Home बातम्या बांगलादेशातील बंड

बांगलादेशातील बंड

0

बांगलादेशातील शेख हसीना यांची राजवट उलथवून टाकण्याचे काही आजी – माजी लष्करी अधिकार्‍यांचे कटकारस्थान उधळले गेले हा केवळ त्या देशासाठीच नव्हे तर भारतासाठीही मोठा दिलासा आहे. बांगलादेशमध्ये स्थिरावलेली शेख हसीनांच्या अवामी लीगची राजवट भारताच्या दृष्टीने मित्रत्वाची ठरली आहे आणि दिवसेंदिवस दोन्ही देशांदरम्यानच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दिशेने भारत आणि बांगलादेश सरकार पावले टाकत आले आहे. अशा सौहार्दपूर्ण वाटचालीत मिठाचा खडा टाकणारा हा सत्तांतराचा कट उधळला गेला हे ठीकच झाले. बांगलादेशला लष्करी कटकारस्थाने काही नवी नाहीत. त्याच्या स्थापनेपासून आजतागायत सातत्याने अशी बंडाळी होत आली आहे. खुद्द शेख हसीना यांनी त्याची दाहकता अत्यंत जवळून अनुभवली आहे. त्यांचे पिता आणि बांगलादेशचे थोर नेते शेख मुजिबूर रेहमान यांची अशाच एका लष्करी कटकारस्थानाअंती कुटुंबातील सदस्यांसह निर्घृण हत्या करण्यात आली, तेव्हा त्यांच्या कन्या शेख हसीना आणि शेख रेहाना या जर्मनीत असल्यानेच वाचू शकल्या होत्या. २००८ मधील सार्वत्रिक निवडणुकीअंती शेख हसीनांच्या हाती देशाची सत्तासूत्रे आली, तरीही त्यांच्याविरुद्ध बंडाचे प्रयत्न झाले.

बांगलादेश रायफलच्या अधिकार्‍यांनी २००९ साली केलेले बंड आणि नुकतेच उधळले गेलेले बंड त्या देशातील लोकनियुक्त सरकारांवर कशी टांगती तलवार कायम आहे हेच अधोरेखित करते आहे. ९० च्या दशकानंतर बांगलादेशमध्ये थोडेफार राजकीय स्थैर्य आले आहे, अन्यथा त्यापूर्वीचा लष्करी राजवटीचा सारा कालखंड तर केवळ बंडांच्याच घटनांनी भरलेला आहे. शेख मुजिबूर रेहमान यांची हत्या करून सत्ता सूत्रे हाती घेणार्‍या लष्करी अधिकार्‍यांविरुद्ध काही महिन्यांतच ब्रिगेडियर खालीद मुशर्रफ याने दुसरे बंंडे होते. त्याचा काटा तीनच दिवसांत काढला गेला, पण तेव्हापासून सातत्याने बंडांचे प्रयत्न होत राहिले आणि भारतविरोधी कारवायांचेही बांगलादेश हे मोठे केंद्र राहिले. लोकनियुक्त सरकार आले तरी देशात कट्टरपंथियांचा प्रभाव कायम राहिला. ‘हुजी’सारख्या संघटनेने भारतद्वेषाचे बीजारोपण केले आणि सातत्याने भारतातील दहशतवादी कारवायांचे संचालन बांगलादेशच्या भूमीवरूनच केले गेले. स्थलांतरित बांगलादेशींच्या आडून भारतविरोधी कारवाया होत राहिल्या. गेल्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या शेख हसीना यांच्या सरकारच्या राजवटीतच या प्रकारांना थोडाफार अंकुश बसला आहे. ‘उल्फा’ नेत्यांच्या मुसक्या आवळण्यापासून ‘हुजी’सारख्या कट्टरपंथी शक्तींविरुद्ध कडक निर्बंध जारी करण्यापर्यंत अनेक प्रकारे तेथील विद्यमान सरकारने सकारात्मक पावले उचलून भारत सरकारला साथ दिलेली आहे. दोन्ही देशांदरम्यान काही प्रश्न भिजत पडले आहेत हे खरे, परंतु त्यांच्या सोडवणुकीच्या दिशेनेही संवाद सुरू झाला आहे. पाणीवाटपाचा विषय असो किंवा सीमावाद असो, चर्चेद्वारे तो सोडवण्याच्या दिशेने बांगलादेश सरकारची पावले पडत आहेत. भारत सरकारशी प्रस्थापित झालेली ही मैत्रीच तेथील कट्टरपंथियांच्या डोळ्यांत खुपते आहे. शेख हसीना यांची राजवट उलथवून टाकण्याचे जे कटकारस्थान नुकतेच शिजवले गेले, त्यालाही हीच भारतविरोधाची काळी किनार आहे. काही आजी – माजी लष्करी अधिकार्‍यांच्या मनात विष पेरून त्यांच्या मार्फत सत्ता उलथवण्याचे हे षड्‌यंत्र उधळले गेले असले, तरी भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही याची शाश्‍वती देता येत नाही. बांगलादेशमधील विद्यमान राजवटीला अशा अशाश्‍वत परिस्थितीत भारताचा सक्रिय पाठिंबा मिळायला हवा. आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीपासून प्रत्यक्ष लष्करी सहाय्यापर्यंत जे शक्य असेल त्या मार्गाने बांगलादेशमधील विद्यमान धुसफुशीचा निकाल लावण्यात आपले योगदान गरजेचे असेल. तेथील अस्थिरता ही सरतेशेवटी आपल्यालाच तापदायक ठरणार आहे. तेथे लोकनियुक्त सरकार नांदायला हवे आणि भारतविरोधी शक्तींचा सामना करण्याची ताकद त्या सरकारमध्ये असायला हवी. कट्टरपंथियांच्या हाती एकदा जर सत्तासूत्रे गेली, तर भारतविरोधी शक्ती तेथून धुमाकूळ घालतील. बांगलादेशातील घडामोडींवर भारताची बारीक नजर राहावीच लागेल.