कॉंग्रेसच्या ८ आमदारांचा भाजपात प्रवेश

0
16

४० पैकी ३३ आमदार सत्ताधारी; विरोधात केवळ ७

भाजपचे संख्याबळ २८ वर; कॉंग्रेसपाशी उरले फक्त ३ आमदार

काल सकाळपासून अचानक सुरू झालेल्या जोरदार राजकीय घडामोडींमध्ये विरोधी पक्षनेते मायकल लोबो, कॉंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिकेरा, डिलायला लोबो, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई आणि संकल्प आमोणकर या आठजणांनी कॉंग्रेस पक्षाचा दोन तृतीयांश विधिमंडळ गट भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला. त्यामुळे गेले अनेक महिने चाललेल्या पक्षांतर नाट्यावर अखेर पडदा पडला. या सर्वांना रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला.

काल सकाळीच कॉंग्रेसचे काही आमदार गोवा विधानसभा संकुलात दाखल झाल्याने त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने एकाएकी उचल खाल्ली. सभापती रमेश तवडकर हे दिल्लीला असल्याने ते विधानसभा संकुलात उपस्थित नव्हते, परंतु कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते मायकल लोबो यांनी आपल्या दालनात आपल्या विधिमंडळ गटाच्या बंडखोर आमदारांसमवेत एक बैठक घेतली. दिगंबर कामत, आलेक्स सिकेरा, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर हे यावेळी हजर होते.

या बैठकीत कॉंग्रेस विधिमंडळातील ८ जणांच्या गटाचे भाजपमध्ये विलीन करण्याचा रितसर निर्णय घेण्यात आला. या बैठकीतील निर्णयाबाबत संकल्प आमोणकर यांनी नंतर पत्रकारांना माहिती दिली. त्यानंतर कॉंग्रेस आमदारांच्या ह्या बंडखोर गटाने गोवा विधानसभा संकुलातच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना कॉंग्रेसच्या ८ आमदारांचा गटाच्या विलीनीकरणाबाबतचा ठराव सादर केला.
सभापती रमेश तवडकर काही कामानिमित्त दिल्ली दौर्‍यावर असल्याने कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या गटाने विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कॉंग्रेस आमदारांच्या गटाच्या विलीनीकरणाच्या ठरावाची प्रत सुपूर्द केली.
कॉंग्रेसच्या या बंडखोर आमदारांच्या गटाला भाजपमध्ये प्रवेश देण्यास भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी यापूर्वीच मान्यता दिली होती. मायकल लोबो, दिगंबर कामत यांनी मागील आठवड्यात नवी दिल्ली दौरा करून भाजपच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. कामत यांनी त्यावेळी दिल्ली दौर्‍याचा इन्कार केला होता. लोबो यांनीही आपला पक्षांतराचा विचार नसल्याचे काही काळापूर्वीच ठासून सांगितले होते. मात्र, गेल्या जुलै महिन्यातील एका असफल प्रयत्नापासून संभाव्य बंडखोरांकडे संशयाने पाहिले जात होते.

गेल्या जुलै महिन्यात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षातून एक गट फुटून निघण्याची सर्व तयारी झाली होती, मात्र पक्षांतरबंदी कायद्याखाली विधिमंडळ गट विलीन करायचा असेल तर किमान दोन तृतीयांश संख्याबळ आवश्यक असल्याने व ऐनवेळी एक आमदार कमी पडल्याने ते पक्षांतर शेवटच्या क्षणी रखडले होते. विधानसभेच्या त्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कॉंग्रेसच्या आठ आमदारांच्या गटाला भाजप प्रवेश देण्याची सर्व तयारी झाली होती. सभापती रमेश तवडकर यांनी सुट्टी असताना सुध्दा विधानसभेत उपस्थिती लावली होती. तथापि, कॉंग्रेसच्या एका आमदाराने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने कॉंग्रेसच्या आमदारांच्या गटाला भाजपमध्ये प्रवेश देण्याचा तो प्रयत्न फसला होता. कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी तातडीने गोव्यात धाव घेऊन आमदारांच्या व्यक्तिशः बैठका घेऊन मोठ्या प्रयत्नांती ते पक्षांतर रोखून धरले होते. मात्र, काल संकल्प आमोणकर हेही बंडखोर गटात सामील झाल्याने आठ जणांचे संख्याबळ होताच लागलीच वेगवान राजकीय हालचाली होऊन कॉंग्रेसच्या या आठही बंडखोरांचा विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्यात आला. लोबो आणि दिगंबर यांनी भाजपमध्ये दुसर्‍यांदा प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या या बंडखोरांना भाजपात प्रवेश देण्यात आला. त्यांनी या आठ आमदारांचे भाजप मुख्यालयात स्वागत केले. त्यानंतर त्यांच्यासह सावंत व तानावडे पत्रकारांस सामोरे गेले. कॉंग्रेसच्या आठ आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यात भाजपची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक स्थळांमध्ये जाऊन निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही, अशी शपथ देवासमक्ष घेणार्‍या, परंतु निवडून आल्यापासूनच सत्ताधारी पक्षात जाण्याच्या जोरदार वावड्या उडत असलेल्या कॉंग्रेसच्या आठ आमदारांच्या कालच्या भाजप प्रवेशामुळे
राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

सभापती तवडकर यांच्याकडून
विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण

राज्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडत असताना सभापती रमेश तवडकर हे मात्र गोव्यात उपस्थित नव्हते. ते काल सकाळी नवी दिल्ली दौर्‍यावर होते. त्यानंतर काल सायंकाळी तवडकर हे नवी दिल्लीतील दौर्‍यावरून परतल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या ८ आमदारांच्या भाजपमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली.

