राज्य सरकारच्या गृह विभागाने गोवा भाडेकरू पडताळणी नियम 2026 अधिसूचित केले आहेत. घरमालकाला पाच दिवसात भाडेकरूची माहिती पोलीस यंत्रणेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्य सरकारने भाडेकरू पडताळणीमध्ये सुधारणा केली आहे. आता, घरमालकांना भाडेकरूंची माहिती पाच दिवसांत द्यावी लागणार आहे. घरमालकाने भाडेकरूंची माहिती भरलेला विहित नमुन्यातील अर्ज जवळच्या पोलीस स्थानकात जमा करावा लागणार आहे. घरमालकाने भाडेकरूंच्या मूळ कागदपत्रांची प्रत, छायाचित्र अर्जासोबत जोडले पाहिजे. पोलिसांकडून पोचपावती घेतली पाहिजे. तसेच, घरमालकाने एका स्वतंत्र नोंदवहीत भाडेकरूंच्या नावांची नोंद करून ठेवली पाहिजे. त्यानंतर, पोलिसांकडून भाडेकरूंची पडताळणी केली जाणार आहे. ज्या घरमालकांकडून भाडेकरूंची माहिती सादर केली जाणार नाही. त्यांच्याविरोधात पोलीस यंत्रणेकडून उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून संबंधित घरमालकाला नोटीस बजावली जाईल. त्यानंतर, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे सूचनेत म्हटले आहे.
चुकीची माहिती दिलेल्या किंवा गुन्हेगारी पाश्वभूमी असणाऱ्या भाडेकरूंबाबत हवालदार आणि त्यावरील अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सात दिवसांत अहवाल द्यावा लागणार आहे.