भाजप सरकारचे लोकहिताला प्राधान्य

0
5

सी. टी. रवी यांचे पर्वरीत प्रतिपादन

नऊ वर्षांच्या आपल्या सत्ताकाळात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोककल्याणाला प्राधान्य दिले आहे. केंद्रातील भाजप सरकारने आपल्या सत्ताकाळात देशहितकारक कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपचे गोवा राज्य प्रभारी तसेच कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांनी काल रविवारी दि. 11 रोजी बोलताना केले. भाजपच्या संपर्क से समर्थन अंतर्गत मोहीमेत सहभागी झालेले सी. टी. रवी हे सुकूर पंचायत क्षेत्रातील श्री वेताळ महारूद्र संस्थानाजवळ आयोजित शेतकरी वर्गाच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे पर्यटन तथा माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पर्वरी भाजप मंडळ अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तसेच सरपंच, पंचसदस्य व जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.

केंद्रातील मोदी सरकार सतत जनकल्याणासाठी राबले. प्रत्येक क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने वावरणाऱ्या सरकारने स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला बळकटी दिल्याचे श्री. रवी यांनी सांगितले. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सविस्तरपणे उपस्थितांना दिली. रवी यांनी पर्वरी मतदारसंघातील साई मंदिर, वेताळ महारूद्र देवस्थानाला भेट दिली.