भीषण स्फोटात ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

0
18

>> झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड कंपनीतील घटना; ठिणगी पडून कंडेन्शन टँकचा झाला स्फोट

झुआरीनगर-वास्को येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड कंपनीत काल भीषण स्फोट झाला, त्यात तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंद्रजीत घोष, मृत्युंजय आणि जयकिसन सिंग अशी मृत कामगारांची नावे असून, ते कंत्राटी कामगार म्हणून या कंपनीत काम करत होते. कंपनीच्या युरिया प्लांटमधील कंडेन्शन टँकमध्ये काम करत असताना मंगळवारी दुपारी २.४५ वाजता हा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या ३० तारखेला झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड कंपनीतील युरिया प्लांटच्या शटडाऊनचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार त्यांचे काम चालू होते. हे काम करत असताना एका कंत्राटदाराचे तीन कामगार सहा मीटर उंचीवर असलेल्या कंडेन्शन टँकचा नट बोल्ट काढत होते. त्यासाठी कोल्ड वर्क तंत्रज्ञान वापरण्याची शिफारस केली होती. मात्र त्यांनी हॉट वर्क गॅस कटिंग तंत्रज्ञान वापरले. त्यामुळे ठिणगी पडून टँकमध्ये स्फोट झाला आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला. कंडेन्शन टँकमध्ये गॅसचा शिरकाव झाल्याने हा स्फोट घडला. इंद्रजीत घोष, मृत्युंजय आणि जयकिसन सिंग हे कंपनीचे कर्मचारी नसून, कंपनीत काम करणार्‍या एका कंत्राटदारांच्या हाताखालील कामगार होते.
या घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिन्ही कामगारांना कंपनीच्या रुग्णवाहिकेतून चिखली येथील साळगावकर इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुरगावच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

स्थानिकांनी घाबरून जाऊ नये : मुख्यमंत्री
वास्को येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड प्लांटमधील अमोनिया टाकीच्या स्फोटात तीन मजुरांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. राज्य सरकारने या घटनेची त्वरित दखल घेतली असून, परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहेत. स्थानिक नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस गळती झालेली नसून, या प्रकरणावर शासनाकडून लक्ष ठेवले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

..तर कंपनी व्यवस्थापनाविरोधात कारवाई : नीळकंठ हळर्णकर
झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेडच्या प्रकल्पात झालेल्या स्फोटाची चौकशी केली जाणार असून, निष्काळजीपणा आढळून आल्यास कंपनी व्यवस्थापनाविरोधात आवश्यक कारवाई केली जाणार आहे, असे कारखाने व बाष्पक मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांनी काल स्पष्ट केले. या झुआरी कंपनीत संध्याकाळच्या सुमारास स्फोटाची घटना घडली. या कंपनीचा प्रकल्प आठ महिन्यांसाठी देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार होता. त्यापूर्वीच ही स्फोटाची घटना घडली, असेही त्यांनी सांगितले.