भाजपच्या झेंड्याखाली कॉंग्रेसचे राज्य ः देसाई

0
8

एकीकडे कॉंग्रेस पक्ष भारत जोडो अभियान राबवित असतानाच गोव्यात मात्र ‘कॉंग्रेस तोडो, भाजप जोडो’ अभियान चालू असून, गोव्यात भाजपच्या झेंड्याखाली कॉंग्रेसचे राज्य चालू असल्याची प्रतिक्रिया काणकोणचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केली.

मंदिर आणि चर्चसमोर उभे राहून देवाला गार्‍हाणे घालतानाच आपण शेवटपर्यंत पक्ष सोडणार नसल्याच्या शपथा घेतलेले आणि कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार मतदारसंघाच्या विकासाच्या नावाखाली आपली दुष्कृत्ये लपविण्यासाठीच भाजपच्या कळपात गेले आहेत, असा आरोप देखील देसाई यांनी केला.

सध्या गोव्यातील भाजपमध्ये मूळ भाजपचे दोन किंवा तीनच आमदार असतील, बाकीचे सर्व जण मूळ कॉंग्रेसचेच आहेत. आमदारांचे पक्षांतर ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. मागच्या दहा वर्षांचा इतिहास पाहता मतदारांनी भाजपाला बाजूला ठेवले होते; मात्र भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या तंत्राचा वापर करून आमदारांना विकत घेण्याचे सत्र सुरू केले आहे. पाच वर्षांनंतर हाच पक्ष ‘वापरा आणि फेका’ या तंत्राचा वापर करून सध्या भाजपमध्ये गेलेल्या कॉंग्रेस आमदारांना हाकलून लावणार आहे, असेही देसाई म्हणाले.