ती व देशभक्तीने ओतप्रोत असलेले व्यक्तिमत्त्व. लहानपणीच मॅकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीचा तिरस्कार करून गुरुकुलप्रणीत शिक्षणपद्धतीसाठी घरादाराचा त्याग करून आईवडिलांना न सांगता गुरुगृही वास्तव्याला गेले. गुरुवर्य बलदेवजी महाराज, प्रद्युम्नजी महाराज व शंकरदेवजी महाराज यांच्याकडून चारही वेद, योग, अध्यात्म व संस्कृत यांचे परंपरागत ज्ञान प्राप्त केले. प्रथम आचार्यपदी राहून नंतर संन्यास दीक्षा घेतली. संन्यासी झाल्यावर हिमालयातील गिरिकंदरांमध्ये कठोर तपःसाधना केली व साधना करता–करता स्वतःची अशी विशिष्ट योगप्रशिक्षण पद्धती विकसित केली. स्वतः एकांतात साधना करण्यापेक्षा देशातल्या व जगभरातल्या कोटी–कोटी जनतेला त्यांच्या दुःख व कष्टांमधून मुक्त करण्यासाठी ही योगोपचार पद्धती आपण शिकवली पाहिजे असा विचार करून हिमालयातून हरिद्वारकडे त्यांनी प्रयाण केले. इथूनच स्वामीजींच्या जीवनामधला देश व समाजासाठी महत्त्वाचा असा कार्यकाळ सुरू झाला.
साधारणपणे १९९४ पासून बाळकृष्णजी महाराज यांच्यासमवेत योग व आयुर्वेद या विषयांवर स्वामीजींचे कार्य सुरू झाले. एका छोट्याशा खोलीमधून स्वतःच्या हातांनी औषधे तयार करून देण्याच्या कार्यकाळापासून ते शेकडो एकर जमिनींमधला भव्य असा आश्रम उभा करण्यापर्यंत या कार्याची मजल कशी व कधी पोहोचली हे काळालासुद्धा समजले नाही. एकेका साधकाला शिकवण्यापासून हजारो लोकांची शिबिरे घेण्यापर्यंत एखाद्या चमत्काराप्रमाणे स्वामीजींच्या प्रखर अशा कर्मयोगातून हे कधी साध्य झाले हे लक्षातसुद्धा आले नाही. अगदी सर्दी–पडशापासून ते असाध्य व दुर्धर अशा कॅन्सर व तत्सम आजारांवर हजारो–लाखो लोक कसे बरे झाले हे त्या रोग्यांनाही उमगले नाही. स्वामीजींच्याच म्हणण्यानुसार, एखादा शेतकरी जेव्हा एखादे बी पेरतो तेव्हा त्यापासून तयार होणार्या झाडापासून हजारो बिया तयार होतात, हे जरी शेतकर्याच्या लक्षात आले नाही तरी त्याला त्याचे फळ मिळते. त्यामुळे तुम्हालाही या योगसाधनेमुळे रोग कसा बरा होतो हे जरी समजले नाही तरीसुद्धा आपण दर्शवलेल्या मार्गाने योगसाधना केली तर तुम्हाला त्याचे फळ मिळाल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे कितीतरी जणांनी केवळ उत्सुकतेपोटी व स्वामीजींच्या आग्रहामुळे योगसाधना करून आपल्या जीवनातील रोग व निराशेवर मात केली. नंतरच्या काळात आपल्या योग व प्राणायामांच्या विधीवरती संशोधन करण्यासाठी दानदात्यांच्या सहकार्याने ‘पतंजली रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना करून योगावरील आधुनिक पद्धतीच्या संशोधनाची सुरुवात केली व जवळपास २,००० रिसर्च पेपर्ससुद्धा प्रकाशित झाले व त्यावर आधारित इंग्रजी भाषेतील धेस खप डूपशीसू ुळींह ाशवळलरश्र ीलळशपलश नावाचे संशोधनपर पुस्तकही प्रकाशित केले. आज जगभरातल्या विविध विद्यापीठांमध्ये ‘पतंजली योग समिती’च्या योगपद्धतीवर संशोधन सुरू आहे. विविध जगप्रसिद्ध अशा कॅन्सर इस्पितळांमध्येसुद्धा या योगपद्धतींवर संशोधन सुरू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये स्वामीजी ज्यावेळी म्हणत असत की, आपण शिकवलेल्या पद्धतीच्या योग–प्राणायामांमुळे रक्तदाब, मधुमेह व कॅन्सरसारख्या असाध्य रोगांनी ग्रस्त असलेले रोगीसुद्धा पूर्णपणे रोगमुक्त होतात, तेव्हा त्यावर आक्षेप घेतला जात असे. पण आता या योगपद्धतीला लोकमान्यता मिळाल्यामुळे विचारवंत मंडळीसुद्धा याचा स्वीकार करू लागली आहे. योग व आयुर्वेदावरती लोकांचा विश्वास अधिकच दृढ होऊ लागला आहे.
