१२ सप्टेंबरला अन्न सुरक्षा दिन पाळणार
भारतीय कम्युनिस्ट पक्ष १२ सप्टेंबर हा अन्न सुरक्षा दिवस म्हणून पाळणार असून या दिवशी लोकांना भारतीय अन्न महामंडळातील गोदामात जाऊन तेथील धान्य लुटण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यानी काल येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या १५व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशातील जनता उपाशी मरत असताना भारत सरकार मोठ्या प्रमाणात धान्याची निर्यात करत असल्याचे सांगून पक्षाने अलिकडेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन देशभरातील प्रत्येक कुटुंबाला सरकारने ३५ किलो अन्न धान्याचे वितरण करावे, अशी त्यांच्याकडे मागणी केली असल्याचे सांगितले हे एवढे धान्य जनतेला देण्यासाठी सरकारला १ लाख ४० हजार कोटी एवढा खर्च येणार असल्याचे ते म्हणाले. या घडीला सरकारकडे ५ कोटी टन एवढा धान्य सांठा असल्याची माहितीही त्यानी दिली.
देशभरातील ३० लाख लोकांना मोफत मोबाईल संच देण्याची सरकारची योजना असल्याचे सांगून त्यांनी या योजनेवर जोरदार टीका केली. लोकाना मोबाईल संच नव्हे तर अन्न हवे असल्याचे ते म्हणाले. राज्यांना असलेले हक्क हळूहळू कमी करून केंद्र सरकार ते आपणाकडे घेऊ पाहत असल्याचा आरोपही रेड्डी यानी यावेळी केला. सशस्त्र दले विशेष हक्क कायद्याचा केंद्र सरकार गैरवापर करत असून आसाम, नागालॅण्ड, मणिपूर, जम्मू आणि काश्मिर आदी राज्यात निरपराध लोकांची हत्या केली जात असल्याचे ते म्हणाले. नक्षलवादी असल्याचे भासवून आदिवासींचीही हत्या केली जात असल्याचे ते पुढे म्हणाले.
विदेशी थेट गुंतवणुकीला विरोध
केंद्र सरकार करू पाहत असलेल्या विदेशी थेट गुंतवणुकीला कम्युनिस्ट पक्ष जोरदार विरोध करणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. अशी गुंतवणूक करू देणे हे देशाच्या हिताचे नसल्याचे सांगून अमेरिका आपली बाजारपेठ विदेशी गुंतवणुकीसाठी खुली करीत नाही. मात्र, भारतासारख्या देशात गुंतवणूक करून त्यांच्या बाजारपेठा काबीज करू पाहत असल्याचा आरोप त्यानी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दबावाला बळी पडून भारत सरकार दळणवळण, विमा, बँका आदी क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी देऊ पाहत आहे हे घातक असल्याचे सांगतानाच अमेरिका मात्र बँका, दळणवळण आदी क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी देत नसल्याचे ते म्हणाले. कामगार नेते राजू मंगेशकर हे यावेळी हजर होते.