बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतील नावात चुका

0
7

शिक्षण मंडळाचा अजब कारभार; वडिलांचे नाव आणि आडनाव न घातल्याने सेंट अँड्र्‌‍यू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची धावपळ

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेत अनेक विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव आणि आडनाव न घातल्याने वास्को येथील सेंट अँड्र्‌‍यू उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ उडाली असून, दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका परत मागवल्या आहेत.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या शनिवारी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी जाहीर केला. निकालानंतर मंडळाने गुणपत्रिका त्या त्या विद्यालयात वितरित केल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका विद्यालयातून घेतल्या व पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू केली. दरम्यान पुढील शिक्षणाकरिता प्रवेश घेण्यासाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज भरला, तेव्हा मंडळाने दिलेल्या गुणपत्रिकेत काही विद्यार्थ्यांचे आडनाव गायब, तर काही गुणपत्रिकेत वडिलांचे नाव गायब असल्याचे निदर्शनास आले. आपल्या विद्यालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांनी ही बाब सेंट अँड्र्‌‍यू उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार विद्यालयाने सदर गुणपत्रिका विद्यार्थ्यांकडून परत मागवल्या आहेत.

शिक्षण मंडळाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची धावपळ सुरू झाली आहे. विद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका दुरुस्तीसाठी परत मागवल्या आहेत; मात्र तूर्त विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला आहे.
काल वाडे वास्को येथील सेंट अँड्र्‌‍यू उच्च माध्यमिक विद्यालयात गुणपत्रिका परत करण्यासाठी सकाळपासून विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्या विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका दुरुस्तीसाठी लेखी अर्ज घेण्यात आला. त्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांनी दिलेल्या अर्जासहित गोवा शिक्षण मंडळाला पाठवल्या जाणार आहेत.

पुढील प्रवेश प्रक्रिया रखडली
विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, ती या चुकीमुळे आता लांबणीवर पडली आहे. कारण जोपर्यंत नवीन गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळत नाही, तोपर्यंत पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेता येणार नाही. त्यासाठी मंडळाने गुणपत्रिका लवकरात लवकर दुरुस्त करुन विद्यार्थ्यांना सुपूर्द कराव्यात, अशी मागणी होत आहे.

महाविद्यालयातील प्रथम वर्ष
प्रवेश प्रक्रिया यंदाही पोर्टलद्वारेच

राज्यातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया उच्च शिक्षण खात्याच्या पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे. महाविद्यालयीन प्रवेश पोर्टल येत्या 25 किंवा 26 मेपर्यंत खुले करण्यात येणार आहे. तसेच, प्रथम वर्ष महाविद्यालय प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा रद्द केली आहे, अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी काल दिली.
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांनी महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याच्या उच्च शिक्षण खात्याने कोविडच्या काळात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली होती. सदर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया कायम ठेवली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इच्छुक महाविद्यालयासाठी प्रवेश घेण्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करावा लागेल.