योगसाधना करता–करता स्वामीजींचे भ्रमण संपूर्ण भारतभर होऊ लागले व भ्रमण करता–करता भारतातील जनतेचे दुःख व दारिद्य्र पाहून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, फक्त योग– प्राणायामांच्या माध्यमातून गरीब व दीनदुबळ्या जनतेचे दुःख व दारिद्य्र दूर होऊ शकत नाही, तर त्यासाठी व्यापक असे जनआंदोलन उभारावे लागेल; जेणेकरून ज्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे हा देश गरिबीत व दुःखात खितपत पडलेला आहे त्याला बाहेर काढता येईल. हा विचार त्यांच्या मनात घोळत असताना त्यांची भेट एका विद्वान व तेजस्वी तरुणाशी झाली. ज्याने आपले संपूर्ण जीवन देशाला या दैन्यातून बाहेर काढण्यासाठी समर्पित करण्याचा संकल्प केला होता, ती व्यक्ती म्हणजे दुसरी–तिसरी कुणीही नसून आधुनिक काळातील स्वदेशी चळवळीचे प्रणेते राजीवजी दीक्षित होय. राजीवजी दीक्षित व स्वामी रामदेवजींनी एकत्रितपणे १९९७ पासून योग– प्राणायामांबरोबरच ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले असूनसुद्धा आपण अजूनही या भ्रष्ट व्यवस्थेमुळे पारतंत्र्यात कसे आहोत’ याचे धडे भारतीयांना द्यायला सुरुवात केली. राजीवजींनी सुरू केलेली स्वदेशी चळवळ पुन्हा एकदा स्वातंत्र्यानंतर समाजामध्ये मूळ धरू लागली. प्रचाराचे काम करता–करता २००८ मध्ये निर्णायक लढ्याची सुरुवात करण्यासाठी काळे धन, भ्रष्टाचार व भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात ‘भारत स्वाभिमान’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. योग–प्राणायामांबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विविध सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने देशाच्या संपत्तीची भयंकर लूट चालवलेली आहे याविषयी विविध माध्यमांतून लोकजागृती अभियान जोर धरू लागले व हे अभियान एका निर्णायक वळणावरती आलेले असताना ३० नोव्हेंबर २०१० रोजी राजीवजी दीक्षित यांचे अनपेक्षित झालेले निधन या कार्यामध्ये एक पोकळी निर्माण करून गेले. स्वामीजींच्या या पवित्र कार्यामधला हा एक महत्त्वाचा असा धक्कादायक क्षण होता. पण या संकटामुळे खचून न जाता हे आंदोलन स्वर्गीय राजीव दीक्षितांच्या व लाखो शहीद स्वातंत्र्यसैनिकांच्या इच्छापूर्तीसाठी अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी प्रवास सुरू झाला.
आता काळे धन, भ्रष्टाचार व व्यवस्था परिवर्तनाच्या या लढाईमध्ये अण्णा हजारे व टीम अण्णांचीही मदत सुरू झाली.
भारतीय स्वाभिमान संघटनेचे ध्येय
१) रोग, नशा व विदेशी कंपन्यांद्वारे चालवलेल्या लुटीच्या षड्यंत्रापासून देशाला वाचवणे.
२) काळे धन, भ्रष्टाचार व भ्रष्ट व्यवस्थेपासून देशाला मुक्त करून एका महाशक्तीशाली व वैभवशाली भारताचे निर्माण करणे.
३) विकेंद्रित विकासवाद व आध्यात्मिक समाजवादाच्या माध्यमातून व्यक्ती, समाज, राष्ट्र व विश्वाचे कल्याण करणे.