सत्ताधारी आघाडीत ३३, विरोधात केवळ ७
कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याने राज्यात भाजपाच्या स्वतःच्या आमदारांचे संख्याबळ २८ झाले असून मगोचे २ आमदार व ३ अपक्षांचाही डॉ. प्रमोद सावंत सरकारला यापूर्वीच पाठिंबा असल्याने एकूण सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ ३३ वर पोहोचले आहे. विरोधात कॉंग्रेसचे ३, आम आदमी पक्षाचे २, गोवा फॉरवर्डचा १ व रिव्होल्युशनरी गोवन्सचा १ मिळून केवळ ७ आमदार उरले आहेत.

कॉंग्रेसच्या ८ आमदारांचा भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश

कॉंग्रेसच्या ८ आमदारांनी कुठल्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मगोच्या आमदारांचा सरकारला पाठिंबा कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाने देशभरात भारत जोडो यात्रा सुरू केली, तथापि, गोव्यातून आम्ही कॉंग्रेस छोडो यात्रेला सुरुवात केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजप प्रवेश नाकारल्याने सरदेसाईंचे आरोप : मुख्यमंत्री
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा होती. तथापि, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्याला मान्यता न दिल्याने सरदेसाई हे भाजपवर आरोप करीत आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. कॉंग्रेसच्या आठ आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार सरदेसाई यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती, त्याला काल मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.

कोण आहेत हे ८ बंडखोर?
१. मायकल लोबो (कळंगुट)
२. दिगंबर कामत (मडगाव)
३. आलेक्स सिकेरा (नुवे)
४. रुडॉल्फ फर्नांडिस (सांताक्रुझ)
५. डिलायला लोबो (शिवोली)
६. केदार नाईक (साळगाव)
७. राजेश फळदेसाई (कुंभारजुवे)
८. संकल्प आमोणकर (मुरगाव)
भाजपचे इतर २० आमदार
१. प्रमोद सावंत (साखळी)
२. विश्‍वजीत राणे (वाळपई)
३. दिव्या राणे (पर्ये)
४. रवी नाईक (फोंडा)
५. बाबूश मोन्सेरात (पणजी)
६. जेनिफर मोन्सेरात (ताळगाव)
७. रोहन खंवटे (पर्वरी)
८. उल्हास तुयेकर (नावेली)
९. सुभाष शिरोडकर (शिरोडा)
१०. गोविंद गावडे (प्रियोळ)
११. प्रेमेंद्र शेट (मये)
१२. प्रवीण आर्लेकर (पेडणे)
१३. नीळकंठ हळर्णकर (थिवी)
१४. जोशुआ डिसोझा (म्हापसा)
१५. नीलेश काब्राल (कुडचडे)
१६. गणेश गावकर (सावर्डे)
१७. सुभाष फळदेसाई (सांगे)
१८. माविन गुदिन्हो (दाबोळी)
१९. कृष्णा साळकर (वास्को)
२०. रमेश तवडकर (काणकोण)
सरकारला पाठिंबा देणारे
मगो पक्ष ः
१. सुदिन ढवळीकर (मडकई)
२. जीत आरोलकर (मांद्रे)
अपक्षः
१. चंद्रकांत शेट्ये (डिचोली)
२. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (कुडतरी)
३. आंतोन वाझ (कुठ्ठाळी)
८+२०+२+३ ः ३३
विरोधात कोण कोण?
कॉंग्रेस ः
१. युरी आलेमाव (कुंकळ्ळी)
२. कार्लुस फेरेरा (हळदोणे)
३. आल्टन डिकॉस्टा (केपे)
आम आदमी पक्ष ः
१. वेन्झी व्हिएगश (बाणावली)
२. क्रुझ सिल्वा (वेळ्ळी)
गोवा फॉरवर्ड ः
१. विजय सरदेसाई (फातोर्डा)
रेव्होल्युशनरी गोवन्सः
१. वीरेश बोरकर (सांत आंद्रे)

उर्वरित ३ आमदारांची पक्षनिष्ठेची ग्वाही
कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे कॉंग्रेसचे उर्वरित ३ आमदार ऍड. कार्लुस फेरेरा, आमदार युरी आलेमाव आणि आमदार आल्टन डिकॉस्टा यांनी म्हटले आहे.

शपथा आणि प्रतिज्ञापत्रे केराच्या टोपलीत ः गुंडुराव
गोव्यातील मतदारांनी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून दिले होते, त्यांनी देऊळ, चर्च आणि दर्गा या ठिकाणी जाऊन आम्ही कधीच भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, अशी शपथ घेतली होती. कॉंग्रेस सोबत राहणार आहोत, असे प्रतिज्ञापत्र लिहून देऊन शपथ घेतलेल्या दिगंबर कामत, मायकल लोबो आणि इतर आमदारांची कृती निर्लज्जपणाची आहे, अशी टीका कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केली आहे.

देवच म्हणाला हवे ते कर ः दिगंबर
मी देवासमोर कॉंग्रेस पक्ष सोडणार नाही अशी शपथ घेतली होती. मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी देवापुढे पुन्हा माझे गार्‍हाणे मांडले, सर्व परिस्थिती कथन करून सांगितले. त्यावर देवाने मला ‘तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्या’चे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कार्य पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपण निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर व्यक्त केली.

कॉंग्रेस छोडो मोहीम ः लोबो
गोव्यात आम्ही ‘कॉंग्रेस छोडो आणि भाजप जोडो’ ही मोहीम सुरू केली आहे. कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळलो. कॉंग्रेसमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा बंडखोर आमदार मायकल लोबो यांनी केला.