आता खर्या अर्थाने समाजजागृतीचे व देशाला लुटीच्या षड्यंत्रापासून वाचवण्याचे आंदोलन एका निर्णायक वळणावरती येऊन ठेपले आहे. ३० जानेवारी २०११ पासून अण्णा हजारे व टीम अण्णा, तसेच स्वामी रामदेवजीबाबा यांच्या संयुक्त आंदोलनाला सुरुवात झाली व भ्रष्टाचाराच्या विरोधातील एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर २७ फेब्रुवारी व २३ मार्च २०११ या दिवशी पूज्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील जंतर–मंतर व रामलीला मैदानावर सरकारला जागवण्यासाठी धरणे आंदोलन व उपोषणाला सुरुवात झाली. या उपक्रमानंतर अण्णा हजारे व त्यांच्या टीमने भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वतंत्रपणे वेगळ्या लढाईची घोषणा केली व त्या लढ्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कायद्यासाठी जनलोकपालाची शिफारस केली. त्यापाठोपाठ स्वामीजींनी ४ जून २०११ रोजी काळ्या धनाच्या विरोधात आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या अशा आंदोलनाची घोषणा केली; ज्यामध्ये सरकारने ४०० लाख कोटी रुपयांचे काळे धन परत आणावे यासाठी लाखो लोकांनी एकाच वेळी सामूहिक अनिश्चित कालीन उपोषण करण्याचे ठरवले. पण स्वामीजींच्या या लोकहितवादी व न्यायपूर्ण मागण्या मान्य करण्याऐवजी सध्याच्या लोकशाहीप्रणीत सरकारने लोकशाहीचा गळा घोटून रात्रीच्या वेळी मंडपात पोलीस घुसवून हजारो लोकांवर अश्रुधूर, लाठीहल्ला व गोळीबाराचा उपयोग करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
त्या पाठोपाठ अण्णा हजारेंनी १६ ऑगस्ट रोजी ‘जनलोकपाल विधेयका’साठी आपल्या आमरण उपोषणाची घोषणा केली. या उपोषणालासुद्धा संपूर्ण भारतामधून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. पण हे आंदोलनसुद्धा या सरकारमधील भ्रष्ट लोकांनी अण्णांची व जनतेची दिशाभूल करून उधळून लावले. पण या दोन्ही आंदोलनांचा असा परिणाम झाला की, भारतातील गोरगरीब जनतेमध्ये या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जागृती झाली. काळे धन, भ्रष्टाचार व जनलोकपाल विधेयक हे जनसामान्यांच्या चर्चेचा विषय होऊ लागले. स्वातंत्र्यानंतरच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे देशातील काही मोजकेच लोक जनतेला कशा पद्धतीने लुटत आहेत, हे देशाला कळून चुकले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष व भ्रष्ट राजकारण्यांविरुद्ध क्रोधाची भावना निर्माण झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून सीडब्ल्यूजी घोटाळा, २ जी स्पेक्ट्रम घोटाळा व आता १०.६७ लाख कोटींचा– ज्यांना स्वच्छ प्रधानमंत्री असे म्हटले जाते त्यांच्यामार्फत झालेला कोळसा घोटाळा– यांनी कहरच झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील जनता आता व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसह तथाकथित १५ भ्रष्ट मंत्र्यांची पुराव्यासहित यादी जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. तसेच अरविंद केजरीवाल व टीम अण्णांनी या घोटाळ्याच्या स्वतंत्र चौकशीसाठी २५ जुलैपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव आलेला आहे.
तथाकथित भ्रष्ट मंत्र्यांची यादी
१) श्री. मनमोहन सिंग, २) श्री. पी. चिदंबरम्, ३) श्री. प्रणव मुखर्जी, ४) श्री. शरद पवार, ५) श्री. एस. एम. कृष्णा, ६) श्री. कमलनाथ, ७) श्री. प्रफुल्ल पटेल, ८) श्री. विलासराव देशमुख, ९) श्री. वीरभद्र सिंग, १०) श्री. कपिल सिब्बल, ११) श्री. सलमान खुर्शीद, १२) श्री. जी. के. वासन, १३) श्री. फारुख अब्दुल्ला, १४) श्री. एम. के. अलगिरी, १५) श्री. एस. के. शिंदे.
पूज्य स्वामीजींनी संपूर्ण भारतभर पसरलेल्या आपल्या ‘भारत स्वाभिमान’ या संघटनेच्या माध्यमातून ९ ऑगस्टपासून आर या पार लढाईची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारची पाचावर धारण बसली आहे. यावेळी स्वामीजींनी आपण पूर्ण तयारीनिशी या आंदोलनात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारला ४ जूनच्या आंदोलनाप्रमाणे हे आंदोलन चिरडण्याची छाती होणार नाही, असे मतसुद्धा व्यक्त केले आहे. सरकारला एकतर स्वामीजींच्या मागण्या मान्य कराव्या लागतील अथवा सत्ता सोडावी लागेल असे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. आजच्या घडीला जनता संपूर्णपणे भ्रष्टाचाराविरोधात उभी आहे व महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये रामदेवबाबा व अण्णांनी एकत्रितरीत्या लढण्याचे ठरवले आहे.
सरकारसमोर स्वामीजींच्या मुख्य मागण्या
१) भारताचे देश व विदेशामध्ये जमा ४०० लाख कोटी रुपयांचे काळे धन व अवैध संपत्ती सरकारद्वारा राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करणे.
२) विदेशात जमा काळे धन व संपत्तीचा पत्ता लागण्यासाठी ‘बेनिफिशियल ओनरशिप’च्या घोषणापत्राची प्रत्येक वित्तविषयक व्यवहारामध्ये कायदेशीर तरतूद करणे. तसेच ‘प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍण्ड मनी लॉंड्रिंग ऍक्ट’ अंतर्गत ‘पॉलिटिकली एक्सपोज्ड पर्सन्स’च्या प्रावधानानुसार सर्वसामान्य एफआयआर नोंद करून त्यांची व त्यांच्या नातेवाइकांची विदेशामध्ये अवैधरीत्या जमवलेल्या संपत्तीची माहिती परकीय देशांकडून मिळवणे. (पॉलिटिकली एक्सपोज्ड पर्सन म्हणजे शीर्ष राजनेता, उच्च राजनैतिक पदाधिकारी, प्रथम श्रेणीचे सरकारी अधिकारी, मोठे उद्योगपती इ. व त्यांचे नातेवाईक व मित्र.)
३) विदेशामध्ये जमा काळ्या धनाच्या बाबतीत सरकारजवळ जवळपास ३६ हजार सूचना, ९,९०० विदेशी बेकायदेशीर व्यवहार व विदेशामध्ये खाती असलेले जवळपास ३,००० नावे हे सर्व सरकारने सार्वजनिक करावे.
४) नव्या पद्धतीने कर प्रणालीची व्यवस्था, ज्यामुळे करचोरी करणे अशक्य होईल.
५) १००, ५००, १००० रु.च्या नोटा सरकारने परत घेऊन देशांतर्गत असलेल्या काळ्या धनावरती अंकुश आणावा व नोटांचे व्यवहार फक्त ५० रु.च्या नोटेपर्यंत सीमित करावे.
६) मॉरिशस देशातून भारतात जमा झालेल्या सर्व आर्थिक गुंतवणुकीचे मूळ स्रोत तपासावे. यासाठी स्वतंत्र समितीचे गठन करावे व प्रॉमिसरी नोटच्या व्यवस्थेला समाप्त करावे.
७) काळ्या धनाबरोबरच भ्रष्टाचार व व्यवस्था परिवर्तन, त्याचबरोबर राष्ट्रीय किसान आय आयोगाची स्थापना, भारतीय भाषांमधून समान शिक्षा व्यवस्था, समान चिकित्सा व्यवस्था, निवडणूक सुधारणा, राष्ट्रीय प्रबंधन नीती व पूर्ण स्वदेशी व्यवस्था लागू करणे.
वर्तमान केंद्र सरकारने काळे धन व भ्रष्टाचाराविरोधात दिखावटी व लोकांना भ्रमित करणारी पावले उचलली आहेत. यामुळे काळे धन व भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी तो वाढीस लागेल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे व त्यामध्ये आपले तथाकथित स्वच्छ प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचासुद्धा मंत्रिमंडळ प्रमुख या नात्याने तेवढाच सहभाग आहे. भ्रष्टाचार करणे व भ्रष्टाचार्यांना संरक्षण देणे, तसेच त्यांना कायद्यापासून वाचवण्यासाठी सर्व प्रकारची कृत्ये करणे यासाठी हे सरकार पुरे बदनाम झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात काहीतरी चांगले करण्याची अपेक्षा या सरकारकडून राहिली नाही. त्यामुळे रामदेवबाबा व अण्णा हजारे यांनी या सरकारला सत्तेवरून उचलण्यासाठी अखेरचा लढा पुकारलेला आहे. त्यांनी ऑगस्टपासून ‘आर या पार’च्या लढाईची घोषणा केली आहे, तेव्हा सर्व भारतीय जनतेला विनंती आहे की आपला देश वाचवण्यासाठी व स्वदेशी व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी तन–मन–धनपूर्वक या कार्याला आपला पाठिंबा द्यावा व नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे.